Monday, September 15, 2014

एका दुष्काळाचा री-टेक


-----------------------------
तसंच सांगावं, तर हा फक्त दुष्काळावरचा लेख नाही. तसंच सांगायला जावं, तर ही फक्त  एक डॉक्युमेंटरीची चित्रकथाही नाही. एका हत्तीचं वर्णन दहा आंधळ्यांनी दहा परींनी केलं. याही कथेत काही डोळस आंधळे आहेत, ते जे पाहताहेत, ते त्यांना दिसत नाहीये. हा  त्यांचा एका परिस्थितीतला अदृश्य-अलिप्त वावर आहे. वाचकालाही यात नसलेलं दिसून आलं, किंवा असलेलं दिसलं नाही तरी आश्चर्य वाटू नये.  या कथेतली सगळीच नावं-गावं-वस्तू-प्राणी-पात्रं काल्पनिक नाहीत. यातल्या कुणाचंही कुणाशीही साम्य आढळून आलं, तर तो एक योगायोग आहे. नाही आढळलं, तर तोही एक योगायोगच आहे.
-----------------------------
----1----
मुंबईतली थंडी असूनही गारवा यंदा इमानेइतबारे हजर होता. त्यातून ऑफिसांतल्या यंत्रांसाठी चालणारा ए.सी. पेटला होता. थंडीने इतकी फील्डिंग लावूनही अभयच्या कपाळावर  भयाचा घाम होता.  बुलेटिनला बसायच्या आधी बॉस जातीने झापून गेला होता.यार! रोज़ रोज़ की टुच्ची ख़बरें निकाल के डेढ़ मिनट भर देते हो, इस साल के हाफ़-अवर्स का क्वोटा कहां पूरा हुआ है? इस हफ़्ते तुम्हारा आधे घंटे का स्पेशल जाना है, दिल्ली को मैं बोल चुका हूं!

अभय तिरीमिरीत केबिनबाहेर पडला आणि आपल्या खुर्चीत येऊन बसला. आतल्याआत चुळबुळू लागला.  
अर्ध्या तासाची डॉक्युमेंटरी करायची कशावर?  कुत्र्यांचं निर्बीजीकरण?? तीन वर्षं येणार-येणार म्हणून नुसतीच गाजणारी मुंबई मेट्रो?? कोण बघणारे तिच्यायला??

ळूहळू अभयमधला माणूस दोन पावलं मागे सरला. कावळ्याच्या डोळ्यांनी पेपर चाळू लागला, कुत्र्याच्या नाकाने बातम्या हुंगू लागला. बॉस त्याचं माकड करायच्या आधी त्याला बॉसला प्लान द्यायचा होता. लोकसत्तेत दोन कॉलमची बातमी दिसली. कृषिमंत्री चिंतेत.  हिवाळ्यात चारा छावण्या पडल्या. मंत्र्यांच्या चिंतेने अभयची चिंता मिटली.

बुलेटिन संपवून बॉस खुनशीपणे अभयकडे चालत आला. मघाच्याच लोकसत्तेवर ऐसपैस रेलत अभयने विचारलं
, “दिसंबर में सूखा... क्या ख़याल है?”  बॉसने संशयाने भुवई उंचावली, आणि चक्क हो म्हणाला!

भयची टकळी लगेच सुरू झाली. बातमी शोधतांना नसलेली ओरिजनॅलिटी तो वर्णनांत भरू लागला. छावण्या पडल्यायत म्हणजे हाडकुळी जनावरं असतील. हाडकुळी असली तर विकाऊसुद्धा असतील. त्यांचे गरीब मालक
, ताटातूट, रोजगारासाठी स्थलांतर, पाण्यासाठी रांगा... अभयसुद्धा औरंगाबादचा असल्याने त्याला ही परिस्थिती माहित होती.

अभयसाठी ह्या डॉक्युमेंटरीला मिळालेला होकार अनेक अर्थांनी महत्वाचा होता.
मेट्रो रिपोर्टर, शहरांचेच उकिरडे फुंकणारा मीडिया-मजूर असल्या संभावनेपासून थोडी सुटका होणार होती, “तुमचं चॅनल आमच्या गावाकडे दिसत नाही, जिथे दिसतं, तिथे कुणी बघत नाही! म्हणून खिजवणाऱ्या गावच्या लोकांची तोंडं बंद करता येणार होती.

र्ध्या तासाचा माहितीपट म्हणण्यापुरताच. मध्ये जाहिरातींसाठी राखायची आठनऊ मिनिटं वगळता वीस मिनिटांचीच डॉक्युमेंटरी करायची होती. पूर्वतयारीसाठी मिळालेल्या तीन दिवसांत अभयने मराठवाड्यातल्या तीनचार जिल्ह्यांतल्या स्ट्रिंगरना फोन केला. स्ट्रिंगर म्हणजे चॅनलमध्ये पूर्णवेळ नसलेले, मात्र महिन्याच्या ठराविक बातम्या पाठवून मोबदल्यावर सेवा पुरवणारे स्थानिक पत्रकार. हाताशी एक नकाशा घेऊन अभय रूट आखू लागला.  प्रकट चिंतनात. प्रश्न त्याचेच, उत्तरं त्याचीच.

औरंगाबादवरून वरून तासाभरात जालना, जालन्यात दोन दिवस! तिथून बीड- बीडला दोन दिवस. परतीत औरंगाबादलाच एखादा दिवस. उरकेल आरामात!”
अरे, पण उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड कसं करणार?”
पाचावर सहावा दिवस द्यायला बॉस कुरकुरतोय! एका जिल्ह्याला एक दिवस तरी पुरेल का?”
काहीतरी जुगाड़ करावाच लागेल! जालन्यातल्या वाळल्या उसापेक्षा परभणीतला ऊस वेगळा नसणार...  उस्मानाबादेतल्या वासरांसारखीच बीडमध्येही आहेत. रात्र थोडी सोंगं फार, कुठे धावपळ करणार?”
पण नुसते प्रॉब्लेम दाखवत सुटायचंय का? दुखणं एका जिल्ह्यात असलं आणि औषध भलत्याच जिल्ह्यात असलं तिथे तर जायला नको? हे जिल्हे पण नकाशावरच बिस्किटाएव्हढे दिसतात. गाडीत बसल्यावर मात्र देव आठवतो.

तापर्यंत चाललेलं स्वगत पुटपुटण्यातून बडबडीकडे वाढल्याचं अभयलाही कळलं नाही, पण मागून डॅडी खदाखदा हसू लागले आणि अभ्या दचकला.  लग्नातल्या व्हिडिओवाल्यांकडून शीक! किती टेप्स छापल्या त्यावर  ते पैसा छापतात.. एकाच कॅसेटमध्ये सगाई-से-बिदाई-तक सगळं कशाला कोंबायचं? तू भलेही दुष्काळाची पार्श्वभूमी, परिस्थिती आणि परिणाम एकाच टेपमध्ये संपवलेस, तरी ते कुणाला कळणार नाहीत, आणि मग लग्नाच्याही शूटिंगसाठी तुझ्यासारखा कारागीर कुणी घेणार नाही!”

डॅडी उर्फ दिनेशदादांच्या सूचनेने अभयचा मेंदू स्टूडियोप्रमाणे उजळला. एका दुष्काळावर डॉक्युमेंटरीज़ ची मालिका काढता येईल हे अभयला अंमळ उशीराच उजाडलं. डॅडी मुरलेले कॅमेरामन. अनुभव, मगदूर, वचक- सगळ्याच बाबतीत अभय त्यांना फ़ादर फ़िगर मानायचा. डॅडी हा दाढीचा अपभ्रंश. 18 वर्षांपूर्वी आख्खी दाढी काळी होती तेव्हांपासून ह्या लायनीत. अभयसारख्या पत्रकारांच्या सहा-सात पिढ्यांचे उस्ताद. अभय चॅनेलमध्ये येईस्तोवर दाढीतलं पांढरं-काळं समप्रमाण झालं होतं.  दाढींचा डॅडी झाला होता. शूटिंगसाठी डॅडी यावेत म्हणून भलेभले रिपोर्टर प्रॉडक्शनवाल्यांशी भांडायचे. तेच शूटला येणार म्हटल्यावर अभयला खूप आधार वाटला.

----2----

दुसऱ्या दिवशी केंद्रीय कृषीमंत्रीच मुंबईत आले होते. पत्रकार परिषदेचा विषय वेगळा असला, तरी त्यांनी ओघाने महाराष्ट्राच्या टंचाईची स्थिती सांगितली. खुद्द कृषीमंत्री बोलतायत म्हटल्यावर अभयचे प्राण कानांत आले. त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य झळकू लागलं. डिसेंबरपासूनच महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका भरवून टंचाईवर जातीने लक्ष घालायची घोषणा मंत्र्यांनी केली.  ते पुढे जे बोलले त्याने पुढ्यातला प्रत्येक पत्रकार हादरला. पाण्यापायी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवायची शक्यता प्रशासनाने पवारांच्या कानावर घातली होती. जालन्यासारख्या शहरात आठवड्यातून एकदा पाणी येत होतं. पवार म्हणाले, ही परिस्थिती हिवाळ्यातली आहे. उन्हाळ्यात वेळ आली तर जालन्यासारखी शहरंच्या शहरं हलवावी लागणार की काय?”. ह्या तीन मुद्यांचा फ्लॅश मेसेज दिल्लीला पाठवून  अभयने दिवसाची मोठी बातमी ब्रेक केली. दिल्लीने लगेच अभयचा एक फ़ोनो घेऊन दुष्काळाची पहिली बातमी झळकवली. अभयचा दिवस साजरा झाला. डॉक्युमेंटरीला खुद्द केंद्रीय कृषीमंत्र्यांची प्रस्तावना मिळाल्याने अभयच्या शिडात मस्त वारा भरला.

इथेच बॉसशी बोलून अभयने एका अभिनव कल्पनेसाठी बॉसचा रुकार मिळवला. डॉक्युमेंटरीत म्हणजे रटाळ दृष्यांवर रटाळ कमेंटरी, आणि मधूनमधून घातलेले एखाद्या मुलाखतीचे तुकडे- उर्फ बाइट्स. या निरुत्साहाचं दुसरं टोक म्हणजे काही अतिउत्साही पत्रकार- जे प्रत्येक शॉटमध्ये शिरून मी आत्ता इथे आहे,माझ्यामागे तुम्ही पाहू शकता- आपण आत्ता बोलत आहोत- अशा प्रस्तावनेतून स्वत:चा झेंडा फडकवत राहतात. पार्श्वसंगीताला एखादी रडकी सारंगी. अतिरंजित दु
:खापेक्षा किंवा मनाच्या असल्या श्लोकांपेक्षा अभयला समोरच्यां लोकांच्या तोंडून सलग पडणाऱ्या वर्णनांचं आहे तसं वार्तांकन करायचं होतं. कॅमेरा सतत आपल्या सब्जेक्ट्सच्या चेहऱ्यांवर- जीवंत संभाषण टिपत चालवायचा. त्यातले सर्वोत्तम तुकडे बेतून लघुपट पुरा करायचा अशी ही योजना होती.
ऑफिसचं तोंड सहा दिवस पहायला नको म्हणून अभय खुश, अभयसारख्या मेहनती कार्ट्याबरोबर शूट मिळालं म्हणून दादा खुश, सहा दिवसांचा प्रवासभत्ता मिळणार म्हणून दोघं आतल्याआत खुश. तिकडे जालन्यात मुंबईचे साहेब येणार म्हणून जालन्यातले देशमुख स्ट्रिंगर रात्री आपल्या कट्ट्यावर भाव खाऊन गेले. सकाळी समोरासमोर भेट होईपर्यंत कुठून सुरुवात करणार, याची ना  अभयला माहिती होती, ना देशमुखांना कल्पना!

----3----


विमानात बसल्याबसल्या अभयने पेपर उघडला. दुष्काळावरील बातम्या डिसेंबरमध्येच छापून येऊ लागल्या होत्या. महाराष्ट्रात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळ लागत होता. टंचाईग्रस्त म्हणून घोषित झालेल्या सुमारे सव्वासहा हजार गावांपैकी मराठवाड्यातच साडेतीन हजार गावं होती.  2012चं खरीप पीक हातचं गेलं होतं, रब्बीच्या पेरण्याही दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा कराव्या लागत होत्या.  डीझेल, खतं सगळंच महाग होतं, आणि शेतकऱ्यांचे हाल प्रत्यक्षात कुणीच खात नव्हतं. अभय नगरच्या पट्ट्यात पूर्वी जाऊन आला होता तेव्हां शेतकरी देशी दारू फवारून पिकं जगवायची धडपड करत होते. आताही म्हणे काही शेतकरी खसखशीच्या शेतीतून अफू उगवायला लागले होते. नकदी पिकांपलिकडची ही भूक होती, पण ती लागायचीच पाळी शेतकऱ्यावर यावी, ही नामुष्की अभयच्या मनाला सलत होती.

आकाशातल्या प्रवासाने महाराष्ट्राचा नकाशा खरा दाखवला. सह्याद्रीच्या अलिकडची हिरवळ, अहमदनगरपुढे ओसरू लागली. औरंगाबादवर घिरट्या घालत असतांना जमिनीतला कोरडेपणा आणि गोदावरीची ओकीबोकी रेघ हजारो फुटांवरूनही दिसत होती. 


रंगाबादला एअरपोर्टवरून बाहेर पडतांनाच टंचाईची चुणूक दिसत होती. शहरातल्या मजूर अड्ड्यांवर दिसणारी शेकडोंची गर्दी हजारांत पोचतेय असा संशय येऊ लागला. अभय आणि दादांनी या लोकांना भेटले. गर्दीतले अर्धे औरंगाबादचे नव्हतेच. सामानाच्या पिशव्यांवर वसमत आणि गंगापूरच्या दुकानांचे पत्ते छापलेले होते, त्यांच्या मराठवाडी मराठीत औरंगाबादचे हेल जाणवत नव्हते. या मंडळींना गावाकडची शेती  सोडून येण्यावाचून पर्याय नव्हता. अड्ड्यावर कमाल रोजंदारी तीनशे रुपये होती.  शहरी खर्चांनाच ती पुरत नव्हती, घरी पैसे पाठवायचे कुठून? एकेकाळचे शेतमालक, शहरात गवंडीकाम, हॉटेलातली खरकटी धुणी काढत होते. आजच्या रोजगाराची उद्या खात्री नव्हती. ही मंडळीसुद्धा मागे उरलेल्या मजुरांपैकी होती. धडधाकट माणसं बऱ्या रोजगारावर निघूनही गेली होती. उरलेल्या सात-आठशेंना पुढल्या अर्ध्या तासात कुणी ठेकेदार मिळाला तरच चूल शिजायची शाश्वती होती.  औरंगाबादमध्ये असे तीन मजूर अड्डे अजून होते. परिस्थिती कशी असेल याचा अंदाज येत होता.
टीव्हीवर चालण्यालायक औरंगाबादेत आत्ता यापेक्षा जास्त काहीही मिळण्याची खात्री नव्हती. अंधार हवा असेल तर दिव्याखाली जाणं भाग होतं. जालन्याला पोचायच्या आधी देशमुख स्ट्रिंगरना फोन केला. ठरल्याप्रमाणे भेटायचं आणि देशमुख दाखवतील त्या जागांवर शूट करायचं असा अभयचा बेत होता. देशमुखांनी बॉम्ब टाकला- मला एक तास लागंन. इकडं वार्ताहार संघात आज xxxx दिन आहे. मला प्रमुख वक्ता केलं आहे. तुम्ही नाश्ता करून घेता का तोवर? आपण निघूच मग!” 

भयचा हात कपाळाकडे गेला. शेड्यूलची पहिली दुपार होत आली होती, पण जालन्यात एक सेकंद शूटिंग झालं नव्हतं. देशमुखांचाही पत्ता नव्हता. अभयने आसपास माहिती काढून घाणेवाडी तलावाकडे स्वत:च गाडी घेतली. जालना शहराला पाणी पुरवणारा घाणेवाडी तलाव जानेवारीमध्येच आटला होता. कधीकाळी म्हणे खुद्द हैदराबादचा निझाम या तलावाचं पाणी रेल्वेने हैदराबादला मागवून घ्यायचा. आता हिवाळ्यातच त्याच्या जमिनीला मस्त भेगा पडल्या होत्या. त्या भेगांनी अभय मनातल्या मनात खुष झाला. या विघ्नसंतोषी सुखाचं लगेच वाईटही वाटलं, पण त्याचा आनंद ब़ॉसच्या आनंदात होता.

मात्र त्या भेगा, एका जनावराच्या कवटीचा जबडा, बाभलीची वाळली बेटं इतकंच शूट करून भागणार नव्हतं- तितक्यात तिकडून काही गुराखी चालत आले. त्यांच्या रांगड्या आरोळ्या, गायींना थिर्रर्रर्रर्र करून बोलावणं, गायींचं हंबरणं, गळ्यातल्या घंटा- अभयने नॅट साउंड्स (नॅचुरल साउंड्स) पोटभर रेकॉर्ड करून घेतले. मग गुराख्यांना आपली ओळख सांगून बोलायला राजी केलं.  गुराखी सांगू लागले- तलाव आटल्यापासून बरेच गुराखी तांडे सोडून निघून गेले होते. तलाव आटून भेगाळला असला, तरी त्याच्या मध्यभागी ओल्या चिखलाचं डबकं आहे- त्यातून मिळणाऱ्या पाण्यावर रोज तीनचारशे गुरं आपली तहान भागवतात. एका गुराला रोज पंचवीस लिटर पाणी लागतं. अशी तीनशे गुरं रोज तिथे येऊन पाणी प्यायला दाटी करतात. गुरांची आपसात भांडणं होत नसली, तरी त्यांचे मालक भिडतातच. मग काही गुरं खाटकाला विकली जातात. आठवड्याला चार-पाच जनावरांची वासलात अशी लागतेच. दुभत्या जनावरांचेच खाण्याचे हाल होते, तिथे खोंड-रेडे-वासरं यांना प्राधान्य नव्हतं. अशात खाटीक सांगेल त्या भावाला जनावरं विकली जायची.

----4----

घाणेवाडीवरून जालन्यात पोचेपर्यंत देशमुखही उगवले. त्यांना पाहून अभय साडेतीन ताड उडाला. ते एक जख्ख वयस्कर आजोबा होते. एका वृत्तपत्रात पानं लावण्यापासून बातमी आणण्यापर्यंत त्यांचा म्हणे मोठा वाटा होता. अभयला लख्ख आठवलं. मागे त्याची एक सीनियर यांच्याच नावाने खडे फोडत होती. त्या रात्री जालन्यात झालेल्या कुठल्यातरी अपघाताचं फुटेज इतर चॅनल्सच्या स्ट्रिंगरकडून  जुळवावं लागलं कारण देशमुखांच्या मते रात्रीचे अडीच ही शूटिंगची वेळ नव्हती. ह्या अशा माणसाची मदत घेऊन पुढचं शूट करायच्या विचाराने अभयची तंतरली.

