Thursday, November 20, 2014

:)

वैरमुथू नामक तमिळ गीतकारामुळे आणि रहमान-इलयराजा सारख्या लोकांमुळे तमिळ आवडू आणि किंचित कळू लागली.
गाडीत एकटा पॅसेंजर असलो की मी माझी खास प्लेलिस्ट उघडतो. हिंदी बॉलिवुड नसलेली. काही रहमान आणि इलयराजाची दाक्षिणात्य भाषांमधली...
माझा ड्रायव्हर वैतागल्यासारखा विचारतो,
"साहेब हे मद्राशी आवाज ऐकून काय मिळतं? ते काय बोलतात ते कळतं तरी का?"
मी विचारतो- "तुला बीपी बघतांना फरक पडतो का इंग्लिश, रशियन, चायनीझचा? हे तसलंच काहीतरी आहे!"
त्याच्या चेहर्‍यावर साक्षात्काराचं दिव्य तेज झळकतं आणि गाडीचा वेग दहा ने वाढतो. smile emoticon

वैरमुथूवर भारतातले सगळे गीतकार ओवाळून टाकावेत,

आणि रहमानवर बॉलिवुडचे सगळे संगीतकार!

त्यांच्याच शब्दस्वरांनी सजलेल्या इरुवर चित्रपटातलं हे गाणं.
---------------

मधुकलिके, मधुकलिके
क्षणभर थांबून बोल ना,
ओठपाकळ्या उमलवुनी
गूज मनाचे खोल ना,
पुनवेला चंद्रातळी
चमचमत्या सरिताजळी
मोती उधळी ओंजळी,
ती तू, ना?

नरवीरा, नरवीरा,
इथे पहा क्षण चार, ना,
शुभ्रवारू हा थांबवुनी
झेल नयन तलवार, ना!
पुनवेला चंद्रातळी
चमचमत्या सरिताजळी
मजला ओलेती न्याहाळी
तो तू, ना?

भृकुटीतल्या मदन-शराने
हृदयभंग केला
तुझ्या कटाक्षाने, 
राया, मम रतीरंग आला,
चांदण्यात चिंब काया
स्वप्नी येऊनी छळते
झुरते मीही, हुरहुरते
कटीची मेखला तशी गळते

देह वेगळे, देश वेगळे
जीव कसे जडले?
दोन जिवांचे एकच स्पंदन
नवल कसे घडले?
तुझ्या एक स्पर्षमात्रे
गात्र गात्र मोहरले
नदीवर थबकले
जलद जसे
पाणी पाण्यामध्ये
जसे विरघळले





No comments: