Friday, March 20, 2015

माझ्या हिश्शाचं पीपली लाइव.


http://khabar.ndtv.com/video/show/ndtv-special-ndtv-india/271366
जातींचा जिगसॉ.
बेलगाव, जि. बीड.
एप्रिल 2013.

दुष्काळावर डॉक्युमेंटरी करत फिरत होतो.

एप्रिलमध्ये 42 डिग्रींची काहिली.
चामडी बुटातनंही कातळावर पाय भाजत होते.
पाणी भरण्यामागचे सायास दाखवायचा प्रयत्न करत होतो.
टँकरच्या चेंगराचेंगरीत 83 वर्षांची आजी दिसली. अनवाणी.

तीनशे कदमांवर गावकुसाबाहेरचं घर, पण तितकं अंतर कापायलाही तिला वीसवीस मिनिटं लागत होती.
त्या दुखत्या सांध्यांनी पाणी शेंदणार, पाच पोहऱ्यांनी एक हंडा भरणार, आणि सात-आठ किलोंचा तो हंडा भेलकांडत घरी नेईपर्यंत इथे टँकर संपणार.
मी न राहवून त्यांचा हंडा उचलला.
या निमित्ताने पाणी वाहण्यासारख्या गोष्टीतला शिष्टाचारही शिकलो.

आजीच्या घरात आजारी नवऱ्याखेरीज कुणीही नव्हतं. कुणीही.
वाटेत जर्दा चघळत सलूनवर बसलेले रिकामटेकडे पुरुष होते,
घरच्या बाईला मदत नाही केली, हिला तरी कुठून केली असती?
त्याच वाटेवर, सायकलीला डब्बा टांगून पाणी नेणारा होता,
पण आजीला कॅरियरवर हंडा ठेवून घरापर्यंत नेऊ दिला नाही.

गावाच्या बौद्धवस्तीत पोचलो, आजोबा आजीला 'खाऊ-की-गिळू' असं पाहत होते.
युनिट पॅक-अप करवून गाडीत बसवलं.
डॉक्युमेंटरीत दाखवायला पुरेल इतकं शूट झालं होतं,
पण निदान आजचा दिवस तरी आजीला मदत म्हणून मी हंडे भरायला आजींबरोबर मागे फिरलो.
तीन हंडे भरल्यानंतर आजीनेच घालवून दिलं.

"बामणाकडून पाणी भरवल्याबद्दल गावात हफ़्ताभर हसतील. जावा दादा तुम्ही." आजी बोलली.
एका दिवसाच्या सोयीपेक्षा स्वाभिमानाच्या बेगडाखालची जातीय जोखड म्हातारीचे हाल करत होती.
****(या आजींचा प्रसंग खालील क्लिपमध्ये 09:09 पासून 10:10 पर्यंत)****
------------
शेजारच्या जालन्यात कर्जबाजारी होऊन जीव देणाऱ्या कुंडलिक बनसोडेंचं घर, आणि शेजारीच नापिकीपायी मुलीची हळद लांबलेल्या डोंगरेंचं घर दिसलं होतं.
------------
या काहिलीत बीडच्याच उमापुरात कोण कुणाचं पाणी कशावरून तोडत होतं हे ही नंतर कानी पडलं.
------------
हे सगळे गावाकडचे गरीब.
खरेखुरे गरीब मराठे. खरेखुरे गरीब बौद्ध. खरेखुरे गरीब माळकरी. खरेखुरे गरीब ब्राह्मण. खरेखुरे गरीब कुणबी.
सगळ्यांचा लसावि 'गरीबी'.
पण गरिबी, दुष्काळ आणि हालातही जातींच्या भिंती कोसळल्या नाहीत.
----------------------------------------------------------------------------
तात्पर्य (1) "गावाकडचे मराठे वंचित, त्यांचे हाल बघा!! आरक्षण हवंच!!!" म्हणणाऱ्यांनी गावातील इतर वंचित जातीही पाहाव्यात. वंचित दलित, वंचित सवर्ण. यांची नातवंडंही घरची कामं करून एकाच शाळेत शिकत असतील, तर संधीही समान हव्यात.
तात्पर्य (2) मराठा आरक्षणावर बोलणाऱ्या पत्रकारांच्या जातीवर घसरणाऱ्या मावळ्यांनी (सोकॉल्ड) 'मनुवादी' (सोकॉल्ड) 'बामनशाही' मीडिया गावाच्या दुर्दशांकडे दुर्लक्ष करतात असं बोलू नये.
तात्पर्य (3) जाणते राजे गरिबी सरसकट बघू शकत नाहीत, त्यांना फारफार 73 टक्के जाणते म्हणेन.

1 comment:

aditi mandlik said...

सगळ्यांचा 'लसावि' गरिबी..!! भन्नाट कल्पना आहे..!! एकदम realistic..