Friday, March 06, 2015

'उत्क्रांती'

माकडांची उत्क्रांती झाली,
भाषा आली, शेपूट गेले,
झाडांवरतून उतरून मग
एकमेकांच्या छाताडावर चढले
एकेकाळी मुक्त विहरती
जे झाडांच्या शिखरांवरती
मोठ्या मोठ्या उड्या मारती
हल्ली ते निष्कर्षांवरती
फिरत नागडे तरी कधीही
इज्जत त्यांनी लुटली नाही
पण मग चढले कपड्यांचे थर
तरी वासना सुटली नाही
त्या आधी पृथ्वीवर जेव्हां
डायनोसॉर बोकाळले होते
उल्कांच्या दैवी डस्टरने
पृथ्विफळ्याला पुसले होते
शंभर वर्षांपूर्वी देवा
तशीच संधी तुजला होती
पण तू विज्ञानाचे कोलीत
देऊन बसला माकडा हाती
उलट्या उत्क्रांतीची आता
वर तू बसुनी मजा पहा
देह नराचा, आत्मा माकड
माणुसकीचा ॐफट् स्वाहा!

No comments: