Wednesday, November 19, 2014

एका तिखट माणसाचं पुण्यस्मरण

प्पा,

तुम्ही तुमचं हॉटेल आणि जग सोडल्याच्या दोन वर्षांत त्याची ही अवस्था होईल असं माझ्यासारख्या गिर्‍हाइकाला स्वप्नातही वाटलं पटलं नसतं.
हॉटेलची पुण्याई त्याच्या वातावरणाने आणि पदार्थाने निभत असेल, पण त्या पदार्थाची चव घडवणारा हात थांबला की उतार सुरू होतो.
हे तुमच्या मुलाला कळतं तर दुसरं काय हवं होतं? तुमच्यानंतर दोन वर्षांनीही तुमचा मुलगा जेव्हां अकराआधी गल्ल्यावर बसत नाही, सुजलेल्या डोळ्यांनी गिर्‍हाइकांशी बोलतो, तेव्हा हॉटेलाची पुण्याई त्याच्या बटाटेवड्यातच आहे हे कळतं.
बटाटेवड्याचा फॉर्म्युला तुमचाच, पण तुमच्या हाताखाली शिकलेले आचारी तुमच्याच हयातीत दुसर्‍या हॉटेलांकडे वळू लागले होते. तुमचा मुलगा वडे करवून घेतो हे खरंय, पण खाणारे तुमच्या हाताची चव शोधायला येतात हे त्याला अजूनही कळलं नाही. तुमच्याच झणझणीत चटणीचा फॉर्म्युला पळवून तुमच्याच हॉटेलची शाखा थाटणार्‍या पुतण्यालाही वड्याचं मर्म कळलं नाही. तुमच्या हॉटेलात आता वडे जास्त खपत नाहीत बरं!
यात चूक तुमच्या मुलाचीही नाही. आज काय शिजतंय हे पाहायला तो पहाटे किचनमध्ये येत नाही. तुमच्या फळीवर खडूने रोजचे पदार्थ लिहिणारा तो आचारी, कधी तेलकट, कधी तिखटजाळ, कधी मिळमिळीत, कधी आंबूस रांधून परस्पर खपवतो असा जुन्या खवय्यांना संशय येतो. तुमच्या हॉटेलातले वेटर, पाणके, हेही गिर्‍हाइकाशी फटकून तुमच्या मुलाशीच गल्ल्यावर सलगी करतात. चांगल्या पगारावर हॉटेल सोडतात, किंवा नवखे चांगल्या पगारासाठी येतात. गिर्‍हाइकाचा चेहरा पाहून न सांगता पदार्थ वाढणारे वेटर तुमच्याच आगेमागे जाऊ लागले.
नाही म्हणायला तुमचा नातू अधूनमधून गल्ल्यावर येतो, त्याला म्हणे 24 तास हॉटेल काढून नेहमीच्या मराठी पदार्थांबरोबर कॉन्टिनेन्टल मेन्यु काढायची इच्छा आहे. पण रंग उडालेल्या प्लेट्समध्ये बेक्ड बीन्स, आणि कपच्या उडालेल्या कपबशीत हॉट चॉकलेट विकून चालणारे का?
नवनवी हॉटेलं उघडतायत तुमच्याच गल्लीत. दादर-माहिमच्या मधल्या कुठल्याशा हॉटेलात नागपुरी-सावजी आणि गोवन जेवण जोरात विकतंय. तुमच्या हॉटेलाने नवनवे पदार्थ वाढवले नाहीत, तरी
आहेत ते पदार्थ बनवणारे टिकवले असते तरी तुमची गर्दी ओसरली नसती.
आम्ही आजही येऊन तुमच्या हॉटेलात आमच्या अनमोल दिडक्या खर्चतो, कारण समोरचा वडा शिळापाका असला, तरी गल्ल्यावर तुमचा फोटो दिसतो. घासागणिक त्या फोटोतून तुमचा करारी
आवाज आठवतो.
आमचा पैसा तुमच्या सख्ख्या कुटुंबाच्या गल्ल्यात तोवर पडेल जोवर तुमच्या हातचं मीठ खाल्लेले खवय्ये जिवंत आहेत. पुढे दुसरी हॉटेलं शोधणं अटळ आहे. तुमच्यानंतर दोन वर्षं तुमचं हॉटेल सोडलं नाही. आता किती वर्षं, पाहूयात.
तुमच्याच वड्याने तृप्त,
जुना गिर्‍हाइक

No comments: