Saturday, June 13, 2015

सात्विक-'ऑरगॅनिक' संताप...

कॅम्पा कोला प्रकरणातल्या एका महत्वपूर्ण निर्णयाला वर्ष होत येईल, तेव्हांची एक आठवण...

कॅम्पाकोला इमारतींपैकी सर्वात उंच असलेल्या एका ब्लॉकमध्ये गेलो होतो... तिथून मुंबई ओळखता येऊ नये इतकी सुंदर दिसत होती. अर्थात, दहा कोटींपर्यंत जाऊ शकला असता असा तो फ्लॅट कवडीमोल होऊन घटका मोजत होता.

मालकीणबाईंनी दुसरी खिडकी उघडून 'पॅले रोयाल' नावाचा अक्राळविक्राळ स्कायस्क्रेपर दाखवला... 50-60 मजली तरी असावा. तेव्हां कोर्टाने त्याचंही बांधकाम बंद पाडलं होतं...

मालकीण- "हा एव्हढा मोठा 'पॅले रोयाल' पालिकेच्या नाकाखाली उभा राहिला, पालिकेला दिसला नाही, आमची घरं तेव्हढी दिसतात!"

मी (पेडगावकर)- "हो ना... जिथे पाहा काँक्रीटचा मारा... तुम्ही आला इथे तेव्हांची मुंबई किती वेगळी असेल ना?"

मालकीणबाई - "हो ना... आसपासच्या सगळ्या बिल्डिंगा इवल्याशा होत्या. याच गॅलरीतून मला चेंबूर-माहूलची खाडीही दिसायची!"

"अच्छा, म्हणजे तुमची इमारत तेव्हांची 'पॅले रोयाल' होती तर!" हा शेरा मी हातातल्या पाण्यासकट गिळला. मला लिफ्टने जमिनीवर यायचं होतं. बाईंच्या गगनचुंबी गॅलरीतून नाही.

Monday, May 18, 2015

गॉड ब्लेस यू, अरुणा!

