Saturday, January 24, 2009

काटकसर

कोकणस्थ बुडबुड्यांची कृती-
साहित्य: 1)कुठल्याही उद्यानाबाहेर-बीचवर बुडबुड्यांच्या साबणाची मिळणारी डबी,
2) कोकणस्थांचेच दात, कोकणस्थांचेच ओठ.

कृति- १) द्रावणात बुडबुड्याची नळी टाकून वर घ्यावी, साबणाचे जादा थेंब झटकून डबीत पाडावेत.
२) हळूवार फुंकर मारावी. एका फुंकरेतून ५० बुडबुडे सहज निघतात.
३) त्यातला सर्वात मोठा बुडबुडा हेरून पुन्हा नळीने धरावा. तो लहान होत होत परत नळीच्या तोंडावर पापुद्रा बनवतो.
४) ह्यातूंन बुडबुड्यांचा नवा घाणा काढावा. आधीच्या घाण्यातले शक्य तेव्हढे बुडबुडे वाया घालवू नयेत. हा प्रकार देशस्थ दर्शकांना विशेष आवडतो.


:D

Monday, November 24, 2008

एक अपूर्ण पसायदान

प्रेमाला उपमा नाही...
उपम्यातल्या खवट दाण्यासारखा एखादा दिवस येतो...
सगळ्याच उपमा बिघडतात...

दगडाची भिंत चालवता येते,
पण दगडी ह्रदय पाझरत नाही...
रेडाही वेद वदतो,
पण ते तीन शब्द काहींना हंबरताच येत नाही...

आपण अज्ञानेश्वर बनतो...
शिळेचं दार लावून घेतो...
आठवणींची मुळं उगवतात...
गळ्याचा विळखा घेतात...

पुढे कुणीतरी ही मुळं सोडवायचा प्रयत्न करतं...
त्या समाधीचे गोडवे गायले जातात...
पण ह्या समाधीला छळतेच
- अपूर्ण पसायदानाची अपूर्ण भैरवी...
आणि काळोखातला शुकशुकाट.

Monday, August 25, 2008

मानसीचा चित्रकार...

हे नवीन व्यसन- Facebook वरच्या 'ग्राफ़िटी'चं. एका वेळी एकाच छटेचा ब्रश वापरता येतो. Photoshop च्या सोयी नाहीत. माऊस पण खूप त्रास देतो. तरीही अक्षर जसंच्या तसं ठेवायचा आटोकाट प्रयत्न केला आहे....
ही चित्रं टप्प्याटप्प्याने घडतांना पहायला play बटणावर क्लिक करा.

१) रुक्मिणीची व्यथा








२) भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते...






Monday, August 11, 2008

वंदे मातरम!

वेदमंत्रों से है बढ़कर वंद्य वंदे मातरम!

मंत्र से एक मुल्क मुर्दों का हुआ था उठ खड़ा,
निर्दयों से शांतिवादियों का था पाला पड़ा,
अब निहत्थों को मिला था शस्त्र वंदे मातरम!


मां की रक्षा के लिए थी यज्ञ की ज्वाला उठी
लाखों वीरों ने चढ़ाई उसमें अपनी आहुति
आहुति से सिद्धि पाया मंत्र वंदे मातरम!

मंत्र यह जिसने बनाया जिसने गाया और जिया
हर हुतात्मा देव बन कर स्वर्ग को भी पा गया
आरती में उनकी गाएं गीत वंदे मातरम्!

-Yogesh
(A tranlsation of a Marathi song based on Vande Mataram)

Saturday, July 26, 2008

ऑफ़िसातलं 'वर्‍हाड'.


'वर्‍हाड'ची ही क्लिप चालवत तिच्याबरोबरच हा उतारा वाचावा. ह्या संवादातील कर्मचारी निव्वळ काल्पनिक असून वास्तवातील कुठल्याही व्यक्तीशी हिचा संबंध नाही. (असल्यास माझंच दुर्दैव!)


"वन्सं!! वन्सं!!! वन्सं!!!!"
गेली तिकडे... गेली ना?!
अगंऽऽऽ आजिबात कामाला हात लावत नाही!


