एक सुपीक, सळसळतं मन घ्यावं...
दाणेदार जाणिवांचे एखाददोन हंगाम घ्यावेत, काढणी झाल्यावर मनात जुन्या इच्छांची बीजं पेरावीत.
मग मन मारावं. पाचोळा पसरून जाळावं.
रणरणता पावसाळा, भिजलेला हिवाळा, आणि काकडता उन्हाळा त्याला दाखवावा.
ते भेगाळेल.
त्यावर कुठलंही पाखरू-वासरू बागडण्याआधी दडपणाचे रूळ फिरवून फिरवून ते दाबून सपाट करावं.
हळूहळू त्याचा नापीक कातळ होईल.
काही उन्हाळे कातळ अजून रापेल.
मग चुकून कधीतरी आतला झरा जागा होईल, फुटेल.
आत अडकलेल्या बीजांना फूस लावेल.
मग दगड झालेल्या मनातून दबलेले कोंब,
मनाचे तुकडे करत बाहेर उगवतील...
पुढचं माहीत नाही.
Tuesday, April 21, 2015
Saturday, March 28, 2015
रामनवमी
अयोध्येत लगबगत्या सुईणींची घाई
दीपकळी थरथरती कौशल्यामाई
दीपकळी थरथरती कौशल्यामाई
अयोध्येत चैत्राचा तप्त स्तब्ध वारा
राजा दशरथाच्या अस्वस्थ येरझारा
राजा दशरथाच्या अस्वस्थ येरझारा
अयोध्येत शुभयोग दाटले आभाळी
भाग्यचिह्न अंकण्यास रघुकुलाभाळी
भाग्यचिह्न अंकण्यास रघुकुलाभाळी
अयोध्येत प्रासादी पुरजनांचा मेळा
हर्षभरे ये शरयू दाटुनिया डोळां
हर्षभरे ये शरयू दाटुनिया डोळां
अयोध्येत पाळण्यात लालचुटुक पाय
गदगदली हर्षभरे कौशल्यामाय
गदगदली हर्षभरे कौशल्यामाय
अयोध्येत अवतरले आज रामराय
रघुवंशी रचते नियती स्वर्णाध्याय
रघुवंशी रचते नियती स्वर्णाध्याय
- योगेेश
Friday, March 20, 2015
माझ्या हिश्शाचं पीपली लाइव.
http://khabar.ndtv.com/video/show/ndtv-special-ndtv-india/271366
जातींचा जिगसॉ.बेलगाव, जि. बीड.
एप्रिल 2013.
दुष्काळावर डॉक्युमेंटरी करत फिरत होतो.
एप्रिलमध्ये 42 डिग्रींची काहिली.
चामडी बुटातनंही कातळावर पाय भाजत होते.
पाणी भरण्यामागचे सायास दाखवायचा प्रयत्न करत होतो.
टँकरच्या चेंगराचेंगरीत 83 वर्षांची आजी दिसली. अनवाणी.
तीनशे कदमांवर गावकुसाबाहेरचं घर, पण तितकं अंतर कापायलाही तिला वीसवीस मिनिटं लागत होती.
त्या दुखत्या सांध्यांनी पाणी शेंदणार, पाच पोहऱ्यांनी एक हंडा भरणार, आणि सात-आठ किलोंचा तो हंडा भेलकांडत घरी नेईपर्यंत इथे टँकर संपणार.
मी न राहवून त्यांचा हंडा उचलला.
या निमित्ताने पाणी वाहण्यासारख्या गोष्टीतला शिष्टाचारही शिकलो.
आजीच्या घरात आजारी नवऱ्याखेरीज कुणीही नव्हतं. कुणीही.
वाटेत जर्दा चघळत सलूनवर बसलेले रिकामटेकडे पुरुष होते,
घरच्या बाईला मदत नाही केली, हिला तरी कुठून केली असती?
त्याच वाटेवर, सायकलीला डब्बा टांगून पाणी नेणारा होता,
पण आजीला कॅरियरवर हंडा ठेवून घरापर्यंत नेऊ दिला नाही.
गावाच्या बौद्धवस्तीत पोचलो, आजोबा आजीला 'खाऊ-की-गिळू' असं पाहत होते.
युनिट पॅक-अप करवून गाडीत बसवलं.
डॉक्युमेंटरीत दाखवायला पुरेल इतकं शूट झालं होतं,
पण निदान आजचा दिवस तरी आजीला मदत म्हणून मी हंडे भरायला आजींबरोबर मागे फिरलो.
तीन हंडे भरल्यानंतर आजीनेच घालवून दिलं.
"बामणाकडून पाणी भरवल्याबद्दल गावात हफ़्ताभर हसतील. जावा दादा तुम्ही." आजी बोलली.
एका दिवसाच्या सोयीपेक्षा स्वाभिमानाच्या बेगडाखालची जातीय जोखड म्हातारीचे हाल करत होती.
****(या आजींचा प्रसंग खालील क्लिपमध्ये 09:09 पासून 10:10 पर्यंत)****
------------
शेजारच्या जालन्यात कर्जबाजारी होऊन जीव देणाऱ्या कुंडलिक बनसोडेंचं घर, आणि शेजारीच नापिकीपायी मुलीची हळद लांबलेल्या डोंगरेंचं घर दिसलं होतं.
------------
या काहिलीत बीडच्याच उमापुरात कोण कुणाचं पाणी कशावरून तोडत होतं हे ही नंतर कानी पडलं.
------------
हे सगळे गावाकडचे गरीब.
खरेखुरे गरीब मराठे. खरेखुरे गरीब बौद्ध. खरेखुरे गरीब माळकरी. खरेखुरे गरीब ब्राह्मण. खरेखुरे गरीब कुणबी.
सगळ्यांचा लसावि 'गरीबी'.
पण गरिबी, दुष्काळ आणि हालातही जातींच्या भिंती कोसळल्या नाहीत.
----------------------------------------------------------------------------
तात्पर्य (1) "गावाकडचे मराठे वंचित, त्यांचे हाल बघा!! आरक्षण हवंच!!!" म्हणणाऱ्यांनी गावातील इतर वंचित जातीही पाहाव्यात. वंचित दलित, वंचित सवर्ण. यांची नातवंडंही घरची कामं करून एकाच शाळेत शिकत असतील, तर संधीही समान हव्यात.
तात्पर्य (2) मराठा आरक्षणावर बोलणाऱ्या पत्रकारांच्या जातीवर घसरणाऱ्या मावळ्यांनी (सोकॉल्ड) 'मनुवादी' (सोकॉल्ड) 'बामनशाही' मीडिया गावाच्या दुर्दशांकडे दुर्लक्ष करतात असं बोलू नये.
तात्पर्य (3) जाणते राजे गरिबी सरसकट बघू शकत नाहीत, त्यांना फारफार 73 टक्के जाणते म्हणेन.
टचस्क्रीन
टचस्क्रीनों से पटा ये डिब्बा
नज़रें नहीं मिलाता
अपने अपने जग में डूबी
आंखें नहीं उठाता
नज़रें नहीं मिलाता
अपने अपने जग में डूबी
आंखें नहीं उठाता
कुछ के हाथ में फ़ोन है अपना
पर नज़रें हैं भटकीं
पराये स्क्रीन पे चलती फिल्म में
इनकी सांस है अटकी
पर नज़रें हैं भटकीं
पराये स्क्रीन पे चलती फिल्म में
इनकी सांस है अटकी
यह भी ख़ूब कि अपना मॉडल
क्यों न किसी को भाये,
क़ीमत और औक़ात में काहे
फर्क़ समझ ना आये
क्यों न किसी को भाये,
क़ीमत और औक़ात में काहे
फर्क़ समझ ना आये
फर्ज़ी गेम में दौड़-भाग कर
जितने सिक्के बटोरे
उतने भिखारी बगल से गुज़रे
लेकर ख़ाली कटोरे
जितने सिक्के बटोरे
उतने भिखारी बगल से गुज़रे
लेकर ख़ाली कटोरे
चैट की चौपाल में चलता
घंटों तक 'तियापा
देख न पाये सीट की आस में
कब से खड़ा बुढ़ापा
घंटों तक 'तियापा
देख न पाये सीट की आस में
कब से खड़ा बुढ़ापा
बात का ज़रिया बात की ही
जड़ पे है यूं बन आया,
टचस्क्रीनवालों का ये मजमा
दिल को न टच कर पाया
जड़ पे है यूं बन आया,
टचस्क्रीनवालों का ये मजमा
दिल को न टच कर पाया
Written on my Samsung phone.
भगव्या आठवणी
25 जानेवारी 2013-
बाळासाहेबांनतरच्या पहिल्या वर्षातली शिवसेना...
http://khabar.ndtv.com/video/show/ndtv-special-ndtv-india/263067
बाळासाहेबांनतरच्या पहिल्या वर्षातली शिवसेना...
http://khabar.ndtv.com/video/show/ndtv-special-ndtv-india/263067
'जातीयवादी' बालगीते ;)
देशस्थ बालगीत
रात्रीचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले दोन,
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले तीन
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
तात्पर्य- मी नाही(च) अभ्यास केला
----------
कोकणस्थ बालगीत
रात्रीचे वाजले आठ
पुरा केला गृहपाठ
एका मिनिटात बॅग भरली
दोनावर सुई फिरली
पुरा केला गृहपाठ
एका मिनिटात बॅग भरली
दोनावर सुई फिरली
आठ वाजून दोन
बाबांचा आला फोन,
हे काय, नुसताच मिस्डकॉल केला,
मी नाही रिटर्न केला
बाबांचा आला फोन,
हे काय, नुसताच मिस्डकॉल केला,
मी नाही रिटर्न केला
आठ वाजून तीन
ताईची हरवली पीन
बोलणी खाण्यात अर्धातास गेला
मग नऊस्तोवर तपास केला
ताईची हरवली पीन
बोलणी खाण्यात अर्धातास गेला
मग नऊस्तोवर तपास केला
तात्पर्य - आठ वाजताच अभ्यास झाला. बाकी कंजुशीवर घसरलात तर पुढे पाणीही विचारणार नाहीत. wink emoticon
Friday, March 06, 2015
'उत्क्रांती'
माकडांची उत्क्रांती झाली,
भाषा आली, शेपूट गेले,
झाडांवरतून उतरून मग
एकमेकांच्या छाताडावर चढले
भाषा आली, शेपूट गेले,
झाडांवरतून उतरून मग
एकमेकांच्या छाताडावर चढले
एकेकाळी मुक्त विहरती
जे झाडांच्या शिखरांवरती
मोठ्या मोठ्या उड्या मारती
हल्ली ते निष्कर्षांवरती
जे झाडांच्या शिखरांवरती
मोठ्या मोठ्या उड्या मारती
हल्ली ते निष्कर्षांवरती
फिरत नागडे तरी कधीही
इज्जत त्यांनी लुटली नाही
पण मग चढले कपड्यांचे थर
तरी वासना सुटली नाही
इज्जत त्यांनी लुटली नाही
पण मग चढले कपड्यांचे थर
तरी वासना सुटली नाही
त्या आधी पृथ्वीवर जेव्हां
डायनोसॉर बोकाळले होते
उल्कांच्या दैवी डस्टरने
पृथ्विफळ्याला पुसले होते
डायनोसॉर बोकाळले होते
उल्कांच्या दैवी डस्टरने
पृथ्विफळ्याला पुसले होते
शंभर वर्षांपूर्वी देवा
तशीच संधी तुजला होती
पण तू विज्ञानाचे कोलीत
देऊन बसला माकडा हाती
तशीच संधी तुजला होती
पण तू विज्ञानाचे कोलीत
देऊन बसला माकडा हाती
उलट्या उत्क्रांतीची आता
वर तू बसुनी मजा पहा
देह नराचा, आत्मा माकड
माणुसकीचा ॐफट् स्वाहा!
वर तू बसुनी मजा पहा
देह नराचा, आत्मा माकड
माणुसकीचा ॐफट् स्वाहा!
Tuesday, March 03, 2015
राजपुत्राची घर-वापसी
इंद्रप्रस्थात झालेल्या प्रतिपानीपतच्या-चवथ्या-लढाई नंतर राजपुत्र गायब झाला होता. राजमाता मम्मीमॅडमवर तडिताघात झाला. आत्ता कुठे राजवस्त्रं त्यागून ती वानप्रस्थाला जाणार तो तिच्या क्लांत हातांत राज्यशकटाचे दोर परत येऊन पडले.
दौलतीची झीज तिळातिळाने होत होती. गुर्जरकुंजर नरेन्द्रवर्मांच्या सैन्याने मोठ्या महसुलाचे सगळे सुभे काबीज केले होते. तंजावर प्रांतीच्या मांडलिक जयंतीराजे राजपुत्र आणि जुन्या सरसेनापतींवर चिडून वेगळ्या झाल्या होत्या.
दौलतीत कुठेच काही घडत नव्हतं. विरंगुळा म्हणून सुभ्यांचे सुभेदार बदलून झाले. दख्खनेच्या सुभ्यावर माहूरगडाचा सरदार आल्यापासून तळकोकणच्या सरदाराने निर्वाणीचा चौथा इशारा दिल्याचं ऐकलं. राजमाता खूप दिवसात एव्हढी हसलेली पाहिली नाही. त्यानंतरही हसलेली कुणाला दिसली नाही. ती बेपत्ता राजपुत्राच्या चिंतेत आकंठ बुडाली होती.
प्रजेला राजपुत्राचं जाणं कळलं होतं. कुणी म्हणालं 'तो चवथ्या लढाईत धारातीर्थी पडला'. कुणी म्हणालं, 'नाही. त्याचा देह पडला नाही, पळाला. त्याच्या कोमल कांतीवर एक ओरखडा नाही, तो सुखरूप आहे.'
काळ थांबत नाही. कुणी म्हणालं राजकन्येलाच उत्तराधिकार देऊन राजमाता आपल्या माहेरी विठुकान्ह देशात नामस्मरणात कालक्रमण करतील. या बातमीने राजकन्येच्या फळीतील सरदार मोहरले. पण खुद्द राजमाता काहीच बोलत नव्हती.
इथे दुःखी प्रजेला राजकुमार दिसल्याचे साक्षात्कारही होऊ लागले. कुणी म्हणालं, 'तो गंगोत्रीच्या मुखाशी शांभवी उपचार घेत आहे', कुण्या बंदरावरील द्वारपाल म्हणाला, 'राजकुमाराने वेशांतर करून यवद्वीपाकडे जाणारं एक गलबत गाठलं'. यवद्वीपावरील गणिकांची ख्याती भरतखंडात सर्वदूर होती. असो.
आणि एकेदिवशी राजधानीतील जनपथावर हाहाकार उडाला. साक्षात राजपुत्राच्या आगमनाच्या वार्तेने लोकांची प्रासादावर रीघ लागली. तेच लोभस बालसुलभ रूप, तसाच पिंगट केशसंभार, तसेच शांभवनेत्र, तीच श्वेतपास्तकांती, कपोलांवर तसेच श्मश्रुखुंट, शेकडो तरूणींना बुडवणारी हुबेहूब कपोलखळी. आनंदभरित राजमाता आरतीचं तबक घेऊन, दुखर्या गुडघ्यांची तमा न बाळगता करकर धावत आली.
राजमातेचे एकनिष्ठ सरदार जयराम संशयमुद्रा धारण करते झाले. राजपुत्राला सदरेवर थांबवून राजमातेला म्हणाले, 'राहुकाळ उलटेस्तोवर क्षेमकुशल पुसणे अशुभ असे. आपण देवडीत बसावे, आम्ही सदरेवर त्यांच्या फलाहाराची सोय करतो.'
लगोलग दोन हशम येऊन राजपुत्राला धरायला आले. त्यांच्या कळकट हस्तस्पर्षाने राजपुत्राची पांढरीशुभ्र बाराबंदी मळकट झाली. त्याने असा एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकला, की खुद्द हशम दचकले. जेव्हां राजपुत्राने तोर्यात दोन्ही बाह्या झटकून वर केल्या, खुद्द सरदार जयरामांचा संशयही क्षणमात्र फिटला.
राजकुमाराने श्वेतवस्त्राआड झाकलेले बलदंड बाहू वर करून आज्ञा केली, "आता पकडा. वस्त्रे डागाळली तर देहदंड घडेल!". क्षणभर चपापलेल्या जयरामांनी म्हटलं,
"महाराजकुमार, बसा. यात्रा कशी झाली?"
"कसली यात्रा? या चिंतनावकाशात अंतर, काळ, कशाचं भान राहिलं नाही. किती मोत्ये खोटी निघाली, किती नाणी झिजली, इभ्रतीचा खुर्दा किती उडाला त्याची गणतीच नाही! सेनापति अजयकुमारांनी नावालाच हरताळ फासला, आम्ही अंबारीतून सगळं पाहिलं!"
"महाराजकुमार, बसा. यात्रा कशी झाली?"
"कसली यात्रा? या चिंतनावकाशात अंतर, काळ, कशाचं भान राहिलं नाही. किती मोत्ये खोटी निघाली, किती नाणी झिजली, इभ्रतीचा खुर्दा किती उडाला त्याची गणतीच नाही! सेनापति अजयकुमारांनी नावालाच हरताळ फासला, आम्ही अंबारीतून सगळं पाहिलं!"
"ते विसरा महाराज. आता रियासतीची नव्याने घडी बसवायची आहे. मातांनी आपल्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी आपल्याला शपथेवर काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. युद्धावरून परतलेल्यांचा रिवाजच आहे तो, माझा निरुपाय आहे. ही तुळशी हाती धरा."
"तुळशी? ई! ती तर नरेन्दवर्मांची आवडती पत्री आहे! आम्हाला नको ती! आम्ही आता गंगोत्रीवर मजेशीर पत्री पाहिली. तिची शपथ खाऊन तुम्ही लिहून द्याल ते बोलू!"
"राजकुमार!" सुटलेल्या संयमावर लगाम देत जयराम वदले, "हास्यविनोदाचा हा प्रसंग नाही. मम्मीमॅडमला लवकर भेटायचंय ना?" असं विचारत त्यांनी राजपुत्राहस्ती तुलसीदले कोंबिली.
"सांगा- भरतखंडाला दूध कुणी दिले?"
"गुर्जरगोमातांनी!" राजपुत्र शांतपणे म्हणाला.
"सांगा- 'एका दिवशी मी रात्री उठलो' या विधानातील विसंगती काय?"
"हेहे! दिवसा रात्र असते का? काहीही!"
"राजकारण कुठल्या वस्त्रांमध्ये दडले आहे?"
"राजकारण आणि वस्त्राचा काय संबंध? राजकारण आपल्या मेंदूत आणि हृदयात दडले असते!"
"आता शेवटचा प्रश्न- ओळ पूर्ण करा.... 'बोलते जे 'अर्णव'"
"पीयुषाचे!"
"काय? 'अर्णव'वरून तुम्हाला बाकी काहीही आठवू नये?"
"काय??"
"गुर्जरगोमातांनी!" राजपुत्र शांतपणे म्हणाला.
"सांगा- 'एका दिवशी मी रात्री उठलो' या विधानातील विसंगती काय?"
"हेहे! दिवसा रात्र असते का? काहीही!"
"राजकारण कुठल्या वस्त्रांमध्ये दडले आहे?"
"राजकारण आणि वस्त्राचा काय संबंध? राजकारण आपल्या मेंदूत आणि हृदयात दडले असते!"
"आता शेवटचा प्रश्न- ओळ पूर्ण करा.... 'बोलते जे 'अर्णव'"
"पीयुषाचे!"
"काय? 'अर्णव'वरून तुम्हाला बाकी काहीही आठवू नये?"
"काय??"
जयरामांचा चेहरा क्रोधित झाला. त्यांची आरोळी प्रासादात घुमली, "पकडा ह्या द्रोह्याला! आणि चार वर्षं कोठडीत डांबून ठेवा!"
जयराम लगोलग राजमातेकडे गेले, "माते, काळीज कठोर करून ऐकावं, हा आपला राजपुत्र नसून एक अत्यंत मेधावी तोतया आहे!"
राजमातेवर दुसरा तडिताघात झाला. तिच्या हातातलं तबक कलंडून जमीनीवर पडलं, तबकातील केशरी-पांढर्या-हिरव्या गुलालाच्या वाट्या इतस्ततः विखुरल्या.
माता अश्रु पुसत म्हणाल्या, "तुमची गर्जना प्रासादात घुमली तेव्हांच मला कल्पना आली. पण त्याला चार वर्षं डांबायला का सांगितलं? आत्ता वढेरबुरुजावरून कडेलोट करूयात त्याचा!"
जयरामांनी मातेकडे रोखून पाहिलं, "माते, शांत!"
"तोतया अत्यंत मेधावी आहे. महाराजकुमार परतले, तरी चार वर्षांनंतरच्या युद्धात या चतुर तोतयालाच उभं केलं, तरच काही सुभे परत मिळण्याची आशा आहे!"
राजमातेवर तडिताघाताची हॅटट्रिक झाली, पण ती पुन्हा हसली. तळकोकणातील चवथ्या बंडाळीच्या वर्दीनंतर हसली ना, हुबेहूब तशीच.
- योगेश
Friday, January 02, 2015
निर्धाराची हुरडा पार्टी
नागमोडी वळणं घेत एक पजेरो जिल्ह्याकडे परत निघाली होती. तारवटलेल्या डोळ्यांचा संग्रामसिंह स्टीअरिंगचा आधार घेत समोरून येणारे ट्रक चुकवत होता. मागे शाखेतले तीन मित्र, आणि डावीकडे जिगरी दोस्त- उपशाखाप्रमुख बसला होता. कार फ्रेशनरने आंबूस ढेकरांसमोर कधीच मान टाकली होती. मागच्या सीट्सवर झोपेत डोलणाऱ्या एक-एक माना जाग्या होऊन नव्या वर्षाचे व्हॉट्सॅप्प उघडून पाहत होत्या.
“च्यामायला, दर स्टेटस-मेसेजमधी ‘निर्धार-निर्धार’ लयीच यायलंय! ‘वजन कमी करायचा निर्धार’, ‘रोज पळायचा निर्धार’, ‘बचतीचा निर्धार’! कायतरी ठरवायचं त्याला निर्धार म्हनायलेत. पन ‘निर्धार’चा अर्थ नक्की काय आसतोय?”
“पाह्य. ज्या ठरावाला धार नसती त्यालाच निर्धार म्हणतात! एक जानेवारीला केलेला निर्धार नऊ जानेवारीपलिकडं टिकला, तर म्याटर शीरेस हाय, एरव्ही काय, आपल्या समोरच्या शाखेच्या साहेबांनी निर्धार मेळावा भरवलाच होता! जानेवारीच्या आधी पर्चारात ‘निर्धार’’निर्धार’ ऐकलं नाही? स्वच्छतेचा निर्धार करून, झाडू-हातमोजे घेऊन आपन फेसबुकवर शाखेचे फोटू टाकले न्हाई? हे निर्धार प्रकरन इंटरनॅशनलबी आसतंय, ते पाकिस्तानात पोरं मारल्यावर त्यांच्या सरकारनंबी टेर्रिष्ट टांगायचा निर्धार केलाच की! त्या हॉटेलपासच्या शाखेच्या मोठ्या सायबांचा बी एक निर्धार व्हता- ‘रडायचं नाही, लढायचं’. मंग कित्ती रडले आठव!! निर्धार हुरड्यासारखा असतो. तो कवळाच एन्जॉय करून संपवायचा. त्याची ज्वारी झाली की चावतचावत रेटावा लागतो! ए हेकन्या… ऐकतो का झोपला?”
मागून तिसरा आवाज आला... “ऐकतोय. तुमचं ऐकत यानं फेसबुकवर लिक्कर कोटा कमी करायचा निर्धार टाकलाय. पयला लाइक वहिनींचाच आला. जाग्याच होत्या जनू!”
नागमोडी वळणं घेत पजेरो वहिनींच्या घराकडे निघाली.