अरुणा सुटली. जवळजवळ बाबांच्या वयाच्या अरुणाला कायम एकेरीतच संबोधत आलो आहे, कारण अरुणा माणसातून उठली तेव्हां ती माझ्याच वयाची होती.
जिवंत नसलेलं पण सजीव असलेलं तिचं अस्तित्व निमित्तमात्र. अरुणा हे नाव धारण करणारा तो रक्तमांसाचा गोळा, 'माणूस' लेबल धारण करणाऱ्या अनेक प्रवृत्ती दाखवत आला, म्हणून न दिसलेल्या त्या बाईबद्दल आज खूप दाटून येतंय.
चिन्मयी सुमितने स्टेजवर साकारलेल्या अरुणाशी तोंडओळख होती, पण प्रत्यक्ष अरुणा अनुभवली, ती तिच्या दयामरणाच्या खटल्याचं वार्तांकन करतांना.
भारतातलं एक सरकारी रुग्णालय सगळ्या आशा सुटलेल्या एका रुग्णाची सेवा पदरमोड करून करेल, हे कुणालाही खरं वाटणार नाही. अरुणाच्या मोठ्या बहिणीला, शांताक्कालाही ते खरं वाटलं नाही. म्हणून 15 मिनिटांवर राहणारी शांताक्का अरुणाला तशी बघायला यायला फारशी धजावली नाही. सत्तरीतही दूध विकून गुजराण करणाऱ्या शांताक्काला, इस्पितळ अरुणाला माझ्या सुपुर्द करेल ही भीति तिच्या ठिकाणी रास्त होती. दोन वर्षांपूर्वी शांताक्का गेली. कदाचित इहलोकात न परवडणारी बहिणींची गळाभेट तिकडच्या जगात झाली असेल.
अरुणाच्या आयुष्यात नर आणि पुरुष, दोन्ही येऊन गेले. एक वॉर्डबय- ज्याच्या लेखी अरुणा वाटेतला काटा होती. त्याच्या चोऱ्यामाऱ्या उघड करणारा स्त्रीदेह, लोळागोळा करणारा सोहनलाल आपली मौत मेला, न्यायदेवतेच्या लेखी त्याच्या गुन्ह्याची शिक्षा सातच वर्षं होती. अरुणाचे वाग्दत्त पती- चार वर्षं तिच्या परतण्याची वाट बघत तिच्याजवळ होते, पण शांताक्कांची प्रॅक्टिकल उमज त्यांनाही शेवटी आली. अरुणा सोडून काळ कुणासाठीही थांबला नाही. अरुणा ज्यांना बेशुद्ध आढळून आली, त्या डॉ. रवि बापटांकडून या सगळ्या आठवणी ऐकणारा बधिर होतो...
अशात अरुणाचं कुटुंब बनलं तिच्या बरोबरच्या नर्सेस. 42 वर्षांची शूश्रुषा, म्हणजे केईएमचे कित्येक डॉक्टर-नर्सेस अरुणा अंधारात गेल्यावर जन्मले असतील- पण स्टाफ़च्या इतक्या पिढ्यांसाठी अरुणा त्यांचंच बाळ होती. केईएमच्या माजी डीन प्रज्ञा पै म्हणाल्या होत्या- "हॉस्पिटल मेसचंही खाणं तिला देणं नकोसं वाटे, मग कधी कुणी आपल्या घरचा डब्बा अरुणासाठी पण आणायच्या. एकदा कुणितरी आंब्याची एक फोड अरुणाच्या ओठावर टेकवली. मानसिक वय तीन महिने असलेल्या अरुणाने पहिल्यांदा मिटक्या मारल्या." बाकी कुठलंही ज्ञानेंद्रिय निकामी असलेल्या देहाला अर्धा चमचा आनंद तसा मिळाला होता. तिला अशीच आवड माशांची पण होती.
कुणी अरुणाला कानाशी भजनं लावून द्यायचं, अरुणाला कळो न कळो, जुन्या जाणत्या नर्सेस तिच्या उशाशी बसून काहीतरी बोलायच्या. अरुणाच्या घशातनं निघणारे आवाज प्रतिसादाचे असतीलही, पण ते सर्वस्वी ऐकणाऱ्याच्या श्रद्धेवर आहे.
अरुणाच्या कवडशात चमकणारेही कमी नव्हते. तिच्यावर पुस्तक लिहून तिची मैत्रीण म्हणवून घेणारी पिंकी विराणी अरुणाला शुध्दीत असतांना माहीत असल्याच ऐकिवात नाही. त्या पुस्तकावर कमावलेल्या डबोल्यातून पिंकीने अरुणाची शूश्रुषा प्रायोजित केल्याचं माहित नाही. अरुणाचे किती बेडपॅन पिंकीने साफ केले असतील माहीत नाही, पण अरुणाचे पिंकीवर इतपत उपकार नक्कीच आहेत की अरुणामुळे पिंकीला येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळाली. काही मोजक्या भेटींवर लिहिलेलं हे पुस्तक, आणि त्या आधारे अरुणाला दयामरण द्यावं हे सर्वोच्च न्यायालयाला मानभावीपणे सांगणाऱ्या पिंकीवर आख्ख्या केईएमचा आणि माझ्यासारख्या काही लोकांचा नेहमीच राग असेल.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतांना केईएमचे डीन असलेले Dr. Sanjay Oak तसे बालरोगतज्ञ, पण अरुणाची सेवा करण्यात ज्या केईएम कुटुंबाने कधीच कुचराई केली नाही, त्यांच्या प्रमुखाकडूनही तेच प्रेम ऐकायला-पाहायला मिळालं. “42 वर्षं गादीत पडलेल्या देहाला एक बेडसोअर होऊ नये, तिच्या घशात नळ्या घालून अन्नाची पेज घालून जगायची पाळी अरुणावर येऊ नये, जगात कुठेही प्रोफेशनलिझम आणि सेवेची अशी सांगड दिसणार नाही.” या सारांशाचं त्यांचं विधान सुप्रीम कोर्टाच्या दिशादर्शक निर्णयात महत्वाचं ठरलं.
अरुणा अंधारात गेल्यावर केईएममध्ये आशेचा किरण बनून राहिली. माध्यमांपासून, भोचक नजरांपासून तिला दूर ठेवणाऱ्या, निवृत्तीनंतरही येऊन तिला भेटत राहणाऱ्या, हॉस्पिटलमध्ये आयुष्याची दशकं घालवणाऱ्या कित्येक लोकांच्या आयुष्याचा एक कोपरा आता कायमचा मोकळा झालाय.
अरुणाला जो उजेड, जी मोकळीक या जगात मिळाली नव्हती, ती तिला त्या जगात मिळेल. वापराविना कायमची मुडपून बसलेली तिची बोटं मोकळी झाली असतील, आणि या सगळ्या लोकांना तिचे आशीर्वाद मिळत राहतील.
तिचा देह जाळायला नेतील. तिचे रक्ताचे नातेवाईक नसोत, पण तिचं कुटुंब असेल.
तिला इथून पुढे वर्षश्राध्दं देणारं तिचं कुणीच नाही,
पण जी श्रद्धा तिला देहात अडकून मिळाली, ती आपल्या कुणाच्याही नशिबात नसेल.
वॉर्ड नं. 4 मधला तिचा बेड, आता तिच्यासारखाच मोकळा आणि सुना झाला असेल.
गॉड ब्लेस यू, अरुणा...

Tuesday, April 21, 2015

मशागत... फसगत... मनोगत.

एक सुपीक, सळसळतं मन घ्यावं...
दाणेदार जाणिवांचे एखाददोन हंगाम घ्यावेत, काढणी झाल्यावर मनात जुन्या इच्छांची बीजं पेरावीत.

मग मन मारावं. पाचोळा पसरून जाळावं.
रणरणता पावसाळा, भिजलेला हिवाळा, आणि काकडता उन्हाळा त्याला दाखवावा.
ते भेगाळेल.

त्यावर कुठलंही पाखरू-वासरू बागडण्याआधी दडपणाचे रूळ फिरवून फिरवून ते दाबून सपाट करावं.

हळूहळू त्याचा नापीक कातळ होईल.
काही उन्हाळे कातळ अजून रापेल.

मग चुकून कधीतरी आतला झरा जागा होईल, फुटेल.
आत अडकलेल्या बीजांना फूस लावेल.
मग दगड झालेल्या मनातून दबलेले कोंब,
मनाचे तुकडे करत बाहेर उगवतील...

पुढचं माहीत नाही.

Saturday, March 28, 2015

रामनवमी

अयोध्येत लगबगत्या सुईणींची घाई
दीपकळी थरथरती कौशल्यामाई
अयोध्येत चैत्राचा तप्त स्तब्ध वारा
राजा दशरथाच्या अस्वस्थ येरझारा
अयोध्येत शुभयोग दाटले आभाळी
भाग्यचिह्न अंकण्यास रघुकुलाभाळी
अयोध्येत प्रासादी पुरजनांचा मेळा
हर्षभरे ये शरयू दाटुनिया डोळां
अयोध्येत पाळण्यात लालचुटुक पाय
गदगदली हर्षभरे कौशल्यामाय
अयोध्येत अवतरले आज रामराय
रघुवंशी रचते नियती स्वर्णाध्याय

- योगेेश

Friday, March 20, 2015

माझ्या हिश्शाचं पीपली लाइव.


http://khabar.ndtv.com/video/show/ndtv-special-ndtv-india/271366
जातींचा जिगसॉ.
बेलगाव, जि. बीड.
एप्रिल 2013.

दुष्काळावर डॉक्युमेंटरी करत फिरत होतो.