आजोबा त्याला एका गावातून दुसऱ्या गावात नेत होते-
पण काका, आपल्याला सुकलेल्या बागा पाहायच्या आहेत ना?”
ह्ये काय, पुढच्या गावात दिसतेत की!”
तुम्ही सकाळी त्या गावात टँकरसाठी होणारी चेंगराचेंगरी दाखवणार होता!”
आता सकाळला फंक्शनचं काम निगलं न दादा! तसंबी त्या गावामदी घरान्ला डायरेक्ट पाणी द्यायलेत कालपासनं!”
मग आता कुठल्या गावात चलूयात ?
शोधावं लागंन!”


फ़क्!” अभयने मनातल्या मनात कचकन् शिवी हासडली. त्याला वाढणारे तास, कोऱ्या राहिलेल्या टेप्स, गाडीचे वाढणारे किलोमीटर आणि संपत आलेला दिवस दिसत होता. टीव्हीवर दिसणारं एक मिनिट शूट करायला प्रत्यक्षात दहा मिनिटं तरी वेळ हवा होता. त्यात हिंदी आणि इंग्रजी असं दोघांसाठी शूट करायचं होतं. म्हणजे हा सगळा हिशोब गुणिले दोन इतका वेळ अभयला हवा होता, आजोबांची भाकडयात्रा सुरूच होती. अभयला थेट वय विचारायची हिंम्मत होईना, मग त्याने हळूच विचारलं.
काका, मराठवाडा निझामाकडून भारतात आला तेव्हांचं काही आठवतंय तुम्हाला?”
मंग!
पंधरासोळा वर्षांचा होतो. तवा तर आमाला अलिफ़-बे पन शिकवायचे!”

 अभयच्या कपाळावर एक आठी अजून वाढली.  82 वर्षांच्या देशमुखांना टेलिव्हिजनमधली अर्जन्सी, धावपळ, इतकंच नव्हे तर टीव्हीवर कशी दृश्य लागतात याच्याशी काहीही देणंघेणं नव्हतं. अभयचा पारा वाढतच होता. पण यांना निरोप द्यावा कसा  देशमुखांनी ती चिंता स्वत:च सोडवली. जालना-बीड हद्दीवर शहाबाद आल्यावर देशमुख टॅक्सीतून उतरावं तसे उतरून म्हणाले-
जावा आता हितनं, इथून बीड लागंन. आमचे पाव्हणे ऱ्हातेत इकडं. तुम्ही बीडवरून येतांनी तुमाला दाखवतो टंचाईची गावं, तोवर मीबी शोधून ठेवतो.”

अभयला तोंड मिटायचीही शुद्ध उरली नव्हती
!  मागे खुद्द विलासराव देशमुख मराठवाड्याला संथांची भूमी म्हणाले ती गंमत नव्हती. हे असंच प्रशासन आणि असेच नागरिक सगळीकडे मिळाले, तर निसर्गाच्याच नावे बोटं मोडूनही उपयोग नाही.




----5----

र्थात, असे राजकारणी , किमान त्यांना भलत्या कल्पना सुचवणारे अधिकारी अभयला मुंबईत भेटायचे. तेलाच्या मालगाड्या पाणी वाहायला तयार ठेवणार असल्याचं मुख्यमंत्री बोलले होते. अभयला तो भारी विनोद वाटला, कारण आख्खी मालगाडी पाण्याने भरायची वा रिकामी करायची यंत्रणा कुठेही नव्हती. हवाई इमले चढत होते. कुणी मंत्री आपल्या जिल्हासाठी भांडून जास्त चारा छावण्या मंजूर करून घेत होते. त्या जिल्ह्यांमधला दुष्काळ मराठवाड्यापेक्षा सुसह्य असला, तरी ते मंत्री साखर पट्ट्यातले होते. वर मराठवाड्यातले अर्धे मजूर आमच्याच भागात तोडणीसाठी येतायत, भागंल इथं साऱ्यांचं, अशा वल्गनाही होत होत्या.
अभयमधला रिपोर्टर बॅकसीटला जाऊन सैतान जागा होऊ लागला होता.  सूर्य मावळलाच होता. सकाळपर्यंत काही शूट करणं शक्यच नव्हतं. अभयचं अवसान खरंच गळालं, कारण जालन्याला एक तलाव आणि गुराखीच दहा मिनिटांचा पूर्वार्ध भरून काढायला पुरेसे नव्हते. त्याचं आख्खं वेळापत्रक कोलमडत होतं. एखाद्या जिल्ह्याचं होमवर्क स्वत: न करता तिसऱ्यावर विसंबण्याचा दणका त्याने अनुभवला.  उद्याच्या भेटीगाठी आधीच ठरवून ठेवण्यात बीडचा स्ट्रिंगर भावासारखा मदतीला आला.

नोज पाचपुते. बीडचा स्ट्रिंगर, जालन्यातल्या अनुभवापेक्षा उलटा अनुभव. त्याला बीडची खडान् खडा माहिती, कुठे काही खुट्ट झालं की मनोजला कळणार. घटनास्थळ वाट्टेल तिथे असू देत, मनोज बातमीचं फुटेज दीडएक तासात ऑनलाइन पाठवायची सोय करणार. त्याचा लोकसंग्रहही चांगलाच. रात्री गावी पोचेस्तोवर मनोजने तालुक्यातल्या सर्वात टापटीप हॉटेलातली सर्वात टापटीप खोली रिझर्व्ह करून ठेवली होती. आधी दिनेशदादांना आणि अभयला रात्री घरी जेवायला घेऊन गेला. उद्या कुठेकुठे जायचं त्याची यादी सांगितली. ती यादी ऐकून पूर्वी गळालेलं अभयचं अवसान मूठभर मांस बनून परतलं. मनोजच्या नुसत्या असण्याने अभयला खूप धीर आला.
पहाटे सहाला आह्निकं उरकून मनोज, अभय आणि दादा निघाले  आणि एक चारा छावणीत पोचले. एका मोठ्ठ्या माळरानावर दूरवर पसरलेले टिनाचे पत्रे, लांब-लांब वाळत पडलेल्या साड्यांचे आडोसे, दुधाच्या चरव्या लावलेल्या मोटरसायकली, आणि टँकरच्या पाण्याने ओलीचिंब झालेली एक पायवाट दिसली. हीच चारा छावणी. अशा नऊ छावण्या एकाच तालुक्यात लागल्या होत्या. छावणीत शेकडोंनी जनावरं- गायी, म्हशी, कालवडी आणि  पारडी. बैल आणि रेडे तुरळकच दिसत होते. रेतन आणि नांगरणीची कर्तव्यं बजावून घेवून बहुतेक मालक त्यांना या जन्मातून मुक्ती देत असावेत. नाना रंगांच्या आणि आकारांच्या त्या जिवांमध्ये एक गोष्ट सारखी होती. त्यांच्या दिसू लागलेल्या बरगड्या आणि खोल गेलेले डोळे. दिनेशदादा विविध एँगल्सनी जनावरांचे, गवळ्यांचे शॉट्स घेऊ लागले. अभयने कॉर्डलेस माइक चालू केला. शर्टाच्या आतून स्वत:वर  चिकटवला. मोकळ्या हाताने छावणीतून लोकांशी बोलत फिरू लागला. ऑडिओ-व्हिडिओ कॅप्चर होत गेले.
----6----

छावणीतली माणसं अभयला टकामका पाहत होती.  कुणी दोन-एक दिवसांपूर्वीच रहायला आलं होतं. कुणी आठवड्यापासून येऊन जुनं झालं होतं. प्रत्येक कुटुंबातून शिफ़्ट लावल्याप्रमाणे मुलं, बाया, माणसं- मुक्कामाला येत होती. आपलं बोलणं ऐकून घ्यायला कुणितरी आलं आहे, ह्याचंच त्यांना अप्रूप होतं. अभयलाही नवल वाटलं- टीव्ही रिपोर्टर अंगावर येतांना पाहून पळणाऱ्या शहरातल्या लोकांना तो कंटाळला होताच.  
काय दादा, धारा काढायलात?”
हा. सकाळची घरं करावी लागतेत
एकीकडं चालू ऱ्हाऊन देत तुमचं. हिंदीत बोलायला जमंल ना?”
अशा प्रस्तावनेतून संभाषण सुरू होत होतं.  थोड्याच वेळात एक-एक गोष्ट रेकॉर्ड होऊ लागली. बहुतेकांचा ऊस नासला होता. तो वाढून हमीभावापर्यंत जाणं दूरच, त्याचीच हिरवळ आता जनावरांना खायला घालत होते. 
क्या इतने चारे में एक जानवर निभा लेता है?”
क्या करींगे? निभानाच पड़ता ना... अभी हिवाला खतम नहीं हुआ. अभी कमसे कम हरा चारा तो मिलरा. मार्च के बाद उतना भी नहीं मिलना. निभा रहे कैसा भी करके. अभी से थोडा-थोडा कम किया तो धुपकाले का आदत लगेगा जनावर कू.
तिथून एक वासरू दावं तोडून येतांना अभयने हेरलं. दादांनी पटकन् कॅमेरा तिथे वळवला. अभय ते पाहून लगेच बोलता झाला. हम वहां से देख पा रहे हैं, एक बछड़ा अपनी मां का दूध पीने दौड़ के आ रहा है. वैसे इस गाय को अभी दुह चुके हैं, बछड़े के लिए कितना बचा है पता नहीं. दादा, क्या फिलहाल जानवर इतना दूध दे पा रहे हैं कि आपका व्यापार भी हो और बछड़ों को भी मिले?”
हा. हो जाता. वासरू को जादा नही लगता. वो क्या, सात आठ बार ओढता है, फिर छोड देता. अब उसकू बी हिरवा चारा देते.  कवला कवला चारा है, खा लेता बच्चा. दूध निकालींगे तूम?”

या अनाहूत सूचनेने अभय दचकला. गवळीबुवांनी कॅमेऱ्यावर काय चालू शकेल हे तेव्हढ्या वेळात हेरलं होतं. अभयलाही कल्पना आवडली. अभय उकीडवा झाला. अनोळखी मादीची आचळं धरायच्या विचाराने तो अवघडला होताच, पण गवळ्याने लगेच प्रात्यक्षिक सुरू केलं. अभय धारा काढू लागला, मोकळ्या हातांचा गवळी आता फारच खुलून बोलू लागला. त्याच्या रांगड्या हिंदीने संवादाला अजूनच फ़ील येत होता.

ये छोटे छोटे बच्चे दोतीन महिने जिंदे रहे तोहीच पावसाला देखेंगे. नहींतो इनकू निकाल दींगे
निकाल देंगे?”
खाटीक कू देना पडेंगा. बुड्ढा जनावर, भाकड जनावर या तो छोड़ देते या फिर निकाल देते.
अभय कळवळला. 
लेकिन क्यों? चारा-पानी तो सरकार दे रही है. उन्हें जीना नसीब हो तो तीन-चार महीने की तो बात है.
क्या बोलना दादा? ये पानी भी नहीं पुरता. टँकर अभी दिन में एकबार आता. उन्हाला कडक रहा तो दो दिन में आयेंगा. आपून इतना जीव लगाके इनकु बड़ा किये. इनकू रोज थोडा-थोडा मारने से अच्छा है लगेच मोकला करते. पेट भी चलाना पड़ता ना. दूध का पैसा मिला तो अपना पेट और  बाकी जानवर का पेट भरेंगा. अपने को हौस है क्या जानवर मारने का?

अभयला हवी असलेली तीन-एक मिनिटं भरून निघाली होती. गवळ्यालाही भरून येत होतं. दिवस चढत होता. सुन्न मनाने अभय गाडीत चढ़ून बसला. पुढच्या प्रवासात ती टेप रिवाइंड करून अभय पाहू लागला. गवळ्याच्या शेवटच्या वाक्याने अभयला एकदम त्याच्या ऑफिसमध्ये झालेली मोठी नोकरकपात आठवली. बऱ्याच जणांना नारळ देतांना त्यांचे बॉसेस काचेच्या भिंतीआडून हेच ज्ञान कॉर्पोरेट शब्दांत ऐकवत होते. माणूस जिथे माणसालाच सोडत नाही तिथे गुराची काय चाड राखणार? दहा मिनिटं ना अभय बोलला ना दादा.  