--------------
एक जानेवारीचा कोंबडा, आरवलाच नाही. डोळ्यावर कोवळं ऊन आलं, तेव्हां चंद्रीनं घोंगडी नाकावरून हनवटीवर घेतली. एक डोळा उघडून बाजूला पाह्यलं. दमलेली कार्टी शिमिटाच्या खोप्यामध्ये एका गोधडीखाली एकामेकांना मांजरीच्या पिलासारखी गुरगुटून निजली होती. बिनबैलाच्या तिरक्या गाडीत धनी अजून तिरका होऊन झोपला होता. धुळकट अंगणात पजेरोची चाकं उमटून गेली होती.
आंबलेलं अंग उचलून चंद्री झाडायला उठली, तर अंगणापलिकडून सगुणा खोचकपणे हसताना दिसली. "पार्टी झ्याक झाली म्हनं!". चंद्री अर्धवटपणे "असं? हां..." म्हणून पेंगतच झाडू लागली.
धन्याची शेतावर पिकं पाजायची वेळ, पण पाजायला पिकं, शेंदायला पाणी, पंपाला वीज आणि धन्याला जाग नव्हती. चंद्रीचा मेंदू जागा झाला, तशी त्या लोडशेडिंगमध्ये डोक्यातली ट्यूब पेटली. काळ्या आरवला नाही, कारण त्याने शेवटचा आवाज काल काढला होता. लाली कोंबडी आणि तिची पिलंबी कोंबड्यामागं गेली. त्या सगळ्यांची पिसं मागच्या केरात किंगफिशरच्या बाटल्यांमधी पडली होती.
अंगणातल्या धुळीची, शेकोटीत राख झालेल्या ज्वारीची मूठमाती काळ्या-लाली-पिल्लांना देऊन चंद्री भांडी करायला वळली. खरकट्यात टाकलेल्या पाऊण-पाऊण भाकरी, आख्ख्या कुरड्या, पापडं, दोन वाटी खर्डा वेचून बाजूला केला. भांडी केल्यावर चुलीत सरपण टाकलं, उष्ट्या भाकरी आगीतून काढून कुस्करल्या. पोरांच्या न्याहारीची सोय झाली.
वर्षाचा पहिला दिवस प्रसन्न उजाडला होता. एका अर्धमेल्या हंगामातनं, पार्टीतनं दोन महिन्यांचा प्रश्न सुटला होता. ज्वारी वाळतांनाही नवऱ्याने ऍसेफेटच्या बाटल्या हट्टाने जपून ठेवल्या, तेव्हांच चंद्रीचा ठोका चुकला. तिनेच त्या बाटल्या विकायचा हट्ट धरून बीअरच्या बाटल्या आणवल्या. मन जड करून सगळा हुरडा उपटून काढला. थोडी उसनवारी वाढवून शेतात हुरडा पार्टीची पाटी लावली.
हुरड्यावेगळी उरलेली ज्वारी दुभत्या जनावरांना घालून ती जगवली. त्यांच्या दुधावर थोडी थोडी उधारी फेडली. पहिला आठवडा तोट्यात गेला. हुरडा साठवायला-टिकवायला जागा नव्हती. चंद्रीनं हातपाय गाळून बसलेल्या नवऱ्याला उठवलं, शहराच्या बायपास रोडवर हुरडा विकायला सुरुवात केली. शहराकडचा खप आणि पार्टीचे पैसे साठत गेले. हुरडा कमी होत गेला. 31च्या रात्री उरलेला हुरडा संपला. पोरांची न्याहरी करवून शाळेत मास्तरांकडं थकलेली फी देऊन पोरांना पाठवलं.
अंघोळ करून, धन्याला उठवून ती दिवा लावायला देवाच्या कोनाड्यात आली. कुंकू लावत म्हणाली. “म्या हातपाय गाळायची न्हाई. यान्ला औषधाजवळ फटकू द्यायची न्हाई. उन्हाळ्याचं तंवा बघू. इतकं पार पाड अंबाबाई!”
‘हॅप्पी’, ‘न्यू’, ‘इयर’, ‘निश्चय’, ‘निर्धार’, ‘रेसोल्यूशन’- असली काहीही अडगळ चंद्रीच्या शब्दकोशात नव्हती.
Thursday, November 20, 2014
:)
वैरमुथू नामक तमिळ गीतकारामुळे आणि रहमान-इलयराजा सारख्या लोकांमुळे तमिळ आवडू आणि किंचित कळू लागली.
गाडीत एकटा पॅसेंजर असलो की मी माझी खास प्लेलिस्ट उघडतो. हिंदी बॉलिवुड नसलेली. काही रहमान आणि इलयराजाची दाक्षिणात्य भाषांमधली...
माझा ड्रायव्हर वैतागल्यासारखा विचारतो,
"साहेब हे मद्राशी आवाज ऐकून काय मिळतं? ते काय बोलतात ते कळतं तरी का?"
"साहेब हे मद्राशी आवाज ऐकून काय मिळतं? ते काय बोलतात ते कळतं तरी का?"
मी विचारतो- "तुला बीपी बघतांना फरक पडतो का इंग्लिश, रशियन, चायनीझचा? हे तसलंच काहीतरी आहे!"
त्याच्या चेहर्यावर साक्षात्काराचं दिव्य तेज झळकतं आणि गाडीचा वेग दहा ने वाढतो. smile emoticon
वैरमुथूवर भारतातले सगळे गीतकार ओवाळून टाकावेत,
आणि रहमानवर बॉलिवुडचे सगळे संगीतकार!
त्यांच्याच शब्दस्वरांनी सजलेल्या इरुवर चित्रपटातलं हे गाणं.
---------------
मधुकलिके, मधुकलिके
क्षणभर थांबून बोल ना,
ओठपाकळ्या उमलवुनी
गूज मनाचे खोल ना,
पुनवेला चंद्रातळी
चमचमत्या सरिताजळी
मोती उधळी ओंजळी,
ती तू, ना?
क्षणभर थांबून बोल ना,
ओठपाकळ्या उमलवुनी
गूज मनाचे खोल ना,
पुनवेला चंद्रातळी
चमचमत्या सरिताजळी
मोती उधळी ओंजळी,
ती तू, ना?
नरवीरा, नरवीरा,
इथे पहा क्षण चार, ना,
शुभ्रवारू हा थांबवुनी
झेल नयन तलवार, ना!
पुनवेला चंद्रातळी
चमचमत्या सरिताजळी
मजला ओलेती न्याहाळी
तो तू, ना?
इथे पहा क्षण चार, ना,
शुभ्रवारू हा थांबवुनी
झेल नयन तलवार, ना!
पुनवेला चंद्रातळी
चमचमत्या सरिताजळी
मजला ओलेती न्याहाळी
तो तू, ना?
भृकुटीतल्या मदन-शराने
हृदयभंग केला
तुझ्या कटाक्षाने,
राया, मम रतीरंग आला,
चांदण्यात चिंब काया
स्वप्नी येऊनी छळते
झुरते मीही, हुरहुरते
कटीची मेखला तशी गळते
देह वेगळे, देश वेगळे
जीव कसे जडले?
दोन जिवांचे एकच स्पंदन
नवल कसे घडले?
तुझ्या एक स्पर्षमात्रे
गात्र गात्र मोहरले
नदीवर थबकले
जलद जसे
पाणी पाण्यामध्ये
जसे विरघळले
Wednesday, November 19, 2014
Teachers don't die
My dearest teacher from primary school in Nagpur,
left this mortal world, early last month.
'Madam V' killed a part of my personality with her,
but much against her wishes, she didn't entirely die.
She lives in this writer, and countless of his batchmates.
Madam V was poise and grace in flesh and blood.
She rapped my knuckles ruthlessly for unfinished homework,
but the medal she gave me for winning a vocal competition, has outlived those bruises.
Her eyes conveyed warmth and wrath impartially.
An average child coming to Nagpur from a much smaller town,
could've easily withered away in the cultural shock and academic pressures of a 'big city'.
She pointed at my bleak future in Maths, but urged me to sing, sing and sing.
She knew what each of us kids was great at, while tasking us to catch up with our weaknesses.
She helped a child survive. She saved the man he'd grow up to be. She saved a life.
Many lives...
She cut the recess of two more like me.
She sat back with us to work upon our cursive writing,
to dot our 'i's and cross our 't's.
She is every loop and slant my hand writes today.
She rivalled mom in storytelling skills...
... an art somehow related to my bread and butter.
Ma'am, too bad you thought this world was no longer fit for you,
for you made us fit for the world.
Too bad you chose to cease to be,
for you shaped our very being.
Too bad you chose to die,
for you won't die, until I do!
... Or maybe not, because I've passed on to someone else,
a little of what you passed on to me.
You won't die until that chain dies.
Teachers don't die.
Teachers can't die.
:'(
एका तिखट माणसाचं पुण्यस्मरण
अप्पा,
तुम्ही तुमचं हॉटेल आणि जग सोडल्याच्या दोन वर्षांत त्याची ही अवस्था होईल असं माझ्यासारख्या गिर्हाइकाला स्वप्नातही वाटलं पटलं नसतं.
हॉटेलची पुण्याई त्याच्या वातावरणाने आणि पदार्थाने निभत असेल, पण त्या पदार्थाची चव घडवणारा हात थांबला की उतार सुरू होतो.
हे तुमच्या मुलाला कळतं तर दुसरं काय हवं होतं? तुमच्यानंतर दोन वर्षांनीही तुमचा मुलगा जेव्हां अकराआधी गल्ल्यावर बसत नाही, सुजलेल्या डोळ्यांनी गिर्हाइकांशी बोलतो, तेव्हा हॉटेलाची पुण्याई त्याच्या बटाटेवड्यातच आहे हे कळतं.
बटाटेवड्याचा फॉर्म्युला तुमचाच, पण तुमच्या हाताखाली शिकलेले आचारी तुमच्याच हयातीत दुसर्या हॉटेलांकडे वळू लागले होते. तुमचा मुलगा वडे करवून घेतो हे खरंय, पण खाणारे तुमच्या हाताची चव शोधायला येतात हे त्याला अजूनही कळलं नाही. तुमच्याच झणझणीत चटणीचा फॉर्म्युला पळवून तुमच्याच हॉटेलची शाखा थाटणार्या पुतण्यालाही वड्याचं मर्म कळलं नाही. तुमच्या हॉटेलात आता वडे जास्त खपत नाहीत बरं!
यात चूक तुमच्या मुलाचीही नाही. आज काय शिजतंय हे पाहायला तो पहाटे किचनमध्ये येत नाही. तुमच्या फळीवर खडूने रोजचे पदार्थ लिहिणारा तो आचारी, कधी तेलकट, कधी तिखटजाळ, कधी मिळमिळीत, कधी आंबूस रांधून परस्पर खपवतो असा जुन्या खवय्यांना संशय येतो. तुमच्या हॉटेलातले वेटर, पाणके, हेही गिर्हाइकाशी फटकून तुमच्या मुलाशीच गल्ल्यावर सलगी करतात. चांगल्या पगारावर हॉटेल सोडतात, किंवा नवखे चांगल्या पगारासाठी येतात. गिर्हाइकाचा चेहरा पाहून न सांगता पदार्थ वाढणारे वेटर तुमच्याच आगेमागे जाऊ लागले.
नाही म्हणायला तुमचा नातू अधूनमधून गल्ल्यावर येतो, त्याला म्हणे 24 तास हॉटेल काढून नेहमीच्या मराठी पदार्थांबरोबर कॉन्टिनेन्टल मेन्यु काढायची इच्छा आहे. पण रंग उडालेल्या प्लेट्समध्ये बेक्ड बीन्स, आणि कपच्या उडालेल्या कपबशीत हॉट चॉकलेट विकून चालणारे का?
नवनवी हॉटेलं उघडतायत तुमच्याच गल्लीत. दादर-माहिमच्या मधल्या कुठल्याशा हॉटेलात नागपुरी-सावजी आणि गोवन जेवण जोरात विकतंय. तुमच्या हॉटेलाने नवनवे पदार्थ वाढवले नाहीत, तरी
आहेत ते पदार्थ बनवणारे टिकवले असते तरी तुमची गर्दी ओसरली नसती.
आहेत ते पदार्थ बनवणारे टिकवले असते तरी तुमची गर्दी ओसरली नसती.