एप्रिलमध्ये 42 डिग्रींची काहिली.
चामडी बुटातनंही कातळावर पाय भाजत होते.
पाणी भरण्यामागचे सायास दाखवायचा प्रयत्न करत होतो.
टँकरच्या चेंगराचेंगरीत 83 वर्षांची आजी दिसली. अनवाणी.

तीनशे कदमांवर गावकुसाबाहेरचं घर, पण तितकं अंतर कापायलाही तिला वीसवीस मिनिटं लागत होती.
त्या दुखत्या सांध्यांनी पाणी शेंदणार, पाच पोहऱ्यांनी एक हंडा भरणार, आणि सात-आठ किलोंचा तो हंडा भेलकांडत घरी नेईपर्यंत इथे टँकर संपणार.
मी न राहवून त्यांचा हंडा उचलला.
या निमित्ताने पाणी वाहण्यासारख्या गोष्टीतला शिष्टाचारही शिकलो.

आजीच्या घरात आजारी नवऱ्याखेरीज कुणीही नव्हतं. कुणीही.
वाटेत जर्दा चघळत सलूनवर बसलेले रिकामटेकडे पुरुष होते,
घरच्या बाईला मदत नाही केली, हिला तरी कुठून केली असती?
त्याच वाटेवर, सायकलीला डब्बा टांगून पाणी नेणारा होता,
पण आजीला कॅरियरवर हंडा ठेवून घरापर्यंत नेऊ दिला नाही.

गावाच्या बौद्धवस्तीत पोचलो, आजोबा आजीला 'खाऊ-की-गिळू' असं पाहत होते.
युनिट पॅक-अप करवून गाडीत बसवलं.
डॉक्युमेंटरीत दाखवायला पुरेल इतकं शूट झालं होतं,
पण निदान आजचा दिवस तरी आजीला मदत म्हणून मी हंडे भरायला आजींबरोबर मागे फिरलो.
तीन हंडे भरल्यानंतर आजीनेच घालवून दिलं.

"बामणाकडून पाणी भरवल्याबद्दल गावात हफ़्ताभर हसतील. जावा दादा तुम्ही." आजी बोलली.
एका दिवसाच्या सोयीपेक्षा स्वाभिमानाच्या बेगडाखालची जातीय जोखड म्हातारीचे हाल करत होती.
****(या आजींचा प्रसंग खालील क्लिपमध्ये 09:09 पासून 10:10 पर्यंत)****
------------
शेजारच्या जालन्यात कर्जबाजारी होऊन जीव देणाऱ्या कुंडलिक बनसोडेंचं घर, आणि शेजारीच नापिकीपायी मुलीची हळद लांबलेल्या डोंगरेंचं घर दिसलं होतं.
------------
या काहिलीत बीडच्याच उमापुरात कोण कुणाचं पाणी कशावरून तोडत होतं हे ही नंतर कानी पडलं.
------------
हे सगळे गावाकडचे गरीब.
खरेखुरे गरीब मराठे. खरेखुरे गरीब बौद्ध. खरेखुरे गरीब माळकरी. खरेखुरे गरीब ब्राह्मण. खरेखुरे गरीब कुणबी.
सगळ्यांचा लसावि 'गरीबी'.
पण गरिबी, दुष्काळ आणि हालातही जातींच्या भिंती कोसळल्या नाहीत.
----------------------------------------------------------------------------
तात्पर्य (1) "गावाकडचे मराठे वंचित, त्यांचे हाल बघा!! आरक्षण हवंच!!!" म्हणणाऱ्यांनी गावातील इतर वंचित जातीही पाहाव्यात. वंचित दलित, वंचित सवर्ण. यांची नातवंडंही घरची कामं करून एकाच शाळेत शिकत असतील, तर संधीही समान हव्यात.
तात्पर्य (2) मराठा आरक्षणावर बोलणाऱ्या पत्रकारांच्या जातीवर घसरणाऱ्या मावळ्यांनी (सोकॉल्ड) 'मनुवादी' (सोकॉल्ड) 'बामनशाही' मीडिया गावाच्या दुर्दशांकडे दुर्लक्ष करतात असं बोलू नये.
तात्पर्य (3) जाणते राजे गरिबी सरसकट बघू शकत नाहीत, त्यांना फारफार 73 टक्के जाणते म्हणेन.

