Friday, October 12, 2007

ह्रदयाची गाणी...

सरणार कधी रण...

काय छळतं हे गाणं!! मे महिन्यात पन्हाळा पाहिला होता. चक्क धुकं, किर्र अंधार पडू लागलेला... दूरदूरपर्यंत एक मरगळ ज्वालामुखीच्या राखेसारखी पसरली होती.

'शिवकल्याणराजा'ची गाणी कंपोज़ आणि अरेंज करायला बाळासाहेब आणि मोहिलेसाहेब प्रत्यक्ष इथे गेले असतील का? की पन्हाळ्याचं ते एक दर्शन आयुष्यभर छळत राहिलेलं पुरतं?

दिल्लीतल्या घराच्या खोलीत हे गाणं ऐकलं, परत पन्हाळ्यावर पोचलो. शुद्धीत आलो तेव्हा व्हायोलिन-तानपुरा आणि लॅपटॉप ह्या तीन दगडांच्या चुलीवर हे गाणं शिजवून परत परत चाखलं... अजून भूक ओसरली नाहीय.

बाळासाहेब, हॅट्स ऑफ़ टू यू!!

Thursday, October 11, 2007

निष्कांचन

लोहाचा तुकडा धरुनी
मी वणवणलो फत्तरांत,
पाषाणांचा डोंगर केला
परिसासाठी आक्रांत

बसल्या पायाला ठेचा
दगडांमाजी मज खूप
होते चिवट दगडांसम
परि सोन्याचे अप्रूप

परिसाच्या शोधापायी
खंडीनी वेचले खडे
अन वेचले आयुष्य
पण परिसस्पर्श ना घडे

मज माझे म्हणती वेडा
दगडांमध्ये मी दंग
परीसामागे पळतो मी
निर्वस्त्र आणि भणंग

मग मरता मरता हाती
तो लोहगोल पाहिला
पण हाती बघता सोने,
अश्रूंचा पाट वाहिला.

हळहळलो दुर्भाग्याला
दुखले दगडांचे घाव,
परिसास न पाहू शकली
माझी सोन्याची हाव.

निष्कांचन सडते आहे
माझे थडगे घाणीत,
आणि तो परीस बिचारा
हरवला त्या खाणीत.