आम्ही आजही येऊन तुमच्या हॉटेलात आमच्या अनमोल दिडक्या खर्चतो, कारण समोरचा वडा शिळापाका असला, तरी गल्ल्यावर तुमचा फोटो दिसतो. घासागणिक त्या फोटोतून तुमचा करारी
आवाज आठवतो.
आवाज आठवतो.
आमचा पैसा तुमच्या सख्ख्या कुटुंबाच्या गल्ल्यात तोवर पडेल जोवर तुमच्या हातचं मीठ खाल्लेले खवय्ये जिवंत आहेत. पुढे दुसरी हॉटेलं शोधणं अटळ आहे. तुमच्यानंतर दोन वर्षं तुमचं हॉटेल सोडलं नाही. आता किती वर्षं, पाहूयात.
तुमच्याच वड्याने तृप्त,
जुना गिर्हाइक
जुना गिर्हाइक
Saturday, November 08, 2014
चुंबन
विदेश जाते बेटे के गाल,
डोली में रोती बेटी के माथे,
वॉर्ड में लेटे अपने की हथेली,
कांपते होठों से ताज़ा-गीली कब्र पर,
पब्लिक चुंबन मना हो!
डोली में रोती बेटी के माथे,
वॉर्ड में लेटे अपने की हथेली,
कांपते होठों से ताज़ा-गीली कब्र पर,
पब्लिक चुंबन मना हो!
Saturday, November 01, 2014
एका आईला अखेरचं पत्र
रेहाना जब्बारी. तुमच्या-आमच्या वयाची इराणी मुलगी. आपल्यावर चालून आलेल्या बलात्कार्याला मारल्यामुळे तिला फासावर लटकवण्यात आलं. इराणी दंडविधानात 'क़िसा' कलमं आहेत (जशास तसा शेवट). या कलमाखाली रेहानाची फाशी ठरली.
फाशीची तारीख एप्रिल 2014 ठरल्यावर मायलेकींना एक तास भेटू देण्यात आलं. तेव्हांही आईने रेहानाला फाशीबद्दल सांगितलं नसल्याचं पत्रातून कळतं. पुढे या शिक्षेविरुद्ध जागतिक मोहीम आणि 20,000 सह्या पुढे आल्यावर शिक्षा ऑक्टोबरपर्यंत टळली.
तिथे, मयताच्या कुटुंबाने खुन्याकडून रोख भरपाई पत्करली तर फाशी रद्द करण्याची तरतूद आहे. इराणी न्यायमंत्र्यांना या 'सुखांताची' आशा होती. पण मयताच्या कुटुंबाने ती भरपाई नाकारली, आणि अखेरीस रेहानाला चार दिवसांपूर्वी फासावर लटकवलं.
'त्या' शेवटच्या भेटीनंतर रेहानाने आपल्या आईला, शोलेहला लिहिलेल्या या शेवटच्या पत्रात मन मोकळं केलंय.
-------------------------
प्रिय शोलेह,
क़िसा कलमांना सामोरं जायची पाळी आल्याचं आज मला कळलं. माझा ग्रंथ आटोपतोय, आणि हे तूच मला कळवू नयेस, हे मला लागलंय. मला याची कल्पना यावीशी तुला वाटत नाही? तुझ्या आणि बाबांच्या हातांवर ओठ टेकवायची ती माझी एकुलती संधी तू का घालवलीस?
या जगात 19 वर्षं सुरळीत गेली. त्या काळरात्री खरंतर माझंच मरण यायला हवं होतं. माझा देह एखाद्या रस्त्यात पडला असता, पोलीस तुला ओळख पटवायला घेऊन आले असते, आणि तिथेच तुला माझ्यावर बलात्कार झाल्याचंही कळलं असतं. माझ्या खुन्याकडे सत्ता-संपत्ती असल्याने तो निर्धास्त सुटला असता, आणि तूही उरलं आयुष्य लाजेत आणि त्रासात घालवून मेली असतीस. प्रश्नच मिटला!
पण इथेच घात झाला. माझा देह रस्त्यावर पडला नाही, तो जिवंतपणीच एविन जेलच्या थडग्यात- तिथल्या कोठडीत सडला, आणि तिथूनही शहर-ए-रायच्या कारागृहात रवाना झाला. आपण सगळं स्वीकारून निमूट रहावं. मृत्यूपलिकडेही आयुष्य आहे हे तूही जाणतेस.
आपण या जगात काहीतरी अनुभवायला, शिकायला येतो, आणि प्रत्येक जन्माचा एक हेतू असतो ही तुझीच शिकवण आहे. मी हे शिकले, की आपल्याला प्रसंगी लढावं लागतं. माझ्यावर चाबूक ओढणार्या माणसाला थोपवायला एक गाडीवाला पुढे आला, आणि तोंडावर चाबकाचा फटका खाऊन तोच जिवाला मुकल्याचं तू मला सांगितलंस. एखाद्या तत्वासाठी जीव ओवाळायचीच ती शिकवण होती.
शाळकरी वयातही, "संघर्षाच्या-तक्रारींच्या प्रसंगातही बाईने बाईसारखं राहावं" हे तू शिकवलं होतंस. आमच्या वर्तनाकडे तुझा किती रोख असे हे आठवतंय ना? तुझा अनुभवच चुकीचा होता. मी गोत्यात पडले तेव्हां ही शिकवण माझ्या कामी आली नाही. कोर्टात सगळ्यांसमोर मला सराईत खुनी आणि गुन्हेगारासारखंच रंगवलं गेलं. मी टिपं गाळली नाहीत. मी रडले-भेकले नाही, कारण कायद्यावर माझा विश्वास होता.
माझ्यावर करूनसवरून साळसूद असल्याचा ठपका पडला. आठव, मी डासांनाही मारत नसे, झुरळांचीही शेंडीच पकडून त्यांना लांब टाकत असे. पण सगळ्यांसमोर मी खुनी ठरले. जनावरांशी माझी धिटाई 'पुरुषीपणा' समजली गेली, पण मला 'पुरुषी' ठरवतांना माझी लांबलचक-रंगलेली नखं पाहायची तसदीही जजसाहेबांनी घेतली नाही.
अशा न्यायमूर्तींकडून न्यायाची अपेक्षा करणारा खरंच प्रचंड आशावादी असावा. त्यांना हे जाणवलंच नाही की माझे हात एखाद्या खेळाडूसारखे घट्टे पडलेले नाहीत. ज्यावर प्रेम करायला तू मला शिकवलंस, त्या देशाला मी नकोशी झाले होते. चौकशीदरम्यान नाही-नाही ते शेलके शब्द मला रडवत होते तेव्हांही माझ्यासाठी कुणीच धावून आलं नाही. माझ्या सौंदर्याची शेवटची खूण- माझे केस भादरल्यानंतर- मला 11 दिवसांचा एकांतवास फर्मावण्यात आला.
शोलेह- हे वाचून रडू नकोस. तुरुंगाच्या पहिल्या दिवशी एका म्हातार्या शिपायाने माझ्या नटव्या नखांसाठी मला मारलं, मी समजून चुकले की या युगात ना देखणेपणाची किंमत आहे, ना वैचारिक सौंदर्याची, ना सुंदर अक्षराची, ना दृष्टिसौंदर्याची, ना मंजूळ आवाजाची.
आई, माझी विचारसरणी बदलल्येय, पण त्यात तुझी चूक नाही. हे लांबणारं मनोगत मी एकांच्या हवाली करत आहे, जेणेकरून तुला न कळवता मला संपवलं, तर हे तुझ्यापर्यंत पोचावं. माझी एव्हढीच एक खूण तुझ्याकडे राहील.
मरण्यापूर्वी एकच मागते. हा एक हट्ट तुला जमेल तसा, आणि जमेल तितका पुरव. हा हट्ट या जगाकडे, या देशाकडे आणि तुझ्याकडे करत आहे. तो पुरवायला तुला वाट वाकडी करावी लागेल.
ही शेवटची इच्छा लगेच लिहीत आहे. न रडता ऐक. हे माझं मागणं कोर्टापर्यंत पोचव. तुरुंगाधिकार्यांच्या मंजुरीशिवाय हे असलं पत्र बाहेर पडू शकणार नाही, म्हणून तुला पुन्हा माझ्यापायी त्रास होईल. पण या एका मागणीसाठी तुला हातही पसरावे लागले तरी माझी हरकत नाही. माझा हा हट्ट पुरवायला हात पसर, पण माझ्या जिवाची भीक मागायला हात पसरू नकोस.
माझे आई, प्राणापलिकडचा माझा तो हट्ट हा आहे, की मला मरून मातीत सडायचं नाही. माझ्या डोळ्याची किंवा तरूण हृदयाची माती होऊ नये. मी फासावर गेल्यागेल्या माझं हृदय, मूत्रपिंड, डोळे, हाडं, वापरता येण्याजोगा एकूण एक अवयव गरजूंकडे पोचता व्हावा. माझे अवयव पावलेल्यांनी मला ओळखावं, माझ्यावर फुलं उधळावीत किंवा माझ्यासाठी गार्हाणं मागावं अशीही माझी इच्छा नाही.
मी मनापासून तुला सांगतेय, माझं थडगं बांधून त्यावर रडत-कुढत बसू नकोस. मी गेल्याचे काळे कपडे घालू नकोस. माझा पडता काळ विसरायचा प्रयत्न कर. मला वार्याच्या हवाली कर.
जगाने आपल्यावर प्रेम केलं नाही. माझ्या नशिबाशी त्यांना देणंघेणं नव्हतं. मी नशिबावर हवाला सोडून मृत्यूला कवटाळतेय. देवाच्या कचेरीत मी इन्स्पेक्टरांवर फिर्याद भरणार आहे. इनस्पेक्टर शामलू, कनिष्ठ न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती... जिवंत असतांना मला मारणार्या, मला ओरबाडणार्यांवर मी फिर्याद करणार आहे.
नियंत्याच्या दरबारात मी डॉ. फ़र्वन्दींवर, क़ासेम शाबानींवर, जाणते-अजाणतेपणी, खोटारडेपणाने माझे हक्क तुडवणार्या, आणि आभासाला वास्तव मानून न्याय सुनावणार्या सर्वांवर खटला भरेन.
माझे कोमलहृदयी माते, त्या जगात आपण फिर्यादी असू, आणि इथे फिर्यादी असलेले तिथे आरोपी असतील. पाहूयात, देवाच्या मनात काय आहे. मला तुझ्या कुशीत मरायचं होतं.
I love you.
Sunday, October 26, 2014
दिवाळीनंतर
गावी राहणारे आईबाबा,
गावी परतून जातात,
तेवत्या पणत्यांमध्येही
अंधार सोडून जातात
गावी परतून जातात,
तेवत्या पणत्यांमध्येही
अंधार सोडून जातात
आईच्या हातच्या करंज्या,
मागे डब्ब्यात उरतात,
पोटात जाण्याऐवजी,
घशातच अडकून जातात
मागे डब्ब्यात उरतात,
पोटात जाण्याऐवजी,
घशातच अडकून जातात
बाबांचे दोन शर्ट,
कपाटात विसरून जातात,
सकाळी घर बंद करतांना,
कोंडल्यासारखं वाटायला लावतात
कपाटात विसरून जातात,
सकाळी घर बंद करतांना,
कोंडल्यासारखं वाटायला लावतात
गावाला राहणारे आईबाबा,
गावी परतून जातात,
पोचल्याचा फोन येईपर्यंत
पोरकं करून जातात.
गावी परतून जातात,
पोचल्याचा फोन येईपर्यंत
पोरकं करून जातात.
Sunday, October 12, 2014
Bolly Logic
'18 बरस का कंवारा केला था'
should not bother you if you found nothing unfair, objectifying, stereotyping in
'18 बरस की कंवारी कली थी'
should not bother you if you found nothing unfair, objectifying, stereotyping in
'18 बरस की कंवारी कली थी'
smile emoticon
Monday, September 15, 2014
एका दुष्काळाचा री-टेक
-----------------------------
तसंच सांगावं, तर हा फक्त दुष्काळावरचा लेख नाही. तसंच सांगायला जावं, तर ही फक्त एक डॉक्युमेंटरीची चित्रकथाही नाही. एका हत्तीचं वर्णन दहा आंधळ्यांनी दहा परींनी केलं. याही कथेत काही डोळस आंधळे आहेत, ते जे पाहताहेत, ते त्यांना दिसत नाहीये. हा त्यांचा एका परिस्थितीतला अदृश्य-अलिप्त वावर आहे. वाचकालाही यात नसलेलं दिसून आलं, किंवा असलेलं दिसलं नाही तरी आश्चर्य वाटू नये. या कथेतली सगळीच नावं-गावं-वस्तू-प्राणी-पात्रं काल्पनिक नाहीत. यातल्या कुणाचंही कुणाशीही साम्य आढळून आलं, तर तो एक योगायोग आहे. नाही आढळलं, तर तोही एक योगायोगच आहे.
तसंच सांगावं, तर हा फक्त दुष्काळावरचा लेख नाही. तसंच सांगायला जावं, तर ही फक्त एक डॉक्युमेंटरीची चित्रकथाही नाही. एका हत्तीचं वर्णन दहा आंधळ्यांनी दहा परींनी केलं. याही कथेत काही डोळस आंधळे आहेत, ते जे पाहताहेत, ते त्यांना दिसत नाहीये. हा त्यांचा एका परिस्थितीतला अदृश्य-अलिप्त वावर आहे. वाचकालाही यात नसलेलं दिसून आलं, किंवा असलेलं दिसलं नाही तरी आश्चर्य वाटू नये. या कथेतली सगळीच नावं-गावं-वस्तू-प्राणी-पात्रं काल्पनिक नाहीत. यातल्या कुणाचंही कुणाशीही साम्य आढळून आलं, तर तो एक योगायोग आहे. नाही आढळलं, तर तोही एक योगायोगच आहे.
-----------------------------
----1----
मुंबईतली थंडी असूनही गारवा यंदा इमानेइतबारे हजर होता. त्यातून ऑफिसांतल्या
यंत्रांसाठी चालणारा ए.सी. ‘पेटला’ होता. थंडीने
इतकी फील्डिंग लावूनही अभयच्या कपाळावर भयाचा
घाम होता. बुलेटिनला
बसायच्या आधी बॉस जातीने झापून गेला होता. “यार! रोज़ रोज़ की टुच्ची ख़बरें निकाल के डेढ़ मिनट भर देते हो, इस साल के हाफ़-अवर्स का
क्वोटा कहां पूरा हुआ है? इस हफ़्ते तुम्हारा आधे घंटे का स्पेशल
जाना है, दिल्ली को मैं बोल चुका
हूं!”
अभय तिरीमिरीत केबिनबाहेर पडला आणि आपल्या खुर्चीत येऊन बसला. आतल्याआत चुळबुळू लागला. ”अर्ध्या तासाची डॉक्युमेंटरी करायची कशावर? कुत्र्यांचं निर्बीजीकरण?? तीन वर्षं येणार-येणार म्हणून नुसतीच गाजणारी मुंबई मेट्रो?? कोण बघणारे तिच्यायला??”
हळूहळू अभयमधला माणूस दोन पावलं मागे सरला. कावळ्याच्या डोळ्यांनी पेपर चाळू लागला, कुत्र्याच्या नाकाने बातम्या हुंगू लागला. बॉस त्याचं माकड करायच्या आधी त्याला बॉसला प्लान द्यायचा होता. लोकसत्तेत दोन कॉलमची बातमी दिसली. कृषिमंत्री चिंतेत. हिवाळ्यात चारा छावण्या पडल्या. मंत्र्यांच्या चिंतेने अभयची चिंता मिटली.
बुलेटिन संपवून बॉस खुनशीपणे अभयकडे चालत आला. मघाच्याच लोकसत्तेवर ऐसपैस रेलत अभयने विचारलं, “दिसंबर में सूखा... क्या ख़याल है?” बॉसने संशयाने भुवई उंचावली, आणि चक्क हो म्हणाला!
अभयची टकळी लगेच सुरू झाली. बातमी शोधतांना नसलेली ओरिजनॅलिटी तो वर्णनांत भरू लागला. छावण्या पडल्यायत म्हणजे हाडकुळी जनावरं असतील. हाडकुळी असली तर विकाऊसुद्धा असतील. त्यांचे गरीब मालक, ताटातूट, रोजगारासाठी स्थलांतर, पाण्यासाठी रांगा... अभयसुद्धा औरंगाबादचा असल्याने त्याला ही परिस्थिती माहित होती.
अभयसाठी ह्या डॉक्युमेंटरीला मिळालेला होकार अनेक अर्थांनी महत्वाचा होता. ‘मेट्रो रिपोर्टर’, शहरांचेच उकिरडे फुंकणारा ‘मीडिया-मजूर’ असल्या संभावनेपासून थोडी सुटका होणार होती, “तुमचं चॅनल आमच्या गावाकडे दिसत नाही, जिथे दिसतं, तिथे कुणी बघत नाही!” म्हणून खिजवणाऱ्या गावच्या लोकांची तोंडं बंद करता येणार होती.
अर्ध्या तासाचा माहितीपट म्हणण्यापुरताच. मध्ये जाहिरातींसाठी राखायची आठनऊ मिनिटं वगळता वीस मिनिटांचीच डॉक्युमेंटरी करायची होती. पूर्वतयारीसाठी मिळालेल्या तीन दिवसांत अभयने मराठवाड्यातल्या तीनचार जिल्ह्यांतल्या स्ट्रिंगरना फोन केला. स्ट्रिंगर म्हणजे चॅनलमध्ये पूर्णवेळ नसलेले, मात्र महिन्याच्या ठराविक बातम्या पाठवून मोबदल्यावर सेवा पुरवणारे स्थानिक पत्रकार. हाताशी एक नकाशा घेऊन अभय रूट आखू लागला. प्रकट चिंतनात. प्रश्न त्याचेच, उत्तरं त्याचीच.
“औरंगाबादवरून वरून तासाभरात जालना, जालन्यात दोन दिवस! तिथून बीड- बीडला दोन दिवस. परतीत औरंगाबादलाच एखादा दिवस. उरकेल आरामात!”
“अरे, पण उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड कसं करणार?”
“पाचावर सहावा दिवस द्यायला बॉस कुरकुरतोय! एका जिल्ह्याला एक दिवस तरी पुरेल का?”
“काहीतरी जुगाड़ करावाच लागेल! जालन्यातल्या वाळल्या उसापेक्षा परभणीतला ऊस वेगळा नसणार... उस्मानाबादेतल्या वासरांसारखीच बीडमध्येही आहेत. रात्र थोडी सोंगं फार, कुठे धावपळ करणार?”
“पण नुसते प्रॉब्लेम दाखवत सुटायचंय का? दुखणं एका जिल्ह्यात असलं आणि औषध भलत्याच जिल्ह्यात असलं तिथे तर जायला नको? हे जिल्हे पण नकाशावरच बिस्किटाएव्हढे दिसतात. गाडीत बसल्यावर मात्र देव आठवतो.”
आतापर्यंत चाललेलं स्वगत पुटपुटण्यातून बडबडीकडे वाढल्याचं अभयलाही कळलं नाही, पण मागून डॅडी खदाखदा हसू लागले आणि अभ्या दचकला. “लग्नातल्या व्हिडिओवाल्यांकडून शीक! किती टेप्स छापल्या त्यावर ते पैसा छापतात.. एकाच कॅसेटमध्ये सगाई-से-बिदाई-तक सगळं कशाला कोंबायचं? तू भलेही दुष्काळाची पार्श्वभूमी, परिस्थिती आणि परिणाम एकाच टेपमध्ये संपवलेस, तरी ते कुणाला कळणार नाहीत, आणि मग लग्नाच्याही शूटिंगसाठी तुझ्यासारखा कारागीर कुणी घेणार नाही!”

डॅडी उर्फ दिनेशदादांच्या सूचनेने अभयचा मेंदू स्टूडियोप्रमाणे उजळला. एका दुष्काळावर डॉक्युमेंटरीज़ ची मालिका काढता येईल हे अभयला अंमळ उशीराच उजाडलं. डॅडी मुरलेले कॅमेरामन. अनुभव, मगदूर, वचक- सगळ्याच बाबतीत अभय त्यांना फ़ादर फ़िगर मानायचा. डॅडी हा दाढीचा अपभ्रंश. 18 वर्षांपूर्वी आख्खी दाढी काळी होती तेव्हांपासून ह्या लायनीत. अभयसारख्या पत्रकारांच्या सहा-सात पिढ्यांचे उस्ताद. अभय चॅनेलमध्ये येईस्तोवर दाढीतलं पांढरं-काळं समप्रमाण झालं होतं. दाढींचा डॅडी झाला होता. शूटिंगसाठी डॅडी यावेत म्हणून भलेभले रिपोर्टर प्रॉडक्शनवाल्यांशी भांडायचे. तेच शूटला येणार म्हटल्यावर अभयला खूप आधार वाटला.
----2----

इथेच बॉसशी बोलून अभयने एका अभिनव कल्पनेसाठी बॉसचा रुकार मिळवला. डॉक्युमेंटरीत म्हणजे रटाळ दृष्यांवर रटाळ कमेंटरी, आणि मधूनमधून घातलेले एखाद्या मुलाखतीचे तुकडे- उर्फ बाइट्स. या निरुत्साहाचं दुसरं टोक म्हणजे काही अतिउत्साही पत्रकार- जे प्रत्येक शॉटमध्ये शिरून मी आत्ता इथे आहे,माझ्यामागे तुम्ही पाहू शकता- आपण आत्ता बोलत आहोत- अशा प्रस्तावनेतून स्वत:चा झेंडा फडकवत राहतात. पार्श्वसंगीताला एखादी रडकी सारंगी. अतिरंजित दु:खापेक्षा किंवा मनाच्या असल्या श्लोकांपेक्षा अभयला समोरच्यां लोकांच्या तोंडून सलग पडणाऱ्या वर्णनांचं आहे तसं वार्तांकन करायचं होतं. कॅमेरा सतत आपल्या सब्जेक्ट्सच्या चेहऱ्यांवर- जीवंत संभाषण टिपत चालवायचा. त्यातले सर्वोत्तम तुकडे बेतून लघुपट पुरा करायचा अशी ही योजना होती.
ऑफिसचं तोंड सहा दिवस पहायला नको म्हणून अभय खुश, अभयसारख्या मेहनती
कार्ट्याबरोबर शूट मिळालं म्हणून दादा खुश, सहा दिवसांचा प्रवासभत्ता मिळणार
म्हणून दोघं आतल्याआत खुश. तिकडे जालन्यात मुंबईचे साहेब येणार म्हणून जालन्यातले देशमुख
स्ट्रिंगर रात्री आपल्या कट्ट्यावर भाव खाऊन गेले. सकाळी समोरासमोर भेट होईपर्यंत
कुठून सुरुवात करणार, याची ना अभयला माहिती
होती, ना देशमुखांना कल्पना!
----3----

आकाशातल्या प्रवासाने महाराष्ट्राचा नकाशा खरा दाखवला. सह्याद्रीच्या अलिकडची हिरवळ, अहमदनगरपुढे ओसरू लागली. औरंगाबादवर घिरट्या घालत असतांना जमिनीतला कोरडेपणा आणि गोदावरीची ओकीबोकी रेघ हजारो फुटांवरूनही दिसत होती.
औरंगाबादला एअरपोर्टवरून बाहेर पडतांनाच टंचाईची चुणूक दिसत होती. शहरातल्या मजूर
अड्ड्यांवर दिसणारी शेकडोंची गर्दी हजारांत पोचतेय असा संशय येऊ लागला. अभय
आणि दादांनी या लोकांना भेटले. गर्दीतले अर्धे औरंगाबादचे नव्हतेच. सामानाच्या
पिशव्यांवर वसमत आणि गंगापूरच्या दुकानांचे पत्ते छापलेले होते, त्यांच्या
मराठवाडी मराठीत औरंगाबादचे हेल जाणवत नव्हते. या मंडळींना गावाकडची शेती सोडून येण्यावाचून पर्याय नव्हता. अड्ड्यावर
कमाल रोजंदारी तीनशे रुपये होती. शहरी
खर्चांनाच ती पुरत नव्हती, घरी पैसे पाठवायचे कुठून? एकेकाळचे शेतमालक, शहरात
गवंडीकाम, हॉटेलातली खरकटी धुणी काढत होते. आजच्या रोजगाराची उद्या खात्री नव्हती.
ही मंडळीसुद्धा मागे उरलेल्या मजुरांपैकी होती. धडधाकट माणसं बऱ्या रोजगारावर
निघूनही गेली होती. उरलेल्या सात-आठशेंना पुढल्या अर्ध्या तासात कुणी ठेकेदार
मिळाला तरच चूल शिजायची शाश्वती होती. औरंगाबादमध्ये असे तीन मजूर अड्डे अजून होते. परिस्थिती
कशी असेल याचा अंदाज येत होता.
टीव्हीवर चालण्यालायक औरंगाबादेत आत्ता यापेक्षा जास्त काहीही मिळण्याची
खात्री नव्हती. अंधार हवा असेल तर दिव्याखाली जाणं भाग होतं. जालन्याला पोचायच्या
आधी देशमुख स्ट्रिंगरना फोन केला. ठरल्याप्रमाणे भेटायचं आणि देशमुख दाखवतील त्या
जागांवर शूट करायचं असा अभयचा बेत होता. देशमुखांनी बॉम्ब टाकला- “मला एक
तास लागंन. इकडं वार्ताहार संघात आज xxxx दिन आहे. मला
प्रमुख वक्ता केलं आहे. तुम्ही नाश्ता करून घेता का तोवर?
आपण निघूच मग!”

अभयचा हात कपाळाकडे गेला. शेड्यूलची पहिली दुपार होत आली होती, पण जालन्यात एक सेकंद शूटिंग झालं नव्हतं. देशमुखांचाही पत्ता नव्हता. अभयने आसपास माहिती काढून घाणेवाडी तलावाकडे स्वत:च गाडी घेतली. जालना शहराला पाणी पुरवणारा घाणेवाडी तलाव जानेवारीमध्येच आटला होता. कधीकाळी म्हणे खुद्द हैदराबादचा निझाम या तलावाचं पाणी रेल्वेने हैदराबादला मागवून घ्यायचा. आता हिवाळ्यातच त्याच्या जमिनीला ‘मस्त’ भेगा पडल्या होत्या. त्या भेगांनी अभय मनातल्या मनात खुष झाला. या विघ्नसंतोषी सुखाचं लगेच वाईटही वाटलं, पण त्याचा आनंद ब़ॉसच्या आनंदात होता.
मात्र त्या भेगा, एका जनावराच्या कवटीचा जबडा, बाभलीची वाळली बेटं इतकंच शूट करून भागणार नव्हतं- तितक्यात तिकडून काही गुराखी चालत आले. त्यांच्या रांगड्या आरोळ्या, गायींना थिर्रर्रर्रर्र करून बोलावणं, गायींचं हंबरणं, गळ्यातल्या घंटा- अभयने नॅट साउंड्स (नॅचुरल साउंड्स) पोटभर रेकॉर्ड करून घेतले. मग गुराख्यांना आपली ओळख सांगून बोलायला राजी केलं. गुराखी सांगू लागले- तलाव आटल्यापासून बरेच गुराखी तांडे सोडून निघून गेले होते. तलाव आटून भेगाळला असला, तरी त्याच्या मध्यभागी ओल्या चिखलाचं डबकं आहे- त्यातून मिळणाऱ्या पाण्यावर रोज तीनचारशे गुरं आपली तहान भागवतात. एका गुराला रोज पंचवीस लिटर पाणी लागतं. अशी तीनशे गुरं रोज तिथे येऊन पाणी प्यायला दाटी करतात. गुरांची आपसात भांडणं होत नसली, तरी त्यांचे मालक भिडतातच. मग काही गुरं खाटकाला विकली जातात. आठवड्याला चार-पाच जनावरांची वासलात अशी लागतेच. दुभत्या जनावरांचेच खाण्याचे हाल होते, तिथे खोंड-रेडे-वासरं यांना प्राधान्य नव्हतं. अशात खाटीक सांगेल त्या भावाला जनावरं विकली जायची.
----4----
आजोबा त्याला एका गावातून दुसऱ्या गावात नेत होते-
“पण काका, आपल्याला सुकलेल्या बागा पाहायच्या आहेत ना?”
“ह्ये काय, पुढच्या गावात दिसतेत की!”
“ तुम्ही सकाळी त्या गावात टँकरसाठी होणारी चेंगराचेंगरी दाखवणार होता!”
“आता सकाळला फंक्शनचं काम निगलं न दादा! तसंबी त्या गावामदी घरान्ला डायरेक्ट पाणी द्यायलेत कालपासनं!”
“ मग आता कुठल्या गावात चलूयात ?
“शोधावं लागंन!”
“फ़क्!” अभयने
मनातल्या मनात कचकन् शिवी हासडली. त्याला वाढणारे तास, कोऱ्या राहिलेल्या टेप्स,
गाडीचे वाढणारे किलोमीटर आणि संपत आलेला दिवस दिसत होता. टीव्हीवर दिसणारं एक
मिनिट शूट करायला प्रत्यक्षात दहा मिनिटं तरी वेळ हवा होता. त्यात हिंदी आणि
इंग्रजी असं दोघांसाठी शूट करायचं होतं. म्हणजे हा सगळा हिशोब गुणिले दोन इतका वेळ
अभयला हवा होता, आजोबांची भाकडयात्रा सुरूच होती. अभयला थेट वय विचारायची हिंम्मत
होईना, मग त्याने हळूच विचारलं.
“काका, मराठवाडा निझामाकडून भारतात आला तेव्हांचं काही आठवतंय तुम्हाला?”
“मंग! पंधरासोळा वर्षांचा होतो. तवा तर आमाला अलिफ़-बे पन शिकवायचे!”
अभयच्या कपाळावर एक आठी अजून वाढली. 82 वर्षांच्या देशमुखांना टेलिव्हिजनमधली अर्जन्सी, धावपळ, इतकंच नव्हे तर टीव्हीवर कशी दृश्य लागतात याच्याशी काहीही देणंघेणं नव्हतं. अभयचा पारा वाढतच होता. पण यांना निरोप द्यावा कसा देशमुखांनी ती चिंता स्वत:च सोडवली. जालना-बीड हद्दीवर शहाबाद आल्यावर देशमुख टॅक्सीतून उतरावं तसे उतरून म्हणाले- “जावा आता हितनं, इथून बीड लागंन. आमचे पाव्हणे ऱ्हातेत इकडं. तुम्ही बीडवरून येतांनी तुमाला दाखवतो टंचाईची गावं, तोवर मीबी शोधून ठेवतो.”
“काका, मराठवाडा निझामाकडून भारतात आला तेव्हांचं काही आठवतंय तुम्हाला?”
“मंग! पंधरासोळा वर्षांचा होतो. तवा तर आमाला अलिफ़-बे पन शिकवायचे!”
अभयच्या कपाळावर एक आठी अजून वाढली. 82 वर्षांच्या देशमुखांना टेलिव्हिजनमधली अर्जन्सी, धावपळ, इतकंच नव्हे तर टीव्हीवर कशी दृश्य लागतात याच्याशी काहीही देणंघेणं नव्हतं. अभयचा पारा वाढतच होता. पण यांना निरोप द्यावा कसा देशमुखांनी ती चिंता स्वत:च सोडवली. जालना-बीड हद्दीवर शहाबाद आल्यावर देशमुख टॅक्सीतून उतरावं तसे उतरून म्हणाले- “जावा आता हितनं, इथून बीड लागंन. आमचे पाव्हणे ऱ्हातेत इकडं. तुम्ही बीडवरून येतांनी तुमाला दाखवतो टंचाईची गावं, तोवर मीबी शोधून ठेवतो.”
अभयला तोंड मिटायचीही शुद्ध उरली नव्हती! मागे खुद्द विलासराव देशमुख मराठवाड्याला संथांची भूमी म्हणाले ती गंमत नव्हती. हे असंच प्रशासन आणि असेच नागरिक सगळीकडे मिळाले, तर निसर्गाच्याच नावे बोटं मोडूनही उपयोग नाही.
----5----
अर्थात, असे राजकारणी , किमान त्यांना भलत्या कल्पना सुचवणारे अधिकारी अभयला मुंबईत भेटायचे. तेलाच्या मालगाड्या पाणी वाहायला तयार ठेवणार असल्याचं मुख्यमंत्री बोलले होते. अभयला तो भारी विनोद वाटला, कारण आख्खी मालगाडी पाण्याने भरायची वा रिकामी करायची यंत्रणा कुठेही नव्हती. हवाई इमले चढत होते. कुणी मंत्री आपल्या जिल्हासाठी भांडून जास्त चारा छावण्या मंजूर करून घेत होते. त्या जिल्ह्यांमधला दुष्काळ मराठवाड्यापेक्षा सुसह्य असला, तरी ते मंत्री साखर पट्ट्यातले होते. वर मराठवाड्यातले अर्धे मजूर आमच्याच भागात तोडणीसाठी येतायत, भागंल इथं साऱ्यांचं, अशा वल्गनाही होत होत्या.
अभयमधला रिपोर्टर
बॅकसीटला जाऊन सैतान जागा होऊ लागला होता. सूर्य मावळलाच होता. सकाळपर्यंत काही शूट करणं
शक्यच नव्हतं. अभयचं अवसान खरंच गळालं, कारण जालन्याला एक तलाव आणि गुराखीच दहा
मिनिटांचा पूर्वार्ध भरून काढायला पुरेसे नव्हते. त्याचं आख्खं वेळापत्रक कोलमडत
होतं. एखाद्या जिल्ह्याचं होमवर्क स्वत: न करता तिसऱ्यावर विसंबण्याचा दणका त्याने
अनुभवला. उद्याच्या भेटीगाठी आधीच ठरवून
ठेवण्यात बीडचा स्ट्रिंगर भावासारखा मदतीला आला.
मनोज पाचपुते. बीडचा स्ट्रिंगर, जालन्यातल्या अनुभवापेक्षा उलटा अनुभव. त्याला बीडची खडान् खडा माहिती, कुठे काही खुट्ट झालं की मनोजला कळणार. घटनास्थळ वाट्टेल तिथे असू देत, मनोज बातमीचं फुटेज दीडएक तासात ऑनलाइन पाठवायची सोय करणार. त्याचा लोकसंग्रहही चांगलाच. रात्री गावी पोचेस्तोवर मनोजने तालुक्यातल्या सर्वात टापटीप हॉटेलातली सर्वात टापटीप खोली रिझर्व्ह करून ठेवली होती. आधी दिनेशदादांना आणि अभयला रात्री घरी जेवायला घेऊन गेला. उद्या कुठेकुठे जायचं त्याची यादी सांगितली. ती यादी ऐकून पूर्वी गळालेलं अभयचं अवसान मूठभर मांस बनून परतलं. मनोजच्या नुसत्या असण्याने अभयला खूप धीर आला.

----6----
छावणीतली माणसं अभयला
टकामका पाहत होती. कुणी दोन-एक
दिवसांपूर्वीच रहायला आलं होतं. कुणी आठवड्यापासून येऊन जुनं झालं होतं. प्रत्येक
कुटुंबातून शिफ़्ट लावल्याप्रमाणे मुलं, बाया, माणसं- मुक्कामाला येत होती. आपलं
बोलणं ऐकून घ्यायला कुणितरी आलं आहे, ह्याचंच त्यांना अप्रूप होतं. अभयलाही नवल
वाटलं- टीव्ही रिपोर्टर अंगावर येतांना पाहून पळणाऱ्या शहरातल्या लोकांना तो
कंटाळला होताच.
“काय दादा, धारा काढायलात?”
“हा. सकाळची घरं करावी लागतेत”
“एकीकडं चालू ऱ्हाऊन देत तुमचं. हिंदीत बोलायला जमंल ना?”
अशा प्रस्तावनेतून संभाषण सुरू होत होतं. थोड्याच वेळात एक-एक गोष्ट रेकॉर्ड होऊ लागली. बहुतेकांचा ऊस नासला होता. तो वाढून हमीभावापर्यंत जाणं दूरच, त्याचीच हिरवळ आता जनावरांना खायला घालत होते.
“क्या इतने चारे में एक जानवर निभा लेता है?”
“क्या करींगे? निभानाच पड़ता ना... अभी हिवाला खतम नहीं हुआ. अभी कमसे कम हरा चारा तो मिलरा. मार्च के बाद उतना भी नहीं मिलना. निभा रहे कैसा भी करके. अभी से थोडा-थोडा कम किया तो धुपकाले का आदत लगेगा जनावर कू.”
“हा. सकाळची घरं करावी लागतेत”
“एकीकडं चालू ऱ्हाऊन देत तुमचं. हिंदीत बोलायला जमंल ना?”
अशा प्रस्तावनेतून संभाषण सुरू होत होतं. थोड्याच वेळात एक-एक गोष्ट रेकॉर्ड होऊ लागली. बहुतेकांचा ऊस नासला होता. तो वाढून हमीभावापर्यंत जाणं दूरच, त्याचीच हिरवळ आता जनावरांना खायला घालत होते.
“क्या इतने चारे में एक जानवर निभा लेता है?”
“क्या करींगे? निभानाच पड़ता ना... अभी हिवाला खतम नहीं हुआ. अभी कमसे कम हरा चारा तो मिलरा. मार्च के बाद उतना भी नहीं मिलना. निभा रहे कैसा भी करके. अभी से थोडा-थोडा कम किया तो धुपकाले का आदत लगेगा जनावर कू.”
तिथून एक वासरू दावं तोडून येतांना अभयने हेरलं. दादांनी पटकन् कॅमेरा तिथे
वळवला. अभय ते पाहून लगेच बोलता झाला. “हम
वहां से देख पा रहे हैं, एक बछड़ा अपनी मां का दूध पीने दौड़ के आ रहा है. वैसे इस
गाय को अभी दुह चुके हैं, बछड़े के लिए कितना बचा है पता नहीं. दादा, क्या फिलहाल
जानवर इतना दूध दे पा रहे हैं कि आपका व्यापार भी हो और बछड़ों को भी मिले?”
“हा. हो जाता. वासरू को जादा नही लगता. वो क्या, सात आठ बार ओढता है, फिर छोड देता. अब उसकू बी हिरवा चारा देते. कवला कवला चारा है, खा लेता बच्चा. दूध निकालींगे तूम?”
“हा. हो जाता. वासरू को जादा नही लगता. वो क्या, सात आठ बार ओढता है, फिर छोड देता. अब उसकू बी हिरवा चारा देते. कवला कवला चारा है, खा लेता बच्चा. दूध निकालींगे तूम?”
या अनाहूत सूचनेने अभय दचकला. गवळीबुवांनी कॅमेऱ्यावर काय चालू शकेल हे
तेव्हढ्या वेळात हेरलं होतं. अभयलाही कल्पना आवडली. अभय उकीडवा झाला. अनोळखी
मादीची आचळं धरायच्या विचाराने तो अवघडला होताच, पण गवळ्याने लगेच प्रात्यक्षिक
सुरू केलं. अभय धारा काढू लागला, मोकळ्या हातांचा गवळी आता फारच खुलून बोलू लागला.
त्याच्या रांगड्या हिंदीने संवादाला अजूनच ‘फ़ील’ येत होता.
“ये छोटे छोटे बच्चे दोतीन महिने जिंदे रहे तोहीच पावसाला देखेंगे. नहींतो इनकू निकाल दींगे”
“निकाल देंगे?”
“खाटीक कू देना पडेंगा. बुड्ढा जनावर, भाकड जनावर या तो छोड़ देते या फिर निकाल देते.”
अभय कळवळला. “लेकिन क्यों? चारा-पानी तो सरकार दे रही है. उन्हें जीना नसीब हो तो तीन-चार महीने की तो बात है.”
“क्या बोलना दादा? ये पानी भी नहीं पुरता. टँकर अभी दिन में एकबार आता. उन्हाला कडक रहा तो दो दिन में आयेंगा. आपून इतना जीव लगाके इनकु बड़ा किये. इनकू रोज थोडा-थोडा मारने से अच्छा है लगेच मोकला करते. पेट भी चलाना पड़ता ना. दूध का पैसा मिला तो अपना पेट और बाकी जानवर का पेट भरेंगा. अपने को हौस है क्या जानवर मारने का?”
“ये छोटे छोटे बच्चे दोतीन महिने जिंदे रहे तोहीच पावसाला देखेंगे. नहींतो इनकू निकाल दींगे”
“निकाल देंगे?”
“खाटीक कू देना पडेंगा. बुड्ढा जनावर, भाकड जनावर या तो छोड़ देते या फिर निकाल देते.”
अभय कळवळला. “लेकिन क्यों? चारा-पानी तो सरकार दे रही है. उन्हें जीना नसीब हो तो तीन-चार महीने की तो बात है.”
“क्या बोलना दादा? ये पानी भी नहीं पुरता. टँकर अभी दिन में एकबार आता. उन्हाला कडक रहा तो दो दिन में आयेंगा. आपून इतना जीव लगाके इनकु बड़ा किये. इनकू रोज थोडा-थोडा मारने से अच्छा है लगेच मोकला करते. पेट भी चलाना पड़ता ना. दूध का पैसा मिला तो अपना पेट और बाकी जानवर का पेट भरेंगा. अपने को हौस है क्या जानवर मारने का?”
अभयला हवी असलेली तीन-एक मिनिटं भरून निघाली होती. गवळ्यालाही भरून येत होतं.
दिवस चढत होता. सुन्न मनाने अभय गाडीत चढ़ून बसला. पुढच्या प्रवासात ती टेप
रिवाइंड करून अभय पाहू लागला. गवळ्याच्या शेवटच्या वाक्याने अभयला एकदम त्याच्या
ऑफिसमध्ये झालेली मोठी नोकरकपात आठवली. बऱ्याच जणांना नारळ देतांना त्यांचे बॉसेस
काचेच्या भिंतीआडून हेच ज्ञान कॉर्पोरेट शब्दांत ऐकवत होते. माणूस जिथे माणसालाच
सोडत नाही तिथे गुराची काय चाड राखणार? दहा मिनिटं ना अभय बोलला ना दादा.
----7----
.jpg)
पुढल्या गावात शिरायला उशीर झाला, कारण “पेट्रोल” लिहिलेला एक टँकर त्या अरुंद वाटेतून रेंगाळत चालत होता, जीवाच्या आकांताने हॉर्न वाजवत होता. समोर रस्ता रिकामा! अचानक गावातून तीसपस्तीस बायका, म्हाताऱ्या, लहानसहान पोरं चक्क मोठ्ठाले ड्रम पेलत पळत येतांना दिसले. मागून तीसेक जणींची दुसरी लाट अजून पाइप्स आणि ड्रम्स घेत पळत आली. अभयचा बल्ब पेटला. “पेट्रोल” लिहिलेल्या टँकरच्या आत पेट्रोलपेक्षाही मोलाचं पाणी होतं. पन्नासभर ड्रम रांगेत उभे झाले. सोंडेइतका पाइप टँकरमधून ते ड्रम भरू लागला. आता हे अवजड ड्रम घरी कसे नेणार याचं अभय नवल करू लागला, तोच त्यातल्या अर्ध्या मावश्या ड्रम तसेच सोडून पळाल्या. उरलेल्या ड्रम्सवर पहाऱ्याला राहिल्या. आधी पळालेल्या मावश्या घरातून हंडे उचलून माघारी आल्या. एक एक हंडा भरून घरी नेऊ लागल्या.
मनोज हसून अभयला म्हणाला,
“हे असं चालतंय पहा इथे!”
“आपल्याला यापैकी एखाद्या बाईंबरोबर हे सगळं शूट करता येईल?”
“मग! त्यासाठीच आलोत की! तुमच्यासाठी एक चांगलं शिकेल कुटुंबही पाहून ठेवलंय. त्यांची हिंदीही बरीच बरी आहे. तुम्हाला चालण्याइतपत!”
“हे असं चालतंय पहा इथे!”
“आपल्याला यापैकी एखाद्या बाईंबरोबर हे सगळं शूट करता येईल?”
“मग! त्यासाठीच आलोत की! तुमच्यासाठी एक चांगलं शिकेल कुटुंबही पाहून ठेवलंय. त्यांची हिंदीही बरीच बरी आहे. तुम्हाला चालण्याइतपत!”
अभय त्या घरात गेला. गावातल्या एकुलत्या एका डॉक्टरांचं घर. वहिनी खोळंबल्या
होत्या. एक लेपल माइक त्यांना लावला. अभयने एक हंडा उचलला. एक वहिनींनी उचलला.
कॅमेऱ्यात पाहत अभयने नवी प्रस्तावना केली... “एक मराठी कहावत है, जबतक
खुद नहीं मरोगे तो स्वर्ग नहीं दिखेगा!” मग पुढल्या
सीक्वेन्समध्ये अभय वहिनींबरोबर ते अंतर तुडवत पाणी भरायचा अनुभव दाखवू लागला. ती
वरात पाहत खो-खो हसणारे अनेक रिकामटेकडे पुरुष होते, पण एकजण आपल्या
आई-बायको-बहिणीचा भार हलका करायला येईना. इतर बायकाही अभयकडे बायकांत पुरुष
लांबोडा अशा ऑकवर्ड कुतुहलाने पाहत होत्या. अभयला रिकामी कळशी मिरवत जातांना
मजा वाटली, पण भरली कळशी हातात घेता घेता रग लागली, आणि इतकावेळ चुरुचुरू बोलत,
तुरूतुरू चालणारा अभय संथावला. एरव्ही चढ्या पट्टीत बोलणाऱ्या त्याचा जड श्वास
ऑडियोत जाणवू लागला. परत पाव किलोमीटर चालत येईस्तोवर त्याचा शर्ट हिंदकळणाऱ्या
पाण्याने आणि घामाने भिजून निघाला होता. वहिनींना असे आठ हंडे रोज भरून आणावे
लागत. अभय कॅमेऱ्यावर गणित सांगू लागला- “अर्ध्या किलोमीटरची एक फेरी,
फेरीला दहा लिटरचे दोन हंडे, एकूण दहा मिनिटांची एक फेरी- म्हणजे एका घरातल्या
बाईला रोजचं ऐंशी लीटर पाणी आणायला दोन किलोमीटर आणि जवळजवळ तासभर लागतो.”
वहिनी अभयचा एकपात्री प्रयोग थांबवत म्हणाल्या “ये खाली धोने का पानी है... पीने का पानी आड से बचाबचा के निकालते! टँकर नगर बार्डर के उधर से आता- श्रीगोंदा या सिद्धटेक से. वो खारा पानी पिनेकू नहीं होता. हायवे के हाटील में तुमकू पांच का समोसा मिलेगा लेकिन पंधरा का बिसलेरी आठरा में मिलेंगा.”
बीड जिल्ह्यावर ही पाळी आली कारण बोरवेलचा भरमसाठ उपसा भूगर्भातील पाणी संपवून
गेला होता. एका तालुक्यात हजारोंनी बेकायदा बोरवेल्स. तीनशे फूट खणल्याशिवाय पाणी
लागायचं नाही. अभयने एका बोरवेलमध्ये लांबच्या लांब दोर सोडून दाखवलाही- कोरडा दोर
तीनशे फुटांपेक्षाही लांब होता. पाच मिनिटं सलग दोर ओढून हात भरून येत होते, तळहात
सोलून निघत होता. वर आलेल्या पोहऱ्यात जेमतेम तीन लिटर पाणी निघालं. पेयजलाचं
दुर्भिक्ष्य इतकं होतं तिथे शेतीचा प्रश्नच नव्हता. बीडमध्ये हजारो एकरांवरची
लिंबं वाळून गेली होती. वरून पिवळीधमक पण आतून फोपशी. शेतकऱ्यांनी वर्षांच्या
कष्टांनी वाढवलेली झाडं जाळायला-कापायला सुरुवात केली होती. जवार, हरभरा, लिंब,
डाळिंब... सगळं करपून गेलं. खरीप गेला, रब्बी गेली.