----7----


पु
ढल्या गावात शिरायला उशीर झाला, कारण पेट्रोल लिहिलेला एक टँकर त्या अरुंद वाटेतून रेंगाळत चालत होता, जीवाच्या आकांताने हॉर्न वाजवत होता. समोर रस्ता रिकामा! अचानक गावातून तीसपस्तीस बायका, म्हाताऱ्या, लहानसहान पोरं चक्क मोठ्ठाले ड्रम पेलत पळत येतांना दिसले. मागून तीसेक जणींची दुसरी लाट अजून पाइप्स आणि ड्रम्स घेत पळत आली. अभयचा बल्ब पेटला. पेट्रोल लिहिलेल्या टँकरच्या आत पेट्रोलपेक्षाही मोलाचं पाणी होतं. पन्नासभर ड्रम रांगेत उभे झाले. सोंडेइतका पाइप टँकरमधून ते ड्रम भरू लागला. आता हे अवजड ड्रम घरी कसे नेणार याचं अभय नवल करू लागला, तोच त्यातल्या अर्ध्या मावश्या ड्रम तसेच सोडून पळाल्या. उरलेल्या ड्रम्सवर पहाऱ्याला राहिल्या. आधी पळालेल्या मावश्या  घरातून हंडे उचलून माघारी आल्या. एक एक हंडा भरून घरी नेऊ लागल्या.
मनोज हसून अभयला म्हणाला,
हे असं चालतंय पहा इथे!”
आपल्याला यापैकी एखाद्या बाईंबरोबर हे सगळं शूट करता येईल?”
मग! त्यासाठीच आलोत की! तुमच्यासाठी एक चांगलं शिकेल कुटुंबही पाहून ठेवलंय. त्यांची हिंदीही बरीच बरी आहे. तुम्हाला चालण्याइतपत!”

अभय त्या घरात गेला. गावातल्या एकुलत्या एका डॉक्टरांचं घर. वहिनी खोळंबल्या होत्या. एक लेपल माइक त्यांना लावला. अभयने एक हंडा उचलला. एक वहिनींनी उचलला. कॅमेऱ्यात पाहत अभयने नवी प्रस्तावना केली... एक मराठी कहावत है, जबतक खुद नहीं  मरोगे तो स्वर्ग नहीं दिखेगा!”  मग पुढल्या सीक्वेन्समध्ये अभय वहिनींबरोबर ते अंतर तुडवत पाणी भरायचा अनुभव दाखवू लागला. ती वरात पाहत खो-खो हसणारे अनेक रिकामटेकडे पुरुष होते, पण एकजण आपल्या आई-बायको-बहिणीचा भार हलका करायला येईना. इतर बायकाही अभयकडे बायकांत पुरुष लांबोडा अशा ऑकवर्ड कुतुहलाने पाहत होत्या. अभयला रिकामी कळशी मिरवत जातांना मजा वाटली, पण भरली कळशी हातात घेता घेता रग लागली, आणि इतकावेळ चुरुचुरू बोलत, तुरूतुरू चालणारा अभय संथावला. एरव्ही चढ्या पट्टीत बोलणाऱ्या त्याचा जड श्वास ऑडियोत जाणवू लागला. परत पाव किलोमीटर चालत येईस्तोवर त्याचा शर्ट हिंदकळणाऱ्या पाण्याने आणि घामाने भिजून निघाला होता. वहिनींना असे आठ हंडे रोज भरून आणावे लागत. अभय कॅमेऱ्यावर गणित सांगू लागला- अर्ध्या किलोमीटरची एक फेरी, फेरीला दहा लिटरचे दोन हंडे, एकूण दहा मिनिटांची एक फेरी- म्हणजे एका घरातल्या बाईला रोजचं ऐंशी लीटर पाणी आणायला दोन किलोमीटर आणि जवळजवळ तासभर लागतो.

हिनी अभयचा एकपात्री प्रयोग थांबवत म्हणाल्या ये खाली धोने का पानी है... पीने का पानी आड से बचाबचा के निकालते! टँकर नगर बार्डर के उधर से आता- श्रीगोंदा या सिद्धटेक से. वो खारा पानी पिनेकू नहीं होता. हायवे के हाटील में तुमकू पांच का समोसा मिलेगा लेकिन पंधरा का बिसलेरी आठरा में मिलेंगा.


बीड जिल्ह्यावर ही पाळी आली कारण बोरवेलचा भरमसाठ उपसा भूगर्भातील पाणी संपवून गेला होता. एका तालुक्यात हजारोंनी बेकायदा बोरवेल्स. तीनशे फूट खणल्याशिवाय पाणी लागायचं नाही. अभयने एका बोरवेलमध्ये लांबच्या लांब दोर सोडून दाखवलाही- कोरडा दोर तीनशे फुटांपेक्षाही लांब होता. पाच मिनिटं सलग दोर ओढून हात भरून येत होते, तळहात सोलून निघत होता. वर आलेल्या पोहऱ्यात जेमतेम तीन लिटर पाणी निघालं. पेयजलाचं दुर्भिक्ष्य इतकं होतं तिथे शेतीचा प्रश्नच नव्हता. बीडमध्ये हजारो एकरांवरची लिंबं वाळून गेली होती. वरून पिवळीधमक पण आतून फोपशी. शेतकऱ्यांनी वर्षांच्या कष्टांनी वाढवलेली झाडं जाळायला-कापायला सुरुवात केली होती. जवार, हरभरा, लिंब, डाळिंब... सगळं करपून गेलं. खरीप गेला, रब्बी गेली.

----8----

तकं असूनही गावकरी भूजल वाढवणं आपल्या हातात आहे हे मानायलाच तयार नव्हते. नगर जिल्ह्यातून टँकर विकत आणून लोकांना पुरवणं चालू होतं. पावसाळ्यापर्यंत आला दिवस ढकलणं हेच त्यांना दिसत होतं. नगरमध्येही पुढल्या वर्षी पाणी आटलं तर बीडला कोण देणार ? अर्थात् ही जागृती फार पुढची होती. बीडमधल्याच उमापूर गावात दलित-सवर्णांत पेटलेलं भांडण अखेरीस पाणी तोडण्यापर्यंत येऊन पोचलं होतं. माणूस रक्ताच्या तहानेपुढे पाण्याचीही तहान विसरेल हा धक्काच होता.

समाजातले आजार राजकारण्यांच्या पथ्यावर पडतात म्हणून ते गप्प होते, मात्र यात प्रशासकीय अधिकारी भरडले जात होते. बीडचे जिल्हाधिकारी निगुतीने दुष्काळाशी सामना करत होते. टँकर घोटाळे उघड करणं, दलालांना धडा शिकवणं, अवाजवी चारा छावण्या रद्द करणं अशा धडक कारवायांनी जिल्ह्यातल्या सत्ताधाऱ्यांची रसद त्यांनी तोडली होती. याचा वचपा ऐन दुष्काळात बदलीवजा हुकुमांनी निघाला. ट्रेनिंगवरून परत आलेल्या कलेक्टरना मुख्यमंत्र्यांनी कामावर रुजू होऊ नका असं कळवलं. या हुकुमाने बीडचे सत्ताधारी आनंदले. लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. बंद-संप झाले, सर्वपक्षीय बोंबाबोंब झाली. या कल्लोळात बीडचे लोकप्रतिनिधी सामील नव्हते. मुख्यमंत्र्यांनी लगेच हुकूम रद्द केला आणि सत्तेतल्या या साथीदारांना झटका दिला. जनताभिमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालं, बीडच्या राजकीय मालकांना टपली पडली. मात्र, मधल्यामध्ये काही कागदी घोडे खोळंबले, काही सच्चे लोक तळमळले, आणि दुष्काळी नाटकाचा एक अंक मुंबईत संपला.

----9----


भय बीडवरून परत जालन्याकडे फिरला, तेव्हां जालना-बीडमध्ये सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांवर फौजदारी कलमं लावायचे आदेश देण्यात आले होते. गोदावरीकाठी शेतकऱ्यांचे पंप जप्त करण्यात आले होते. ते शेतकरी अभयकडे कागदपत्रं घेऊन आले होते. पैठणच्या नाथसागरातून येणाऱ्या पाण्यावरील सिंचनाची परवानगी 2018 पर्यंत देणारंही सरकार,  पंप हिरावणारंही सरकार. मात्र याच नदीकाठी एका आमदाराचा साखर कारखाना जोमात चालू होता. जालना नगरपालिकेच्या बिलावर जाणाऱ्या पाण्यातून रोज लाख-दोन लाख लीटर पाणी काढायला त्यांना कुणाचीही बंदी नव्हती. त्याच नदीकाठचा ऊस तेव्हढा जिवंत दिसला, पण बाकी पिकं आणि शेतकऱ्यांची अंत:करणं करपून चालली होती. जालन्यातल्या टँकर्सने जानेवारीतच 1800चा आकडा गाठला होता.  खुद्द जालना शहरातच पंधरा दिवसातून एकदा पाणी येत होतं.

बिया आणि धातूंच्या कारखान्यातून कोट्यवधींचा व्यापार करणाऱ्या जालन्याला सोने का पालना म्हणायचे. सोनं पाणी घेऊ शकत नव्हतं. जालन्याला येणारी पाण्याची पाईपलाइन फोडून लोक रस्त्यात भरून घ्यायचे. कालवे ओकेबोके होते, 70,000 कोटींची उड्डाणं घेणारा सिंचन घोटाळा जागोजागी जाणवत होता. कागदोपत्री असलेले प्रकल्प म्हणजे अर्धीमुर्धी बांधकामं होती. बोअरच्या पाण्याने जालन्यात मुतखड्याच्या तक्रारी वाढल्याचे कयास होते. जालना शहराला मोठ्या खेड्याची कळा आली होती.

दिवस ओसरला तेव्हां रात्रींचे रंग दिसू लागले. हायवेकाठच्या हॉटेलांमध्ये गर्दी मुळीच ओसरली नव्हती. या हॉटेलांच्या भिंतींवर कुठल्याही साहेबांचे फोटो हे त्या हॉटेलच्या  जीविकेचं लक्षण होतं. गावांमध्ये टँकर येवो न येवो, इथे गीझरपासून लॉनपर्यंत पाण्याची वानवा नव्हती. औरंगाबादच्याच वाळूजमध्ये बनलेली बीअर इथे फसफसत होती. शहरांत पाणीकपात असली तरी दारूचे कारखाने नांदत होते, अनेक वर्षं थकलेली पाणीपट्टी विसरून कारखानदारांचे
गुड टाईम्स चालू होते. औरंगाबादसाठी यंदाच्या बजेटमध्ये पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र घोषीत करण्यात आलं होतं. पाण्याचे स्रोत नसले तरी त्या बातमीने ओसाड जमिनींचे भाव वाढू लागले होते, शहराजवळच्या शेतकऱ्यांना जमिनी विकायला प्रोत्साहन मिळत होतं.

----10----

छोट्या छोट्या खेड्यांमध्ये तर प्रसंग बिकट होता. पडके वाडे, दारांवर कुलुपं, भिंतीतल्या खबदाडांत विझलेल्या पणत्या आणि पारांवर विझलेले डोळे घेऊन बसलेली म्हातारी माणसं. अंबड तालुक्यातलं दोन हजार उंबऱ्यांचं कर्जत खेडं 25 टक्के ओस पडलं होतं. अशी शेकडो खेडी मराठवाड्याच्या नकाशावर होती. त्यात उरलेली म्हातारी माणसं आणि चिमुकली पोरं एकमेकांना सांभाळत जिवंत होती. मेहनत करू शकणारी सगळीच माणसं शहरांकडे गेली होती.  गावातल्या हापशांवर पोरं झोका घेत होती, पण हापशाने एक टिपूस गाळलं नाही.

मुंबईहून परतलेल्या काही बायका जत्थ्याने समोर आल्या. मुंबईत भागेना म्हणून परत यावं लागत होतं, तिकडून पैसा येईना म्हणून मुंबईला फिरून जावं लागत होतं. शेतकऱ्यांच्या या लक्ष्म्या कुठे हॉटेलात रोट्या भाजत, गवंडीकामं करत धन्यांबरोबर पुण्यामुंबईला, औरंगाबादला जगत होत्या. परत जाणाऱ्या बायका घरी पोरांच्या विचाराने गलबलत होत्या. उपाशी, आजारी म्हातारे शून्यात टक लावून पाहत होते. त्यांच्यासाठी शहरात गेलेल्या पोरांचे उपाशी चेहरे अभयला आठवले. औरंगाबादला गाडी पुसून पैशांसाठी गयावया करणारा चाळिशीतला बबन, हायवेवर ढाब्याचं अंगण झाडणारी शालन, मोंढ्यात धान्याची पोती वाहून थकलेला फ़रीद... सगळ्या-सगळ्यांचे चेहरे त्या गावकऱ्यांमध्ये दिसू लागले होते. ज्या व्हिजुअल्सने अभयच्या टेप्स भरायला सुरू झाल्या होत्या, शेवटच्या शॉट्समध्ये तशाच चेहऱ्यांनी एक वर्तुळ पूर्ण होत होतं.  गावातल्या शनिमंदिरातला देवच बिनातेलाचा होता, मशिदीतली अज़ान उपाशीपोटी घुमत नव्हती. समाजमंदिरात बाबासाहेबांच्या तसबिरीला कुलुपात सोडून सगळेच गावकुसापलिकडे रोजगारासाठी गेले.
वस्तीतल्याच एका आजोबांबरोबर अभय शेवटचा सीक्वेन्स रोल करत होता. डोळ्यांच्या खाचा झालेली म्हातारी किती कोसांवरून पाणी घेऊन आली माहित नाही. नवऱ्याच्या हुकुमावर पाहुण्यांना ताज्या पाण्याचे पेले निमूटपणे दिले. त्या पहिल्या मचूळ घोटावर अभयच्या ड्रायवरने उरला ग्लास ओतून दिला. अभयच्या डोळ्यातलं मीठ फुलपात्रात पडलं. तो मराठवाड्याला पाण्याच्या त्या एका थेंबापलिकडे काही देऊ शकला नाही.


--------------------------------
उपसंहार

भय ही सगळी चित्रं घेऊन परतला. डॉक्युमेंटरीला धडाधड म्यूझिक, फडाफड इफेक्ट्स, तडातड व्हॉइसओव्हर काही-काही द्यावं लागलं नाही. गावांमधली भयाण शांतता, घाणेवाडीच्या तलावाच्या भेगा, उपाशी गुरांचं हंबरणं, विहीरीच्या तळावर आदळून घुमणारे कळशांचे ऍम्बियंट साउंड्स, वाळल्या पिकांचा मॉन्टाज, गांजल्या चेहऱ्यांचे लाँग-मिड-क्लोज़अप्स आणि  कुठल्याही पाल्हाळाशिवाय मुद्याला भिडणाऱ्या मुलाखती पुरल्या. त्यात शासकीय माहितीचा फापटपसारा नव्हता, राजकीय शिलेदारांचे बाइट्स नव्हते. बांध फोडून बोलणारे गावकरीच होते. दिनेशदादांच्या कॅमेऱ्याने आणि अभयच्या  लिमिटेड टकळीने आपलं काम इमानेइतबारे बजावलं. डॉक्युमेंटरी जिवंत झाली. अभयला गायीच्या धारा काढतांना पाहून बॉस जाम खुष झाला होता. अभ्याच्या क्लोज़अपवरून बाहेर येऊन अनंतात विस्तारणाऱ्या कोरड्या  कालव्याची फ्रेम पाहून एडिटर खुष झाला. पानी के लिए आज पसीना, कल आंसू, परसों खून- या  अभयच्या साईन-ऑफ़वर कॉपी एडिटर खुष झाला. हिवाळ्यातच रंग दाखवणाऱ्या दुष्काळावर मंत्रालयत अनेक जण खुष झाले.
नाखुश होते ते फक्त अभयच्या बॉसचे एक वरिष्ठ. इसे डॉक्टर का ही घर मिला था पानी भरने?  किसी ग़रीब घर में नहीं गया? या प्रश्नाला अपील नव्हतं. दिल्लीतल्याच एका दिग्गजाने मात्र आपल्या ट्वीटमध्ये अभयचं कौतुक केलं. अभयला पुन्हा एप्रिलमध्ये मराठवाड्यात जायला मिळालं तेव्हां शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पैशापायी रखडलेली लेकरांची लग्नं, कैकपटींनी वाढलेल्या चारा छावण्या, त्यांतला घोटाळा रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय फरफट, जलसंधारणाचे प्रयत्न, शेकडोंनी मरणारे वन्यजीव, उन्हाळी सुट्टीतही माध्याह्न भोजनासाठी चालणाऱ्या शाळा, जातीपातीवरून कुणाचं तुटणारं पाणी, जालन्यातून मोसंबीचं होणारं उच्चाटन अशा मुद्द्यांची वानवा नव्हती.
नेत्यांच्या लटक्या अश्रूंनीही शेतकऱ्यांना गारवा मिळाला असता. मिळाला तो धरणं भरण्याचा घाणेरडा पर्याय. अगस्ती ऋषीने एका आचमनात समुद्र रिकामा केला. त्याच्या उलट पराक्रम गाजवू पाहणारे हे ऋषितुल्य, किंवा गोदावरीच्या पाण्यावरून भांडणारे नाशिककर आणि औरंगाबादकर नेते, जीव मुठीत धरून जगणारी लाखो गुरं, हजारो शेतकरी आणि शेकडो अधिकारी- या सगळ्यांना प्रतीक्षा होती ती पावसाची. देवाच्या 2013 चा पाऊस पडू लागला. मंत्री, अधिकारी, शेतकरी, गुरं सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाऊस थांबला नाही. त्याचा पूर झाला, ओल्या दुष्काळाचा रंग दिसू लागला. या अशाच राड्यात त्याच त्या चुकांचं बीज रुजतं. राजकारणाचं झुडुप दुष्काळात फोफावतं.

कॅमेऱ्यावर बोलतांना चुकलं तर डॅडी परतपरत रीटेक घ्यायला लावायचे. परफेक्ट टेक च्या आशेवर अजून एक रीटेक. मागच्या दुष्काळापेक्षा पुढला दुष्काळ भेदक आणि पोषक ठरावा म्हणून नेतृत्व दुष्काळांचे रीटेक पाहत असावं. परफेक्ट दुष्काळाला नेहमीच वाव असतो ना! तेव्हां भेटूयात पुढल्या दुष्काळात, याच गावांत, याच दिवसांत. तोपर्यंत बघत रहा. फक्त बघत रहा!