Tuesday, August 28, 2007

ताज़ा जानकारी...

१) परवां मला तीन वर्षांनी हस्तलिखित टपाल मिळालं. दर्शनाचं... दर्शना माझी बीएस्सी पासूनची वर्गमैत्रीण. ओडिसी अप्रतीम करते, अभ्यासात खणखणीत आहे. रेकॉर्ड बुक्स पूर्ण करणं असो, ग्रूप की जान च्या सगळ्या भूमिका पार पाडणं असो... दर्शना अगदी पुढे!! तिची राखी आली होती.

आम्ही सगळे मित्र पूर्वी एकमेकांना हातांनी लिहिलेली पत्रं पाठवायचो... ईमेल जुनी कल्पना झाली तरीही... मला आठवतं, मी एक लिफ़ाफ़ा भरून माझ्या पाऊण डझन मित्रांना पत्रं पाठवायचो, आणि एका लिफाफ्यातच सगळ्यांची उत्तरं यायची. मुंबईच्या चाळीचे दोन मजले धावत उतरून-चढून ती पत्रं वरती आणून धापा टाकून व्हायच्या आधीच पाकीट फोडून वाचायला सुरुवात करायचो. इतका नॉस्टॅल्जिक होतोय ना आत्ता! आमच्या निष्पाप, भोळ्या (आणि थोड्या बावळट आणि येडचॅप दिवसांचीही) आठवण ताजी होते.

२) काल नारळीपौर्णिमा. आमच्या दिल्ली मराठी गॅंग ने नारळीभाताचा बेत रचला होता. अप्रतीम जमून आला! मुख्य म्हणजे पोटभर भात बनूनही नारळाचा कीस शिल्लक होता. मग निघतांना सगळ्यांना Goodbye कीस दिला! :)

३) हिंदी डेस्कवरच्या सहकारी मित्रांचं मराठी प्रशिक्षण अगदी मजेत चाललंय, नवं शिकलेलं वाक्य, "माझम काही चुकलम असेल तर माला कडवने!" मुंबई ब्यूरोतनं कॉल केलेल्या एका-दोघांना सुखद धक्का. गरिमाला शिकवलेलं वाक्य... "तुमचम आपलम काहीतरीच!!" :)

आता गणेशोत्सवाकडे डोळे लागले आहेत. घरात दोन पुणेरी पगड्याही आहेत!! टुकटुक!!

४) "येणार... येणार... म्हणून चर्चेत असलेला ऑरकुटचा नवा लुक अखेरीस दिसू लागला. ह्याचा एकमेव फायदा हा, की निदान दोनतीन दिवस तरी "हे ऑरकुट" असं लक्षात येऊ न देता ऑफ़िसातूनही पाहता येईल!!

Friday, August 03, 2007

निराश्रित...

त्या सांजसावल्या गूढ, पारावर भेटून गेल्या,
शून्यात कुठवरी दूर त्या मजला रेटून गेल्या...

मी त्या शून्यातून चालत शून्याच्या काठी आलो,
शून्याच्या लाटेवरती, शून्यात चिंब मी झालो.

दूर पसरली होती, तेथे तिमिराची कुरणे,
तिमिर-लतांतून आली, मजवर तिमिराची किरणे.

मग तिमिराच्या ओटीत, नक्षत्र असे सांडले,
काळोख्या त्या कुरणाशी, ते चमचमचम भांडले.

त्या कल्लोळाला भिऊनी स्मरल्या परतीच्या वाटा,
पण वाटेवरती सयेचा मज खचकन रुतला काटा.

मी परतलो पारावर, पण पार पेटला होता,
अन झगझगत्या तिमिरावर त्या - धूर दाटला होता.

दिपलो त्या लोळाने, अन पडलो मग मी उघडा,
मजला लपवाया माझा, तेजाशी वेडा झगडा.

शून्याच्या काठी मजला आहे तिमिराचे छत्र,
परि डोळ्यांमध्ये शिरूनी, मजला छळते नक्षत्र.

-योगेश