नुसतं ह्या desk वरून त्या desk वर... त्या desk वरून ह्या desk वर! गुरुगुरुगुरु हिंडती अन भासवती, कामाचे डोंगर उपसायली! पण आपल्याला बोलता येत नाही ना? तोंड धरून बुक्क्यांचा मार चाललाय चॅनलमध्ये. सांगता कुणाला? सांगता कुणाला?? कसेतरी दिवस काढायचे, झालं! फार कंटाळले ह्या ब्यूरोत मी, शप्पत खोटं नाही सांगत! दिल्लीला रोज मेल टाकते, मला उचला! तेही कुठे रजा टाकून गेलेत कुणाला माहिती!!

... अजिबाऽऽत काम करत नाही!!

... बरं, बोलायला जावं तर नाकावर माशी बसू देत नाही! स्वभाव तर माहितेय तुला कसाय... बोललं की 'फुस्स'... बोललं की 'फुस्स'... बोललं की 'फुस्स'! अगं काय? हीच जगात एक सीनिअर आहे की काय? सीनिअर झाली म्हणून डोक्यावर मिरी वाटायची की काय? वा गं बाई वा, असं कसं? एव्हढं मोठं चॅनल आणि ब्यूरो म्हटल्यावर प्रत्येकाने थोडं-थोडं तरी काम केलंच पाहिजे की नाही? एकट्या रिपोर्टरने किती म्हणून मरमर मरायचं? त्याला काही मर्यादा आहेत की नाही शेवटी? एकत्र डेस्क म्हटल्यावर प्रत्येकाने थोडं-थोडं काम करू नाही? वा गं बाई वा! असं कसं?

... आता तुला मी परवांचीच गोष्ट सांगते, बॉस अन् मी उभे होतो, coffee machineशी गप्पा मारीत! मी त्यांना म्हटलं, म्हटलं मी, मला नाही राहवलं... "तुमची जूनिअर आणि आमची सीनिअर झाली म्हणून डोक्यावर धोंडा फोडायला सांगता का? का दगड फोडायला सांगता?!" आपला हक्काचा बॉस म्हणून मी त्यांना सांगायला गेले! अन् काही नाही गं, काय म्हनलं ना, बूमची शप्पथ घेऊन सांगते-- "तुम्ही तिला समजावून का नाही सांगत हो?! एखादा input नसला, तर तो घेऊन ठेवायला सांगा, एखादी टेप असली तर ingest करायला सांगा, एखादी इंगिल्श बाइट paradub करायला सांगा! तेव्हढाच कामाचा भार हलका होतो!" आपला हक्काचा बॉस म्हणून मी त्यांना सांगायला गेले...

... सांगितल्याबरोबर मला म्हनले- "गप, बोलू नको!! गप, बोलू नको!! गप, बोलू नको!!" इतकं बोलले बाई मला भडंभडं!! आपला हक्काचा बॉस म्हणून मी सांगायला गेले तर आपलं मेलं सोंग असं... आपलं नशीबच फुटकं... जिथं हात घालायला जावं तिधं भोकं निघाया लागलेत! तरी कॉलेजमध्ये placement incharge ला म्हनले होते मी, "मला ह्या चॅनेलमध्ये देऊ नका!" पण त्यांनी माझ्या पाठीवर (?!) हात फिरवू फिरवू मला सांगितलं, "मोठ्ठं चॅनल! मोठ्ठं चॅनल!!" हे-- मोठ्ठं चॅनल!! बडा घर अन पोकळ वासा!!

आजिबात काम... धृ

बरं, कामाचं काही नाही- कामाने कुणी झिजणार आहे का लुळंपांगळं होणारे? मला कामाचं काही नाही वाटतं. हिचं कसंय? काम तर काही करायचं नाही, पण चांगलं काही झालं, की मोठेपणा सगळा आपल्याकडे घ्यायचा! कोणाला सांगणारे गं मी? मरमर आपण मरायचं आणि मोठेपणा हिने घ्यायचा! आता परवाचीच गोष्ट सांगते-

१) आपल्या बुलेटिनला स्टिंग ऑपरेशन झालं... स्टिंग... स्टिंग ऑपरेशन गं! हं?! अगं, झालं का नाही? एकतर व्हय तरी म्हन नाहीतर न्हाय तरी म्हण! झेंडू फुटल्यासारखी पाहतेस काय माझ्याकडं? अन तिला घाबरता का गं एव्हढं, मी आहे ना!! (फक्त ती आली की सांगा!)... परवांच्या बुलेटिनला स्टिंग ऑपरेशन झालं, ही सगळीकडे सांगत सुटली, "माझ्यामुळं स्टिंग ऑपरेशन झालं! माझ्यामुळं स्टिंग ऑपरेशन झालं!!" हिच्यामुळं कॅमेरामनचं टाळकं फुटलं!

२) आपल्या business desk च्या पोरीला जर्मनीची फ़ेलोशिप मिळाली, ही बाई सगळीकडं सांगत सुटली, "माझ्यामुळं तिला फ़ेलोशिप! माझ्यामुळं तिला फ़ेलोशिप! माझ्यामुळं तिला फ़ेलोशिप!" हि-च्या-मु-ळं-ति-ला--फ़े-लो-शि-प!! 'ढ' मेली!! बरं, बातमी कवां सांगावी-कशी सांगावी ह्याला काही धारबळ? लोकांना Outlook वर mails पाठवू-पाठवू सांगायली!

३) यंदाच्या आठवड्यात TAM चा निकाला आला माय!! चॅनलचा TRP टरारून वर आला! ही बाई सगळीकडं गावात सांगत सुटली, "माझ्यामुळं TRP टरारून वर! माझ्यामुळं TRP टरारून वर! माझ्यामुळं TRP टरारून वर!" हि-च्या-मु-ळं- T-R-P ट-रा-रू-न- व-र!! टरटरी मेली!

Thursday, March 20, 2008

एकाच ह्या जन्मी जणु...

फिरुनी नवा जन्म... कृष्णधवल चित्रांना रंगवून-मिरवून आपली लाल करायचा मोह अखेरीस आज वरचढ ठरलाच. गेल्या काही महिन्यांत रंगवलेली जुनी चित्रं आज परत मांडत आहे.

सुलोचनाताई



















'हात नगा लावू माझ्या साडीला'














दिल अपना और प्रीत परायी (मीनाकुमारीच्या चेहर्‍यावर वेगवेगळ्या ठिकाणी पडणारा उजेड दाखवायचा प्रयत्न- कितपत जमलाय?)













साहिब बीवी और गुलाम (On second thoughts, गुरुदत्त च्या कुडत्याचा रंग मलाच नाही आवडला. पेल्यातली दारू रंगवणं मीनाकुमारीच्या साडीपेक्षाही अवघड होतं.)
















शुभा खोटे. [कोण म्हणेल ह्याच 'एक दूजे के लिए' मध्ये आहेत?! :) ]
[ह्या चित्राने खूप त्रास दिला... ऊन रंगवणं, झुडुपं रंगवणं ह्याला खूऽऽप वेळ लागला.]

अ जू न चि त्रं आ हे त... ल क्ष ठे वा!

Wednesday, March 19, 2008

एक परीक्षण उशिराने... च् च्!!



Research म्हणजे प्रसंगांची chronological मांडणी, वंशवृक्ष आणि नातीगोती ह्यांचे शाॅर्ट नोट्स इतकंच?
प्रसंगांची मांडणी करतांना थोडी common sense दाखवावी ना!!

१) अकबरला आणि अख्ख्या दरबाराला भर गोंगाटात जोधाच्या अंत:पुरातलं भजन ऐकू येतं आणि आपला हीरो चक्क दरबार सोडून आतमध्ये येतो! दोनतीन बुरूज आणि तटबंद्यांपलिकडेही ऐकू यायला त्याकाळी तंत्रज्ञान पुढारलेलं नसल्याने एव्हढ्या अंतरावर तयार गळ्यातून निघालेली अज़ानच ऐकू जाईल असं वाटतं.
जोधाच्या फुफ्फुसांत इतकी ताकत भलेही असो- इतक्या volume चं भजन गातांना तिच्या गळ्याच्या-कपाळाच्या शिरा अगदी नॉर्मल?!

२) राणी म्हणून चांगली असो, पण 'जोधा बच्चन' स्वयंपाकीण म्हणून उधळी दिसतेय. बावर्चीखान्यात भाज्यांचा ढीग पाहून मॅडम गावजेवण घालतील असं वाटलं, पण तितकं अन्न आणि इला अरुणचं रक्त आटवून ती फक्त सात-आठ पातेली रांधून घेऊन आली?!

वरून अकबरला म्हणते- "उसे मत खाईये!! "(ढॅण्टढॅण!!)
"उसमें नमक कम है!!" (सतारीची लकेर आणि हास्यकल्लोळ!!)

(आमच्यात वाढायच्या आधीच हे तपासून घेतात बरं! )

३) ज्या काळात नवरे लढाईला गेल्यावर बायका पडद्यांआड जोहाराची तयारी करून बसत, तिथे जोधाराणी घोड्यावर बसून रणांगणावर आलेल्या दाखवल्याय्त!

४) समशेरीचा रियाज़ करतांना बिनचिलखताची माणसं लोखंडी समशेर चालवतात- यह बात हज़म नहीं हुई!


५) पाचसहाशे माणसांना 'अज़ीम्-ओ-शान शहनशाह' ह्या ओळी एकाच यमकात एकाच वेळी सुचतात हेही विनोदी वाटतं खरं- गाण्याचे शब्द त्याला पार्श्वसंगीताच्या category साठी योग्य ठरवतात- 'जश्न्-ए-बहारा' आणि इन 'लमहों के दामन में'- ही गाणी पण तर अशीच वापरलीत ना? पार्श्वसंगीतासारखी?

Gowariker! You too? 'स्वदेस' किंवा 'लगानच्या' काल्पनिक पात्रांना हे ट्रीटमेंट ठीक आहे, पण ऐतिहासिक पात्रांनी काय हत्तीघोडी मारलीत?

नितिन देसाई, किरण देवहंस आणि तनिष्कच्या सुवर्णकारांना टाळ्या!!

ऋतिकचा अभिनय बरा जमलाय, ash did best possible justice to her role - तसंही ही मंडळी काहीही (नाही) नेसलं तरी देखणी वाटतात्- कास्टिंग फ़ूलप्रूफ़्- UTV चा खर्च (बहुतेक) वसूल... अजून काय हवंय?

6) अजून एक चमत्कार!! 'ख़्वाजा मेरे ख़्वाजा' मध्ये हार्मोनियम ऐकू येतो. मात्र हार्मोनियम १९व्या शतकात भारतात आला.

नौशादजींनी मुघल्-ए-आज़म मघ्ये असला काही लोच्या नाही होऊ दिला.

B&W चित्रपट होता तरीही के. आसिफ़ने रंगांच्या निवडीत आळस नाही केला हे चित्रपट रंगवल्यानंतर सिद्ध झालं! आपली पिढी कुठल्या रीसर्च च्या गोष्टी करते?


----

हे आधी लिहायला आवडलं असतं, पण first day-first show जाता यावं अशी सवड नाही, आणि परीक्षणं लिहायचा पगार नसल्याने आपण त्या भानगडीत कधी पडत नाही. (तसंही हे परीक्षणाच्या व्याख्येत बसत नाही)

(इतकं असूनही) चित्रपटाला ३.५ तारे. (डोळ्यांसमोर बरेच!!)


Sunday, March 09, 2008

माझ्यात दडलेलं मूल

Valentine's day झाला, आम्ही नाही पाहिला! Women's day झाला, आम्ही नाही पाहिला (कशाला पाहणार? मी तर male chauvinist वराह!!)

...मात्र सध्या दिन-दिन बालदिन (दिन दिन दिवाळीच्या चालीवर) जगत आहे...

लिफ़्टमध्ये शिरतांना/बाहेर पडतांना बरोबर कुणी नसलं की उगाच कार्टूनगिरी करायची हुक्की येते...

१) लिफ़्ट चं दार उघडतांना ते जणु आपल्या शक्तीने उघडतंय असा अभिनय करायचा-- लिफ़्टचं दार 'फाडून' उघडल्यासारखं. :)
२) लिफ़्ट मध्ये उडी मारून शिरायचं
३) लोकलच्या दारात शिरत असल्याच्या आवेशात-अभिर्भावात शिरायचं
४) आपल्या मजल्याचा बल्ब जळू लागला की लिफ़्टच्या दाराशी अश्या रीतीने कलंडायचं की जणु आपल्या पडण्याला मोकळी वाट देण्यासाठीच साठीच लिफ़्ट उघडतेय.
५) लिफ़्टमध्ये एकटा असलो की बकरीताना/बिजलीताना, कधी जमले नसते असे तत्कार किंवा पदन्यास करायला खूप मजा येते!! संगीतकलेची तितकीच 'शेवा'... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!!

[देवाला दिव्य दृष्टि आहे. मी जेव्हांजेव्हां अशा stunts च्या इच्छा दाबल्या आहेत, लिफ़्ट च्या दारापलिकडे बॉस किंवा वरिष्ठ सापडले आहेत. :). अनिल अंबानीचे कर्मचारी ह्या आनंदाला मुकले आहेत. त्यांच्या लिफ़्ट्सची फरशी सोडली तर अख्खी लिफ़्ट काचेची आहे. लिफ़्टचा तळही काचेचा असता तर लोकांचा तळ फाटला असता.]
---

Friday, February 08, 2008

"तुम जूझो!"

"सर, मुझे पहचाना?" कहता चौखट पर वह आया,
कपड़े उसके मटमैले थे मुखड़ा था कुम्हलाया

पलभर बैठा, मुसकाया और नज़रें उसने उठाईं,
बोला, "घर में अतिथि बनकर गंगामैय्या आयी!

नैहर लौटी दुल्हन जैसी आंगन में वह खेली,
साथ में ले गयी बहुत कुछ, बस, बीवी को वह भूली.

चौखट धंस गयी, बुझ गया चूल्हा, पीछे कुछ भी न छोड़ा,
जाते जाते मगर रखा पलकों में पानी थोड़ा.

हम दोनो अब उठा रहे हैं जो भी गया था रौंदा,
कीचड़ में अब बसा रहे हैं फिर एक नया घरौंदा.
"

ज़ेब टटोली मैंने तो वह खड़ा हुआ और बोला,
"पैसे न दें सर, आया हूं मैं खुद को पा के अकेला

कमर नहीं टूटी भले ही हुआ हो सब बरबाद,
कहें मुझे "तुम जूझो!!", मुझे बस दें यह आशीर्वाद!!"


-- कुसुमाग्रज की मूल मराठी कविता का भाषांतर

Friday, October 12, 2007

ह्रदयाची गाणी...

सरणार कधी रण...

काय छळतं हे गाणं!! मे महिन्यात पन्हाळा पाहिला होता. चक्क धुकं, किर्र अंधार पडू लागलेला... दूरदूरपर्यंत एक मरगळ ज्वालामुखीच्या राखेसारखी पसरली होती.

'शिवकल्याणराजा'ची गाणी कंपोज़ आणि अरेंज करायला बाळासाहेब आणि मोहिलेसाहेब प्रत्यक्ष इथे गेले असतील का? की पन्हाळ्याचं ते एक दर्शन आयुष्यभर छळत राहिलेलं पुरतं?

दिल्लीतल्या घराच्या खोलीत हे गाणं ऐकलं, परत पन्हाळ्यावर पोचलो. शुद्धीत आलो तेव्हा व्हायोलिन-तानपुरा आणि लॅपटॉप ह्या तीन दगडांच्या चुलीवर हे गाणं शिजवून परत परत चाखलं... अजून भूक ओसरली नाहीय.

बाळासाहेब, हॅट्स ऑफ़ टू यू!!

Thursday, October 11, 2007

निष्कांचन

लोहाचा तुकडा धरुनी
मी वणवणलो फत्तरांत,
पाषाणांचा डोंगर केला
परिसासाठी आक्रांत

बसल्या पायाला ठेचा
दगडांमाजी मज खूप
होते चिवट दगडांसम
परि सोन्याचे अप्रूप

परिसाच्या शोधापायी
खंडीनी वेचले खडे
अन वेचले आयुष्य
पण परिसस्पर्श ना घडे

मज माझे म्हणती वेडा
दगडांमध्ये मी दंग
परीसामागे पळतो मी
निर्वस्त्र आणि भणंग

मग मरता मरता हाती
तो लोहगोल पाहिला
पण हाती बघता सोने,
अश्रूंचा पाट वाहिला.

हळहळलो दुर्भाग्याला
दुखले दगडांचे घाव,
परिसास न पाहू शकली
माझी सोन्याची हाव.

निष्कांचन सडते आहे
माझे थडगे घाणीत,
आणि तो परीस बिचारा
हरवला त्या खाणीत.

Tuesday, August 28, 2007

ताज़ा जानकारी...