टचस्क्रीन

टचस्क्रीनों से पटा ये डिब्बा
नज़रें नहीं मिलाता
अपने अपने जग में डूबी
आंखें नहीं उठाता
कुछ के हाथ में फ़ोन है अपना
पर नज़रें हैं भटकीं
पराये स्क्रीन पे चलती फिल्म में
इनकी सांस है अटकी
यह भी ख़ूब कि अपना मॉडल
क्यों न किसी को भाये,
क़ीमत और औक़ात में काहे
फर्क़ समझ ना आये
फर्ज़ी गेम में दौड़-भाग कर
जितने सिक्के बटोरे
उतने भिखारी बगल से गुज़रे
लेकर ख़ाली कटोरे
चैट की चौपाल में चलता
घंटों तक 'तियापा
देख न पाये सीट की आस में
कब से खड़ा बुढ़ापा
बात का ज़रिया बात की ही
जड़ पे है यूं बन आया,
टचस्क्रीनवालों का ये मजमा
दिल को न टच कर पाया
Written on my Samsung phone.

भगव्या आठवणी

25 जानेवारी 2013-
बाळासाहेबांनतरच्या पहिल्या वर्षातली शिवसेना...

http://khabar.ndtv.com/video/show/ndtv-special-ndtv-india/263067

'जातीयवादी' बालगीते ;)

देशस्थ बालगीत
रात्रीचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले दोन,
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले तीन
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
तात्पर्य- मी नाही(च) अभ्यास केला
----------
कोकणस्थ बालगीत
रात्रीचे वाजले आठ
पुरा केला गृहपाठ
एका मिनिटात बॅग भरली
दोनावर सुई फिरली
आठ वाजून दोन
बाबांचा आला फोन,
हे काय, नुसताच मिस्डकॉल केला,
मी नाही रिटर्न केला
आठ वाजून तीन
ताईची हरवली पीन
बोलणी खाण्यात अर्धातास गेला
मग नऊस्तोवर तपास केला
तात्पर्य - आठ वाजताच अभ्यास झाला. बाकी कंजुशीवर घसरलात तर पुढे पाणीही विचारणार नाहीत. wink emoticon

Friday, March 06, 2015

'उत्क्रांती'

माकडांची उत्क्रांती झाली,
भाषा आली, शेपूट गेले,
झाडांवरतून उतरून मग
एकमेकांच्या छाताडावर चढले
एकेकाळी मुक्त विहरती
जे झाडांच्या शिखरांवरती
मोठ्या मोठ्या उड्या मारती
हल्ली ते निष्कर्षांवरती
फिरत नागडे तरी कधीही
इज्जत त्यांनी लुटली नाही
पण मग चढले कपड्यांचे थर
तरी वासना सुटली नाही
त्या आधी पृथ्वीवर जेव्हां
डायनोसॉर बोकाळले होते
उल्कांच्या दैवी डस्टरने
पृथ्विफळ्याला पुसले होते
शंभर वर्षांपूर्वी देवा
तशीच संधी तुजला होती
पण तू विज्ञानाचे कोलीत
देऊन बसला माकडा हाती
उलट्या उत्क्रांतीची आता
वर तू बसुनी मजा पहा
देह नराचा, आत्मा माकड
माणुसकीचा ॐफट् स्वाहा!

Tuesday, March 03, 2015

राजपुत्राची घर-वापसी

इंद्रप्रस्थात झालेल्या प्रतिपानीपतच्या-चवथ्या-लढाई नंतर राजपुत्र गायब झाला होता. राजमाता मम्मीमॅडमवर तडिताघात झाला. आत्ता कुठे राजवस्त्रं त्यागून ती वानप्रस्थाला जाणार तो तिच्या क्लांत हातांत राज्यशकटाचे दोर परत येऊन पडले.
दौलतीची झीज तिळातिळाने होत होती. गुर्जरकुंजर नरेन्द्रवर्मांच्या सैन्याने मोठ्या महसुलाचे सगळे सुभे काबीज केले होते. तंजावर प्रांतीच्या मांडलिक जयंतीराजे राजपुत्र आणि जुन्या सरसेनापतींवर चिडून वेगळ्या झाल्या होत्या.
दौलतीत कुठेच काही घडत नव्हतं. विरंगुळा म्हणून सुभ्यांचे सुभेदार बदलून झाले. दख्खनेच्या सुभ्यावर माहूरगडाचा सरदार आल्यापासून तळकोकणच्या सरदाराने निर्वाणीचा चौथा इशारा दिल्याचं ऐकलं. राजमाता खूप दिवसात एव्हढी हसलेली पाहिली नाही. त्यानंतरही हसलेली कुणाला दिसली नाही. ती बेपत्ता राजपुत्राच्या चिंतेत आकंठ बुडाली होती.
प्रजेला राजपुत्राचं जाणं कळलं होतं. कुणी म्हणालं 'तो चवथ्या लढाईत धारातीर्थी पडला'. कुणी म्हणालं, 'नाही. त्याचा देह पडला नाही, पळाला. त्याच्या कोमल कांतीवर एक ओरखडा नाही, तो सुखरूप आहे.'
काळ थांबत नाही. कुणी म्हणालं राजकन्येलाच उत्तराधिकार देऊन राजमाता आपल्या माहेरी विठुकान्ह देशात नामस्मरणात कालक्रमण करतील. या बातमीने राजकन्येच्या फळीतील सरदार मोहरले. पण खुद्द राजमाता काहीच बोलत नव्हती.
इथे दुःखी प्रजेला राजकुमार दिसल्याचे साक्षात्कारही होऊ लागले. कुणी म्हणालं, 'तो गंगोत्रीच्या मुखाशी शांभवी उपचार घेत आहे', कुण्या बंदरावरील द्वारपाल म्हणाला, 'राजकुमाराने वेशांतर करून यवद्वीपाकडे जाणारं एक गलबत गाठलं'. यवद्वीपावरील गणिकांची ख्याती भरतखंडात सर्वदूर होती. असो.
आणि एकेदिवशी राजधानीतील जनपथावर हाहाकार उडाला. साक्षात राजपुत्राच्या आगमनाच्या वार्तेने लोकांची प्रासादावर रीघ लागली. तेच लोभस बालसुलभ रूप, तसाच पिंगट केशसंभार, तसेच शांभवनेत्र, तीच श्वेतपास्तकांती, कपोलांवर तसेच श्मश्रुखुंट, शेकडो तरूणींना बुडवणारी हुबेहूब कपोलखळी. आनंदभरित राजमाता आरतीचं तबक घेऊन, दुखर्‍या गुडघ्यांची तमा न बाळगता करकर धावत आली.
राजमातेचे एकनिष्ठ सरदार जयराम संशयमुद्रा धारण करते झाले. राजपुत्राला सदरेवर थांबवून राजमातेला म्हणाले, 'राहुकाळ उलटेस्तोवर क्षेमकुशल पुसणे अशुभ असे. आपण देवडीत बसावे, आम्ही सदरेवर त्यांच्या फलाहाराची सोय करतो.'
लगोलग दोन हशम येऊन राजपुत्राला धरायला आले. त्यांच्या कळकट हस्तस्पर्षाने राजपुत्राची पांढरीशुभ्र बाराबंदी मळकट झाली. त्याने असा एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकला, की खुद्द हशम दचकले. जेव्हां राजपुत्राने तोर्‍यात दोन्ही बाह्या झटकून वर केल्या, खुद्द सरदार जयरामांचा संशयही क्षणमात्र फिटला.
