Tuesday, May 22, 2007

रात्रीस खेळ चाले...

नाईट शिफ़्ट बद्दल माझे काही पूर्वग्रह होते- जसे, आम्ही नवशिके- प्राईमटाईमच्या धावपळीत आमची लुडबुड नको म्हणून आम्हाला नाईट शिफ़्ट वगैरे. सलग दोन आठवडे रात्रपाळी दिल्याने थोडा हिरमुसलो होतो. तेव्हां एकीने ह्या शंकांचं निरसन केलं. "ऐसा क्यों सोचते हो? सवेरे दस बजे तक के सारे बुलेटिन्स और रनडाऊन्स तुम्हारे दम पर चलते हैं!", आणि "अरे वा! आपण कामाचा डॊंगर पेलू शकतो म्हणून रात्रपाळी दिलीय!" ह्या जाणिवेने मनमोराचा कस्सा पिस्सारा फुल्लला!

पण नाईट शिफ़्ट एका अर्थी मजेची वाटते. रोजची प्राईमटाईम ची धावपळ नसते- शेवटच्या लोकलला चर्चगेटवर जितपत असावं- तितपत चैतन्य असतं. कमी गोंगाट आणि तणावमुक्त चेहरे पाहिले की कामाला एका प्रकारची प्रसन्नता येते. सकाळचं बुलेटिन आणि पुढच्या तीन तासांच्या प्रक्षेपणाच्या बातम्या तयार करायला एक रात्र मस्त पुरते.


'प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतो' चा दाखला देत माझ्या पहिल्यावहिल्या रात्रपाळीचं रोस्टर आलं. ''बोहनी'च्या बुलेटिनचा एक लगाम आपल्या हाती' ह्या विचाराने, ह्या विचारानेच मशीनमधून पडणार्‍या पॉपकॉर्नसारखं हसू नुसतं सांडत होतं.

"रविवार रात पहुँचना" लक्षात ठेवून शनिवारी दिवसभर झोपलो... (अगदी चारी पाय हवेत करून झोपणार्‍या मोत्यासारखा). परीक्षेशिवाय रात्रभर जागायचं म्हणून आरशात स्वत:लाच "योगेशजी, यह बताएं, आप को कैसा लग रहा है?" विचारून घेतलं!

"आज आमची पहिली रात्र!" असं मोठ्या फुशारकीने पुष्कराजला सांगून घरून निघालो. ऑफिसला पोचून पाहतो, तर माझ्या शिफ़्टचा हजर असलेला मी एकमेव जीव! चुकून चवथ्या इयत्तेत शिरलेलं बालवाडीतलं पोर आणि चवथीतले 'सीनिअर्स' एकमेकांना ज्या नजरांनी पाहतात, तसे आम्ही एकमेकांना पाहत होतो.
मग कळलं, की आमचा साधासुधा नाही, तर अगदी हिरवागार पोपट झाला होता. 'रविवार ची नाईट' शिफ़्ट म्हणजे उजाडती मध्यरात्र नव्हे, तर मावळती मध्यरात्र! २४ तास आधी पोचलेला प्राणी पाहून त्या प्राण्यासकट सर्वांचीच करमणूक झाली! हा झाला सलामीचा दिवस.. इथून पुढे...

रात्रभर बातम्यांवर हात फिरतो, लक्ष अंधारलेल्या खिडकीतून झुंजूमुंजू होतांना पाच वाजल्याचे कळतात. ५:५९:४९ च्या आधी कामं संपवायला स्वत:ला झोकून देणं होतं... ५:५९:५० ला काउंटडाऊन सुरू होतो... ६ वाजता Channel ID ची धुन वाजते. सस्मित अँकर, "नमस्ते, मैं हूँ..." ने सुरुवात करते. घड्याळ्यापुढे पळणारं काळीज थोडं निवांत होतं. सगळं नीट असल्याची खात्री होऊन वेळ मिळाल्यास चहा घेऊन 'सकाळ' च्या साईटवर आपला माउस फिरू लागतो. पण इतका वेळ असतोच कुणाकडे? तडक सात च्या बातमीपत्राच्या हेडलाईन्स कापणं होतं. एव्हाना देशाला जाग येऊ लागलेली असते. बातम्या घडू लागतात. वार्ताहर त्या कव्हर करून लगेच दृश्यं आमच्या कडे पाठवतात. त्या प्रतिस्पर्ध्याआधी आपण झळकवाव्यात म्हणून सगळी इंद्रियं एकवटतात. पुढच्या शिफ़्टला येणारे मावळे आल्याशिवाय आपल्याला खिंड सोडता येत नाही. शेवटी सुट्टी होते. खाली कँटीनमध्ये नाश्ता होतो.

सुटकेचे काही Symptoms असतात. शाळा सुटायच्या अर्धा तास आधी शाळकरी पोर मास्तरणीचा डोळा चुकवतं... हळूहळू एक-एक पुस्तक दप्तरात जमा करतं... त्याच्या उलट, नाश्त्याच्या टेबलावर मला अचानक अनावर झोपेचा एक झटका येतो आणि लगेच प्रसन्नता तोंडावर झळकते. काकडत्या AC ऑफ़िसातून घरी पांघरुणात शिरतांना पिठाच्या ऊबदार डब्यावर चढलेल्या मांजराची तृप्ती असते. आईचा फोन येतो तेव्हां मी बोलायच्या स्थितीत नसतो आणि माझी जेव्हां 'दुपार' असते, तेव्हा सभ्य जगाला जांभया येऊ लागलेल्या असतात. माझ्या सकाळी (म्हणजे दु. ४-५) मित्र ऑनलाईन दिसतात... मग काय...

"गुड मॉर्निंग!!"
"गुड मॉर्निंग?! लेका चहा मारतोय आम्ही इथे! येतोयस का?"
"आय आय आय गंऽऽऽऽ!!!"
"जांभई आवर! मीही उशिराच जेवलोय!"
"काही विचारू नकोस. कधी दिवसपाळी, कधी रात्रपाळी... आमची पाळी अगदीच अनियमित आहे!"
"हॅ हॅ हॅ! मग? आता पुढली पाळी किती वाजताची?"
"अरे! लॉन्ग वीकएंड!! आता तीन दिवस पाळी नाही!" ,
"अरे!! उलटाच हिशोब आहे तुमचा!"


अशी ही पिशाच्चवेळ... जागलाय कधी? :)

Thursday, May 17, 2007

अंड्याबाहेर... घरट्याबाहेर... :)

७-८ एप्रिल् २००७...

भोपाळच्या पुढे ट्रेन गेली, की प्रत्येक शहरात एक दृश्य हमखास दिसतं... रुळालगत जितक्या भिंती आहेत, सगळ्यांवर गुप्तरोग आणि तत्सम दुखण्यांची जाहिरात करणारे हक़ीम-वैद्यांचे तपशील असतात. "उत्तरेत सगळ्यांना 'हेच' का?" असा एक अमानवी विचार थोड्या गुदगुल्या करून जातो.

त्या दृश्याचा कंटाळा येतो, आणि ट्रेनचं दार सोडून आम्ही आत येतो. इथे आपल्या सीटवर वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं असतं! (माझ्या केसमध्ये अक्षरश: वाढून ठेवलेलं होतं... नुसतंच वरण... नुसत्याच सीटवर!! सहप्रवाशाच्या लेकीने- वय वर्षं इनमिन तीन!) .

मातोश्री कपाळावर आठ्या घालत कोच अटेंडंटकडून नॅपकिन मागवतात, माझीच रद्दी मला न विचारता घेऊन बेलाशक पुसतात. पु.ल. देशपांडे त्या हळद-तेलाच्या हल्ल्यातून बालंबाल बचावलेले असतात. समोर बसलेल्या सासूबाई तोंडावरची माशीही न हलवता आपल्या सोण्या (हा मराठी 'सोन्या' नाही!) 'गुनगुन'च्या बाळलीला न्याहाळत असतात. त्या माउलीचे 'अजी सुनते हो' वरच्या बर्थवर वाळवणाच्या माशांसारखे पसरलेले असतात. यथावकाश बर्थ स्वच्छ होतो, पण तोही हिसकावल्या जातो. आजींना खालचा बर्थ हवा असतो म्हणून. आपण न मिळालेल्या Thank you ला मनातच You're welcome करतो. ते सगळं कुटुंब निजल्याशी कारण!

पण दिल्लीला नेणारा ट्रेनप्रवास आणि त्यात भेटणारी माणसं ह्यांनी दिल्लीतल्या माणसांबद्दल सरसकट मत बनवायचं नाही असा माझा बेत आहे. आशावादाचं गारेगार काजळ डोळ्यात घातलं की असल्या धूळ-चिलटांनी डोळ्यांना काहीच त्रास होत नाही.

८ एप्रिल ते आज...
'नव्या शहरात बस्तान' म्हणावं, त्यामानाने मी सामान विशेष आणलं नव्हतं. फक्त दोन मोठ्या बॅगा भरून कपडे, कागदपत्रं, दोन सूटकेसेसमध्ये मावली नसती असली पिल्लावळ ४ छोट्या बॅगांमधून.
(गोम अशी आहे, ह्या सहा नगांबरोबर माझी प्राणप्रिय सखी व्हायोलिन पण होती, आणि हो... एका सूटकेसमध्ये माझ्या व्यायामाला लागणारी २५ पौंडांची लोखंडी वजनं! ह्यांना आतापर्यंतच्या दीड महिन्यात फक्त सातदा वापरायचा उत्साह दिसून आला. रोज ती वजनं हलवून हलवून मोलकरीण मात्र 'दंडाधिकारी' होतेय- 'तू बहराच्या बाहूंची' इ.इ. असो.)

असे ७ डाग, अधिक ८वा मी एका रिक्षात कोंबून पुष्कराज (माझा खोलीबंधू) आमच्या नव्या घरी पोचला. आज अजून एक सरप्राईझ आमची वाट पाहत होतं. आज आशीषचा (आमच्या खोलीबंधूचा) वाढदिवस होता. सगळे मित्र घरी जमले होते. कोल्हापूरची सोनल, नांदेडचा गजानन, देऊळगावचा उमेश, पुण्यातले जेमीमा-पुष्कराज-ह्रषिकेश-निखिल आणि औरंगाबादचे आशीष अन् मी- असा महाराष्ट्र जमला होता. अनिश्चित काळासाठी महाराष्ट्र सोडलेल्या माणसालाच हे दृश्य काय आहे ते कळेल!!

गेल्या महिन्याभरात आमच्या तीनचार भेटींत आमच्यात इतके पाककुशल हात आहेत हे कळू लागलं... गेल्या महिन्याभरात अस्सल मराठी जेवणाच्या आमच्या तीन पंगती झाल्यायत्! हे स्वर्गसुख भोगायला मी आठवडाभर अमराठी भोजनाचा टॅक्स भरला होता, आणि त्याची मस्त परतफेड करून घेतली!! सोन्याहून पिवळा असा आमरसही 'देशावर' जाऊन आलेल्यांच्या कृपेने दिल्लीत झाला!

आता काडीकाडीने घरट्याला आकार येतोय. आमचं किचन अगदी आलं-लसणाच्या रॅक सकट नांदतं झालंय. तसेही 'रुचिरा' च्या सौजन्याने सव्वा लाख सुनांच्या सासूचे दोन जावई इथे नांदतायत! (आशीष आणि मी). इथे चक्क लोकसत्ता घरी येतो! :)

पुण्यानंतर इथलं आयुष्य इतकं वेगळं आणि छान वाटतंय!! केलेल्या कामाबद्दल चांगले-वाईट् प्रांजळ शब्द (आणि पगार :D), रोज न्यूझरूम मध्ये नवं काहीतरी शिकायला मिळणं, देवानंतर आपणच आपले पाठीराखे असणं, दिल्लीच्या आयुष्याची चव... असल्या अनेक अनुभवांनी माझं ताट आता मला अधाशीपणाने भरून घ्यायचंय!!

अर्ध्या पगाराचा चेक आला पण! ज्यांनी मला इतकं दिलंय त्या सगळयांना पहिल्या पगारातनं काही द्यायचं म्हटलं, तर ती 'ज्योतीने तेजाची आरती' ठरेल!!! :)

सध्या तरी तो चेक गणपतीबाप्पाच्या पायाशी आहे... ' पहिल्या पगारात यंव करीन आणि त्यंव करीन' म्हणणा~या मी तो अजून शिवला नाहीए... त्याला फ़्रेम करून ठेवण्यासारखे तद्दन फ़िल्मी विचार आत्तपर्यंत डोक्यात येऊन गेलेत!

इतक्यात कॉलेजचं प्रेमपत्र आलं, बॅकलॉग परीक्षांच्या तारखा सांगणारं. नाक झिजून मिळवलेली रजा ट्रेनप्रवासात खर्चणं शहाणपणाचं नाही. अक्षरश: 'गेलो उडत' आणि चेकच्या स्वप्नातल्या कळ्या 'उमलू नकाच केव्हां ' झाल्या!!

व्यवहाराच्या जगात स्वागत असो योगेशराव! :)

Tuesday, May 15, 2007

टाटा?!

छोट्या छोट्या झुळुकांनी हेलकावणारं पुणेरी आयुष्य अचानक एका झंझावाताला सामोरं गेलं आणि आमची उचलबांगडी दिल्लीला झाली... ( 'झाली' काय म्हणतोय? मीच ती करून घेतली! मुंबईच्या पोस्टिंगचा पर्याय असतांनाही एका सणकेत दिल्ली निवडली. मुंबईच्या कार्यसंस्कृतीची ओळख झाल्याने हा अनाघ्रात टापू साद घालत होता. अगदीच अनोळखी ठिकाणी जाऊन पुनश्च श्रीगणेशा करायची खुमखुमी स्वस्थ बसू देईना...)

"तीन वर्षं घराबाहेर काढली- आता अजून किती, देव जाणे..." आईचं फोनवरून भावुक होणं मध्येच मनाला बांध घालून गेलं. घरी घालवायला मिळालेला एक आठवडा चुटकीसरशी संपला. स्टेशनवर ती मला सोडायला आली तेव्हा गाडी सुटेपर्यंत ती थांबली नाही, (मी थांबू दिलं की नाही हेच आठवत नाही... but it just happened). मलाही कोण जाणे का, आज ती फार वेळ डोळ्यांपुढे नको होती. मला शाळेचा पहिला दिवस तर आठवत नाही, पण ती भावना सुद्धा अशीच असावी. असंख्य email forwards मधील 'लेकरू परदेशी निघालं'च्या वर्णनात असलेली भावुकता आज कुठेच कुणी पाघळू देत नव्हतं.

अन्नपदार्थ नेण्यात काहीच अर्थ नाही. आईनेही एका आठवड्यात मला सोडून किचनमध्ये डब्ब्यात बांधायला 'आठवणी' रांधण्यात तो वेळ घालवावा असं मला वाटलं नाही. पण तिने मला शिर्डी च्या वारीची शाल आवर्जून दिली. नाही म्हणता म्हणता मीच लिंबाच्या काही मुरलेल्या फोडी उचलल्या.

सुदैवाने अजून कुणीच 'पोचवायला' आलं नाही. गाडी प्लॅटफ़ॉर्मवरून हलली तेव्हां औरंगाबाद शहराला लागून असलेल्या डोंगरांनी मला शेवटचा बायबाय केला. आईसमोर हळवा झालो नाही, पण ट्रेन वेगात येत असताना मात्र आत काहीतरी इतकं तुटत होतं की शेवटी मला बाथरूममध्ये लपावं लागलं... आरशात स्वत:कडेच टक लावून पाहत होतो. गहिवर आला आणि कोरडा संपवला!

आता ओलावायचंही कुणासाठी?
थोडीशी कळ अजून, मग सगळे परत एकत्र येतील ना?
शिजेपर्यंत दम धरायचाच, पण निवेपर्यंतही!

खूप दिवस झालेत इथे लिहून. येईन लवकरच...
आज इथेच थांबतो...