----8----
इतकं असूनही गावकरी भूजल वाढवणं आपल्या हातात आहे हे मानायलाच तयार नव्हते. नगर जिल्ह्यातून टँकर विकत आणून लोकांना पुरवणं चालू होतं. पावसाळ्यापर्यंत आला दिवस ढकलणं हेच त्यांना दिसत होतं. नगरमध्येही पुढल्या वर्षी पाणी आटलं तर बीडला कोण देणार ? अर्थात् ही जागृती फार पुढची होती. बीडमधल्याच उमापूर गावात दलित-सवर्णांत पेटलेलं भांडण अखेरीस पाणी तोडण्यापर्यंत येऊन पोचलं होतं. माणूस रक्ताच्या तहानेपुढे पाण्याचीही तहान विसरेल हा धक्काच होता.
समाजातले आजार राजकारण्यांच्या पथ्यावर पडतात म्हणून ते गप्प होते, मात्र यात
प्रशासकीय अधिकारी भरडले जात होते. बीडचे जिल्हाधिकारी निगुतीने दुष्काळाशी सामना
करत होते. टँकर घोटाळे उघड करणं, दलालांना धडा शिकवणं, अवाजवी चारा छावण्या रद्द
करणं अशा धडक कारवायांनी जिल्ह्यातल्या सत्ताधाऱ्यांची रसद त्यांनी तोडली होती. याचा
वचपा ऐन दुष्काळात बदलीवजा हुकुमांनी निघाला. ट्रेनिंगवरून परत आलेल्या कलेक्टरना
मुख्यमंत्र्यांनी कामावर रुजू होऊ नका असं कळवलं. या हुकुमाने बीडचे सत्ताधारी
आनंदले. लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. बंद-संप झाले, सर्वपक्षीय बोंबाबोंब झाली.
या कल्लोळात बीडचे लोकप्रतिनिधी सामील नव्हते. मुख्यमंत्र्यांनी लगेच हुकूम रद्द
केला आणि सत्तेतल्या या साथीदारांना झटका दिला. जनताभिमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचं
कौतुक झालं, बीडच्या राजकीय मालकांना टपली पडली. मात्र, मधल्यामध्ये काही कागदी
घोडे खोळंबले, काही सच्चे लोक तळमळले, आणि दुष्काळी नाटकाचा एक अंक मुंबईत संपला.
----9----

बिया आणि धातूंच्या कारखान्यातून कोट्यवधींचा व्यापार करणाऱ्या जालन्याला सोने का पालना म्हणायचे. सोनं पाणी घेऊ शकत नव्हतं. जालन्याला येणारी पाण्याची पाईपलाइन फोडून लोक रस्त्यात भरून घ्यायचे. कालवे ओकेबोके होते, 70,000 कोटींची उड्डाणं घेणारा सिंचन घोटाळा जागोजागी जाणवत होता. कागदोपत्री असलेले प्रकल्प म्हणजे अर्धीमुर्धी बांधकामं होती. बोअरच्या पाण्याने जालन्यात मुतखड्याच्या तक्रारी वाढल्याचे कयास होते. जालना शहराला मोठ्या खेड्याची कळा आली होती.
दिवस ओसरला तेव्हां रात्रींचे रंग दिसू लागले. हायवेकाठच्या हॉटेलांमध्ये गर्दी मुळीच ओसरली नव्हती. या हॉटेलांच्या भिंतींवर कुठल्याही साहेबांचे फोटो हे त्या हॉटेलच्या जीविकेचं लक्षण होतं. गावांमध्ये टँकर येवो न येवो, इथे गीझरपासून लॉनपर्यंत पाण्याची वानवा नव्हती. औरंगाबादच्याच वाळूजमध्ये बनलेली बीअर इथे फसफसत होती. शहरांत पाणीकपात असली तरी दारूचे कारखाने नांदत होते, अनेक वर्षं थकलेली पाणीपट्टी विसरून कारखानदारांचे ‘गुड टाईम्स’ चालू होते. औरंगाबादसाठी यंदाच्या बजेटमध्ये पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र घोषीत करण्यात आलं होतं. पाण्याचे स्रोत नसले तरी त्या बातमीने ओसाड जमिनींचे भाव वाढू लागले होते, शहराजवळच्या शेतकऱ्यांना जमिनी विकायला प्रोत्साहन मिळत होतं.
----10----
छोट्या छोट्या खेड्यांमध्ये तर प्रसंग बिकट होता. पडके वाडे, दारांवर कुलुपं, भिंतीतल्या खबदाडांत विझलेल्या पणत्या आणि पारांवर विझलेले डोळे घेऊन बसलेली म्हातारी माणसं. अंबड तालुक्यातलं दोन हजार उंबऱ्यांचं कर्जत खेडं 25 टक्के ओस पडलं होतं. अशी शेकडो खेडी मराठवाड्याच्या नकाशावर होती. त्यात उरलेली म्हातारी माणसं आणि चिमुकली पोरं एकमेकांना सांभाळत जिवंत होती. मेहनत करू शकणारी सगळीच माणसं शहरांकडे गेली होती. गावातल्या हापशांवर पोरं झोका घेत होती, पण हापशाने एक टिपूस गाळलं नाही.
मुंबईहून परतलेल्या काही बायका जत्थ्याने समोर आल्या. मुंबईत भागेना म्हणून परत यावं लागत होतं, तिकडून पैसा येईना म्हणून मुंबईला फिरून जावं लागत होतं. शेतकऱ्यांच्या या लक्ष्म्या कुठे हॉटेलात रोट्या भाजत, गवंडीकामं करत धन्यांबरोबर पुण्यामुंबईला, औरंगाबादला जगत होत्या. परत जाणाऱ्या बायका घरी पोरांच्या विचाराने गलबलत होत्या. उपाशी, आजारी म्हातारे शून्यात टक लावून पाहत होते. त्यांच्यासाठी शहरात गेलेल्या पोरांचे उपाशी चेहरे अभयला आठवले. औरंगाबादला गाडी पुसून पैशांसाठी गयावया करणारा चाळिशीतला बबन, हायवेवर ढाब्याचं अंगण झाडणारी शालन, मोंढ्यात धान्याची पोती वाहून थकलेला फ़रीद... सगळ्या-सगळ्यांचे चेहरे त्या गावकऱ्यांमध्ये दिसू लागले होते. ज्या व्हिजुअल्सने अभयच्या टेप्स भरायला सुरू झाल्या होत्या, शेवटच्या शॉट्समध्ये तशाच चेहऱ्यांनी एक वर्तुळ पूर्ण होत होतं. गावातल्या शनिमंदिरातला देवच बिनातेलाचा होता, मशिदीतली अज़ान उपाशीपोटी घुमत नव्हती. समाजमंदिरात बाबासाहेबांच्या तसबिरीला कुलुपात सोडून सगळेच गावकुसापलिकडे रोजगारासाठी गेले.
वस्तीतल्याच एका आजोबांबरोबर अभय शेवटचा
सीक्वेन्स रोल करत होता. डोळ्यांच्या खाचा झालेली म्हातारी किती कोसांवरून पाणी
घेऊन आली माहित नाही. नवऱ्याच्या हुकुमावर पाहुण्यांना ताज्या पाण्याचे पेले
निमूटपणे दिले. त्या पहिल्या मचूळ घोटावर अभयच्या ड्रायवरने उरला ग्लास ओतून दिला.
अभयच्या डोळ्यातलं मीठ फुलपात्रात पडलं. तो मराठवाड्याला पाण्याच्या त्या एका थेंबापलिकडे
काही देऊ शकला नाही.
--------------------------------
उपसंहार
अभय ही सगळी चित्रं घेऊन परतला. डॉक्युमेंटरीला धडाधड म्यूझिक, फडाफड इफेक्ट्स, तडातड व्हॉइसओव्हर काही-काही द्यावं लागलं नाही. गावांमधली भयाण शांतता, घाणेवाडीच्या तलावाच्या भेगा, उपाशी गुरांचं हंबरणं, विहीरीच्या तळावर आदळून घुमणारे कळशांचे ऍम्बियंट साउंड्स, वाळल्या पिकांचा मॉन्टाज, गांजल्या चेहऱ्यांचे लाँग-मिड-क्लोज़अप्स आणि कुठल्याही पाल्हाळाशिवाय मुद्याला भिडणाऱ्या मुलाखती पुरल्या. त्यात शासकीय माहितीचा फापटपसारा नव्हता, राजकीय शिलेदारांचे बाइट्स नव्हते. बांध फोडून बोलणारे गावकरीच होते. दिनेशदादांच्या कॅमेऱ्याने आणि अभयच्या लिमिटेड टकळीने आपलं काम इमानेइतबारे बजावलं. डॉक्युमेंटरी जिवंत झाली. अभयला गायीच्या धारा काढतांना पाहून बॉस जाम खुष झाला होता. अभ्याच्या क्लोज़अपवरून बाहेर येऊन अनंतात विस्तारणाऱ्या कोरड्या कालव्याची फ्रेम पाहून एडिटर खुष झाला. पानी के लिए आज पसीना, कल आंसू, परसों खून- या अभयच्या साईन-ऑफ़वर कॉपी एडिटर खुष झाला. हिवाळ्यातच रंग दाखवणाऱ्या दुष्काळावर मंत्रालयत अनेक जण खुष झाले.
नाखुश होते ते फक्त अभयच्या बॉसचे एक वरिष्ठ. “इसे डॉक्टर का ही
घर मिला था पानी भरने? किसी ग़रीब घर में नहीं गया?” या प्रश्नाला अपील नव्हतं. दिल्लीतल्याच एका दिग्गजाने मात्र आपल्या
ट्वीटमध्ये अभयचं कौतुक केलं. अभयला पुन्हा एप्रिलमध्ये मराठवाड्यात जायला मिळालं तेव्हां
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पैशापायी रखडलेली लेकरांची लग्नं, कैकपटींनी वाढलेल्या चारा
छावण्या, त्यांतला घोटाळा रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय फरफट, जलसंधारणाचे
प्रयत्न, शेकडोंनी मरणारे वन्यजीव, उन्हाळी सुट्टीतही माध्याह्न भोजनासाठी
चालणाऱ्या शाळा, जातीपातीवरून कुणाचं तुटणारं पाणी, जालन्यातून मोसंबीचं होणारं
उच्चाटन अशा मुद्द्यांची वानवा नव्हती.
नेत्यांच्या लटक्या अश्रूंनीही शेतकऱ्यांना गारवा मिळाला असता. मिळाला तो धरणं
‘भरण्याचा’ घाणेरडा पर्याय. अगस्ती ऋषीने एका आचमनात समुद्र रिकामा केला. त्याच्या
उलट पराक्रम गाजवू पाहणारे हे ऋषितुल्य, किंवा गोदावरीच्या पाण्यावरून
भांडणारे नाशिककर आणि औरंगाबादकर नेते, जीव मुठीत धरून जगणारी लाखो गुरं, हजारो
शेतकरी आणि शेकडो अधिकारी- या सगळ्यांना प्रतीक्षा होती ती पावसाची. देवाच्या 2013
चा पाऊस पडू लागला. मंत्री, अधिकारी, शेतकरी, गुरं सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाऊस थांबला नाही. त्याचा पूर झाला, ओल्या दुष्काळाचा रंग
दिसू लागला. या अशाच राड्यात त्याच त्या चुकांचं बीज रुजतं. राजकारणाचं झुडुप
दुष्काळात फोफावतं.
कॅमेऱ्यावर बोलतांना चुकलं तर डॅडी परतपरत रीटेक घ्यायला लावायचे. परफेक्ट
टेक च्या आशेवर अजून एक रीटेक. मागच्या दुष्काळापेक्षा पुढला दुष्काळ भेदक आणि
पोषक ठरावा म्हणून नेतृत्व दुष्काळांचे रीटेक पाहत असावं. परफेक्ट दुष्काळाला
नेहमीच वाव असतो ना! तेव्हां भेटूयात पुढल्या दुष्काळात, याच गावांत, याच दिवसांत.
तोपर्यंत बघत रहा. फक्त बघत रहा!
Subscribe to:
Posts (Atom)