१) परवां मला तीन वर्षांनी हस्तलिखित टपाल मिळालं. दर्शनाचं... दर्शना माझी बीएस्सी पासूनची वर्गमैत्रीण. ओडिसी अप्रतीम करते, अभ्यासात खणखणीत आहे. रेकॉर्ड बुक्स पूर्ण करणं असो, ग्रूप की जान च्या सगळ्या भूमिका पार पाडणं असो... दर्शना अगदी पुढे!! तिची राखी आली होती.

आम्ही सगळे मित्र पूर्वी एकमेकांना हातांनी लिहिलेली पत्रं पाठवायचो... ईमेल जुनी कल्पना झाली तरीही... मला आठवतं, मी एक लिफ़ाफ़ा भरून माझ्या पाऊण डझन मित्रांना पत्रं पाठवायचो, आणि एका लिफाफ्यातच सगळ्यांची उत्तरं यायची. मुंबईच्या चाळीचे दोन मजले धावत उतरून-चढून ती पत्रं वरती आणून धापा टाकून व्हायच्या आधीच पाकीट फोडून वाचायला सुरुवात करायचो. इतका नॉस्टॅल्जिक होतोय ना आत्ता! आमच्या निष्पाप, भोळ्या (आणि थोड्या बावळट आणि येडचॅप दिवसांचीही) आठवण ताजी होते.

२) काल नारळीपौर्णिमा. आमच्या दिल्ली मराठी गॅंग ने नारळीभाताचा बेत रचला होता. अप्रतीम जमून आला! मुख्य म्हणजे पोटभर भात बनूनही नारळाचा कीस शिल्लक होता. मग निघतांना सगळ्यांना Goodbye कीस दिला! :)

३) हिंदी डेस्कवरच्या सहकारी मित्रांचं मराठी प्रशिक्षण अगदी मजेत चाललंय, नवं शिकलेलं वाक्य, "माझम काही चुकलम असेल तर माला कडवने!" मुंबई ब्यूरोतनं कॉल केलेल्या एका-दोघांना सुखद धक्का. गरिमाला शिकवलेलं वाक्य... "तुमचम आपलम काहीतरीच!!" :)

आता गणेशोत्सवाकडे डोळे लागले आहेत. घरात दोन पुणेरी पगड्याही आहेत!! टुकटुक!!

४) "येणार... येणार... म्हणून चर्चेत असलेला ऑरकुटचा नवा लुक अखेरीस दिसू लागला. ह्याचा एकमेव फायदा हा, की निदान दोनतीन दिवस तरी "हे ऑरकुट" असं लक्षात येऊ न देता ऑफ़िसातूनही पाहता येईल!!

Friday, August 03, 2007

निराश्रित...

त्या सांजसावल्या गूढ, पारावर भेटून गेल्या,
शून्यात कुठवरी दूर त्या मजला रेटून गेल्या...

मी त्या शून्यातून चालत शून्याच्या काठी आलो,
शून्याच्या लाटेवरती, शून्यात चिंब मी झालो.

दूर पसरली होती, तेथे तिमिराची कुरणे,
तिमिर-लतांतून आली, मजवर तिमिराची किरणे.

मग तिमिराच्या ओटीत, नक्षत्र असे सांडले,
काळोख्या त्या कुरणाशी, ते चमचमचम भांडले.

त्या कल्लोळाला भिऊनी स्मरल्या परतीच्या वाटा,
पण वाटेवरती सयेचा मज खचकन रुतला काटा.

मी परतलो पारावर, पण पार पेटला होता,
अन झगझगत्या तिमिरावर त्या - धूर दाटला होता.

दिपलो त्या लोळाने, अन पडलो मग मी उघडा,
मजला लपवाया माझा, तेजाशी वेडा झगडा.

शून्याच्या काठी मजला आहे तिमिराचे छत्र,
परि डोळ्यांमध्ये शिरूनी, मजला छळते नक्षत्र.

-योगेश

Saturday, July 28, 2007

Hopelessly hopeful... :)

Your password will expire in 15 days. Do you want to change it now?

च्यायला!! थट्टा आहे की काय? पंधरा दिवसांपूर्वीच तर बदलला होता!! आतापासून कशाला डोक्याला हा भुंगा?

छे... करू देत त्यांना प्रