Tuesday, April 21, 2015

मशागत... फसगत... मनोगत.

एक सुपीक, सळसळतं मन घ्यावं...
दाणेदार जाणिवांचे एखाददोन हंगाम घ्यावेत, काढणी झाल्यावर मनात जुन्या इच्छांची बीजं पेरावीत.

मग मन मारावं. पाचोळा पसरून जाळावं.
रणरणता पावसाळा, भिजलेला हिवाळा, आणि काकडता उन्हाळा त्याला दाखवावा.
ते भेगाळेल.

त्यावर कुठलंही पाखरू-वासरू बागडण्याआधी दडपणाचे रूळ फिरवून फिरवून ते दाबून सपाट करावं.

हळूहळू त्याचा नापीक कातळ होईल.
काही उन्हाळे कातळ अजून रापेल.

मग चुकून कधीतरी आतला झरा जागा होईल, फुटेल.
आत अडकलेल्या बीजांना फूस लावेल.
मग दगड झालेल्या मनातून दबलेले कोंब,
मनाचे तुकडे करत बाहेर उगवतील...

पुढचं माहीत नाही.