अरुणा सुटली. जवळजवळ बाबांच्या वयाच्या अरुणाला कायम एकेरीतच संबोधत आलो आहे, कारण अरुणा माणसातून उठली तेव्हां ती माझ्याच वयाची होती.
जिवंत नसलेलं पण सजीव असलेलं तिचं अस्तित्व निमित्तमात्र. अरुणा हे नाव धारण करणारा तो रक्तमांसाचा गोळा, 'माणूस' लेबल धारण करणाऱ्या अनेक प्रवृत्ती दाखवत आला, म्हणून न दिसलेल्या त्या बाईबद्दल आज खूप दाटून येतंय.
चिन्मयी सुमितने स्टेजवर साकारलेल्या अरुणाशी तोंडओळख होती, पण प्रत्यक्ष अरुणा अनुभवली, ती तिच्या दयामरणाच्या खटल्याचं वार्तांकन करतांना.
भारतातलं एक सरकारी रुग्णालय सगळ्या आशा सुटलेल्या एका रुग्णाची सेवा पदरमोड करून करेल, हे कुणालाही खरं वाटणार नाही. अरुणाच्या मोठ्या बहिणीला, शांताक्कालाही ते खरं वाटलं नाही. म्हणून 15 मिनिटांवर राहणारी शांताक्का अरुणाला तशी बघायला यायला फारशी धजावली नाही. सत्तरीतही दूध विकून गुजराण करणाऱ्या शांताक्काला, इस्पितळ अरुणाला माझ्या सुपुर्द करेल ही भीति तिच्या ठिकाणी रास्त होती. दोन वर्षांपूर्वी शांताक्का गेली. कदाचित इहलोकात न परवडणारी बहिणींची गळाभेट तिकडच्या जगात झाली असेल.
अरुणाच्या आयुष्यात नर आणि पुरुष, दोन्ही येऊन गेले. एक वॉर्डबय- ज्याच्या लेखी अरुणा वाटेतला काटा होती. त्याच्या चोऱ्यामाऱ्या उघड करणारा स्त्रीदेह, लोळागोळा करणारा सोहनलाल आपली मौत मेला, न्यायदेवतेच्या लेखी त्याच्या गुन्ह्याची शिक्षा सातच वर्षं होती. अरुणाचे वाग्दत्त पती- चार वर्षं तिच्या परतण्याची वाट बघत तिच्याजवळ होते, पण शांताक्कांची प्रॅक्टिकल उमज त्यांनाही शेवटी आली. अरुणा सोडून काळ कुणासाठीही थांबला नाही. अरुणा ज्यांना बेशुद्ध आढळून आली, त्या डॉ. रवि बापटांकडून या सगळ्या आठवणी ऐकणारा बधिर होतो...
अशात अरुणाचं कुटुंब बनलं तिच्या बरोबरच्या नर्सेस. 42 वर्षांची शूश्रुषा, म्हणजे केईएमचे कित्येक डॉक्टर-नर्सेस अरुणा अंधारात गेल्यावर जन्मले असतील- पण स्टाफ़च्या इतक्या पिढ्यांसाठी अरुणा त्यांचंच बाळ होती. केईएमच्या माजी डीन प्रज्ञा पै म्हणाल्या होत्या- "हॉस्पिटल मेसचंही खाणं तिला देणं नकोसं वाटे, मग कधी कुणी आपल्या घरचा डब्बा अरुणासाठी पण आणायच्या. एकदा कुणितरी आंब्याची एक फोड अरुणाच्या ओठावर टेकवली. मानसिक वय तीन महिने असलेल्या अरुणाने पहिल्यांदा मिटक्या मारल्या." बाकी कुठलंही ज्ञानेंद्रिय निकामी असलेल्या देहाला अर्धा चमचा आनंद तसा मिळाला होता. तिला अशीच आवड माशांची पण होती.
कुणी अरुणाला कानाशी भजनं लावून द्यायचं, अरुणाला कळो न कळो, जुन्या जाणत्या नर्सेस तिच्या उशाशी बसून काहीतरी बोलायच्या. अरुणाच्या घशातनं निघणारे आवाज प्रतिसादाचे असतीलही, पण ते सर्वस्वी ऐकणाऱ्याच्या श्रद्धेवर आहे.
अरुणाच्या कवडशात चमकणारेही कमी नव्हते. तिच्यावर पुस्तक लिहून तिची मैत्रीण म्हणवून घेणारी पिंकी विराणी अरुणाला शुध्दीत असतांना माहीत असल्याच ऐकिवात नाही. त्या पुस्तकावर कमावलेल्या डबोल्यातून पिंकीने अरुणाची शूश्रुषा प्रायोजित केल्याचं माहित नाही. अरुणाचे किती बेडपॅन पिंकीने साफ केले असतील माहीत नाही, पण अरुणाचे पिंकीवर इतपत उपकार नक्कीच आहेत की अरुणामुळे पिंकीला येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळाली. काही मोजक्या भेटींवर लिहिलेलं हे पुस्तक, आणि त्या आधारे अरुणाला दयामरण द्यावं हे सर्वोच्च न्यायालयाला मानभावीपणे सांगणाऱ्या पिंकीवर आख्ख्या केईएमचा आणि माझ्यासारख्या काही लोकांचा नेहमीच राग असेल.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतांना केईएमचे डीन असलेले Dr. Sanjay Oak तसे बालरोगतज्ञ, पण अरुणाची सेवा करण्यात ज्या केईएम कुटुंबाने कधीच कुचराई केली नाही, त्यांच्या प्रमुखाकडूनही तेच प्रेम ऐकायला-पाहायला मिळालं. “42 वर्षं गादीत पडलेल्या देहाला एक बेडसोअर होऊ नये, तिच्या घशात नळ्या घालून अन्नाची पेज घालून जगायची पाळी अरुणावर येऊ नये, जगात कुठेही प्रोफेशनलिझम आणि सेवेची अशी सांगड दिसणार नाही.” या सारांशाचं त्यांचं विधान सुप्रीम कोर्टाच्या दिशादर्शक निर्णयात महत्वाचं ठरलं.
अरुणा अंधारात गेल्यावर केईएममध्ये आशेचा किरण बनून राहिली. माध्यमांपासून, भोचक नजरांपासून तिला दूर ठेवणाऱ्या, निवृत्तीनंतरही येऊन तिला भेटत राहणाऱ्या, हॉस्पिटलमध्ये आयुष्याची दशकं घालवणाऱ्या कित्येक लोकांच्या आयुष्याचा एक कोपरा आता कायमचा मोकळा झालाय.
अरुणाला जो उजेड, जी मोकळीक या जगात मिळाली नव्हती, ती तिला त्या जगात मिळेल. वापराविना कायमची मुडपून बसलेली तिची बोटं मोकळी झाली असतील, आणि या सगळ्या लोकांना तिचे आशीर्वाद मिळत राहतील.
तिचा देह जाळायला नेतील. तिचे रक्ताचे नातेवाईक नसोत, पण तिचं कुटुंब असेल.
तिला इथून पुढे वर्षश्राध्दं देणारं तिचं कुणीच नाही,
पण जी श्रद्धा तिला देहात अडकून मिळाली, ती आपल्या कुणाच्याही नशिबात नसेल.
तिला इथून पुढे वर्षश्राध्दं देणारं तिचं कुणीच नाही,
पण जी श्रद्धा तिला देहात अडकून मिळाली, ती आपल्या कुणाच्याही नशिबात नसेल.
वॉर्ड नं. 4 मधला तिचा बेड, आता तिच्यासारखाच मोकळा आणि सुना झाला असेल.
गॉड ब्लेस यू, अरुणा...
No comments:
Post a Comment