राजकुमाराने श्वेतवस्त्राआड झाकलेले बलदंड बाहू वर करून आज्ञा केली, "आता पकडा. वस्त्रे डागाळली तर देहदंड घडेल!". क्षणभर चपापलेल्या जयरामांनी म्हटलं,
"महाराजकुमार, बसा. यात्रा कशी झाली?"
"कसली यात्रा? या चिंतनावकाशात अंतर, काळ, कशाचं भान राहिलं नाही. किती मोत्ये खोटी निघाली, किती नाणी झिजली, इभ्रतीचा खुर्दा किती उडाला त्याची गणतीच नाही! सेनापति अजयकुमारांनी नावालाच हरताळ फासला, आम्ही अंबारीतून सगळं पाहिलं!"
"ते विसरा महाराज. आता रियासतीची नव्याने घडी बसवायची आहे. मातांनी आपल्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी आपल्याला शपथेवर काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. युद्धावरून परतलेल्यांचा रिवाजच आहे तो, माझा निरुपाय आहे. ही तुळशी हाती धरा."
"तुळशी? ई! ती तर नरेन्दवर्मांची आवडती पत्री आहे! आम्हाला नको ती! आम्ही आता गंगोत्रीवर मजेशीर पत्री पाहिली. तिची शपथ खाऊन तुम्ही लिहून द्याल ते बोलू!"
"राजकुमार!" सुटलेल्या संयमावर लगाम देत जयराम वदले, "हास्यविनोदाचा हा प्रसंग नाही. मम्मीमॅडमला लवकर भेटायचंय ना?" असं विचारत त्यांनी राजपुत्राहस्ती तुलसीदले कोंबिली.
"सांगा- भरतखंडाला दूध कुणी दिले?"
"गुर्जरगोमातांनी!" राजपुत्र शांतपणे म्हणाला.
"सांगा- 'एका दिवशी मी रात्री उठलो' या विधानातील विसंगती काय?"
"हेहे! दिवसा रात्र असते का? काहीही!"
"राजकारण कुठल्या वस्त्रांमध्ये दडले आहे?"
"राजकारण आणि वस्त्राचा काय संबंध? राजकारण आपल्या मेंदूत आणि हृदयात दडले असते!"
"आता शेवटचा प्रश्न- ओळ पूर्ण करा.... 'बोलते जे 'अर्णव'"
"पीयुषाचे!"
"काय? 'अर्णव'वरून तुम्हाला बाकी काहीही आठवू नये?"
"काय??"
जयरामांचा चेहरा क्रोधित झाला. त्यांची आरोळी प्रासादात घुमली, "पकडा ह्या द्रोह्याला! आणि चार वर्षं कोठडीत डांबून ठेवा!"
जयराम लगोलग राजमातेकडे गेले, "माते, काळीज कठोर करून ऐकावं, हा आपला राजपुत्र नसून एक अत्यंत मेधावी तोतया आहे!"
राजमातेवर दुसरा तडिताघात झाला. तिच्या हातातलं तबक कलंडून जमीनीवर पडलं, तबकातील केशरी-पांढर्‍या-हिरव्या गुलालाच्या वाट्या इतस्ततः विखुरल्या.
माता अश्रु पुसत म्हणाल्या, "तुमची गर्जना प्रासादात घुमली तेव्हांच मला कल्पना आली. पण त्याला चार वर्षं डांबायला का सांगितलं? आत्ता वढेरबुरुजावरून कडेलोट करूयात त्याचा!"
जयरामांनी मातेकडे रोखून पाहिलं, "माते, शांत!"
"तोतया अत्यंत मेधावी आहे. महाराजकुमार परतले, तरी चार वर्षांनंतरच्या युद्धात या चतुर तोतयालाच उभं केलं, तरच काही सुभे परत मिळण्याची आशा आहे!"
राजमातेवर तडिताघाताची हॅटट्रिक झाली, पण ती पुन्हा हसली. तळकोकणातील चवथ्या बंडाळीच्या वर्दीनंतर हसली ना, हुबेहूब तशीच.
- योगेश