Tuesday, March 03, 2015

राजपुत्राची घर-वापसी

इंद्रप्रस्थात झालेल्या प्रतिपानीपतच्या-चवथ्या-लढाई नंतर राजपुत्र गायब झाला होता. राजमाता मम्मीमॅडमवर तडिताघात झाला. आत्ता कुठे राजवस्त्रं त्यागून ती वानप्रस्थाला जाणार तो तिच्या क्लांत हातांत राज्यशकटाचे दोर परत येऊन पडले.
दौलतीची झीज तिळातिळाने होत होती. गुर्जरकुंजर नरेन्द्रवर्मांच्या सैन्याने मोठ्या महसुलाचे सगळे सुभे काबीज केले होते. तंजावर प्रांतीच्या मांडलिक जयंतीराजे राजपुत्र आणि जुन्या सरसेनापतींवर चिडून वेगळ्या झाल्या होत्या.
दौलतीत कुठेच काही घडत नव्हतं. विरंगुळा म्हणून सुभ्यांचे सुभेदार बदलून झाले. दख्खनेच्या सुभ्यावर माहूरगडाचा सरदार आल्यापासून तळकोकणच्या सरदाराने निर्वाणीचा चौथा इशारा दिल्याचं ऐकलं. राजमाता खूप दिवसात एव्हढी हसलेली पाहिली नाही. त्यानंतरही हसलेली कुणाला दिसली नाही. ती बेपत्ता राजपुत्राच्या चिंतेत आकंठ बुडाली होती.
प्रजेला राजपुत्राचं जाणं कळलं होतं. कुणी म्हणालं 'तो चवथ्या लढाईत धारातीर्थी पडला'. कुणी म्हणालं, 'नाही. त्याचा देह पडला नाही, पळाला. त्याच्या कोमल कांतीवर एक ओरखडा नाही, तो सुखरूप आहे.'
काळ थांबत नाही. कुणी म्हणालं राजकन्येलाच उत्तराधिकार देऊन राजमाता आपल्या माहेरी विठुकान्ह देशात नामस्मरणात कालक्रमण करतील. या बातमीने राजकन्येच्या फळीतील सरदार मोहरले. पण खुद्द राजमाता काहीच बोलत नव्हती.
इथे दुःखी प्रजेला राजकुमार दिसल्याचे साक्षात्कारही होऊ लागले. कुणी म्हणालं, 'तो गंगोत्रीच्या मुखाशी शांभवी उपचार घेत आहे', कुण्या बंदरावरील द्वारपाल म्हणाला, 'राजकुमाराने वेशांतर करून यवद्वीपाकडे जाणारं एक गलबत गाठलं'. यवद्वीपावरील गणिकांची ख्याती भरतखंडात सर्वदूर होती. असो.
आणि एकेदिवशी राजधानीतील जनपथावर हाहाकार उडाला. साक्षात राजपुत्राच्या आगमनाच्या वार्तेने लोकांची प्रासादावर रीघ लागली. तेच लोभस बालसुलभ रूप, तसाच पिंगट केशसंभार, तसेच शांभवनेत्र, तीच श्वेतपास्तकांती, कपोलांवर तसेच श्मश्रुखुंट, शेकडो तरूणींना बुडवणारी हुबेहूब कपोलखळी. आनंदभरित राजमाता आरतीचं तबक घेऊन, दुखर्‍या गुडघ्यांची तमा न बाळगता करकर धावत आली.
राजमातेचे एकनिष्ठ सरदार जयराम संशयमुद्रा धारण करते झाले. राजपुत्राला सदरेवर थांबवून राजमातेला म्हणाले, 'राहुकाळ उलटेस्तोवर क्षेमकुशल पुसणे अशुभ असे. आपण देवडीत बसावे, आम्ही सदरेवर त्यांच्या फलाहाराची सोय करतो.'
लगोलग दोन हशम येऊन राजपुत्राला धरायला आले. त्यांच्या कळकट हस्तस्पर्षाने राजपुत्राची पांढरीशुभ्र बाराबंदी मळकट झाली. त्याने असा एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकला, की खुद्द हशम दचकले. जेव्हां राजपुत्राने तोर्‍यात दोन्ही बाह्या झटकून वर केल्या, खुद्द सरदार जयरामांचा संशयही क्षणमात्र फिटला.
राजकुमाराने श्वेतवस्त्राआड झाकलेले बलदंड बाहू वर करून आज्ञा केली, "आता पकडा. वस्त्रे डागाळली तर देहदंड घडेल!". क्षणभर चपापलेल्या जयरामांनी म्हटलं,
"महाराजकुमार, बसा. यात्रा कशी झाली?"
"कसली यात्रा? या चिंतनावकाशात अंतर, काळ, कशाचं भान राहिलं नाही. किती मोत्ये खोटी निघाली, किती नाणी झिजली, इभ्रतीचा खुर्दा किती उडाला त्याची गणतीच नाही! सेनापति अजयकुमारांनी नावालाच हरताळ फासला, आम्ही अंबारीतून सगळं पाहिलं!"
"ते विसरा महाराज. आता रियासतीची नव्याने घडी बसवायची आहे. मातांनी आपल्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी आपल्याला शपथेवर काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. युद्धावरून परतलेल्यांचा रिवाजच आहे तो, माझा निरुपाय आहे. ही तुळशी हाती धरा."
"तुळशी? ई! ती तर नरेन्दवर्मांची आवडती पत्री आहे! आम्हाला नको ती! आम्ही आता गंगोत्रीवर मजेशीर पत्री पाहिली. तिची शपथ खाऊन तुम्ही लिहून द्याल ते बोलू!"
"राजकुमार!" सुटलेल्या संयमावर लगाम देत जयराम वदले, "हास्यविनोदाचा हा प्रसंग नाही. मम्मीमॅडमला लवकर भेटायचंय ना?" असं विचारत त्यांनी राजपुत्राहस्ती तुलसीदले कोंबिली.
"सांगा- भरतखंडाला दूध कुणी दिले?"
"गुर्जरगोमातांनी!" राजपुत्र शांतपणे म्हणाला.
"सांगा- 'एका दिवशी मी रात्री उठलो' या विधानातील विसंगती काय?"
"हेहे! दिवसा रात्र असते का? काहीही!"
"राजकारण कुठल्या वस्त्रांमध्ये दडले आहे?"
"राजकारण आणि वस्त्राचा काय संबंध? राजकारण आपल्या मेंदूत आणि हृदयात दडले असते!"
"आता शेवटचा प्रश्न- ओळ पूर्ण करा.... 'बोलते जे 'अर्णव'"
"पीयुषाचे!"
"काय? 'अर्णव'वरून तुम्हाला बाकी काहीही आठवू नये?"
"काय??"
जयरामांचा चेहरा क्रोधित झाला. त्यांची आरोळी प्रासादात घुमली, "पकडा ह्या द्रोह्याला! आणि चार वर्षं कोठडीत डांबून ठेवा!"
जयराम लगोलग राजमातेकडे गेले, "माते, काळीज कठोर करून ऐकावं, हा आपला राजपुत्र नसून एक अत्यंत मेधावी तोतया आहे!"
राजमातेवर दुसरा तडिताघात झाला. तिच्या हातातलं तबक कलंडून जमीनीवर पडलं, तबकातील केशरी-पांढर्‍या-हिरव्या गुलालाच्या वाट्या इतस्ततः विखुरल्या.
माता अश्रु पुसत म्हणाल्या, "तुमची गर्जना प्रासादात घुमली तेव्हांच मला कल्पना आली. पण त्याला चार वर्षं डांबायला का सांगितलं? आत्ता वढेरबुरुजावरून कडेलोट करूयात त्याचा!"
जयरामांनी मातेकडे रोखून पाहिलं, "माते, शांत!"
"तोतया अत्यंत मेधावी आहे. महाराजकुमार परतले, तरी चार वर्षांनंतरच्या युद्धात या चतुर तोतयालाच उभं केलं, तरच काही सुभे परत मिळण्याची आशा आहे!"
राजमातेवर तडिताघाताची हॅटट्रिक झाली, पण ती पुन्हा हसली. तळकोकणातील चवथ्या बंडाळीच्या वर्दीनंतर हसली ना, हुबेहूब तशीच.
- योगेश

No comments: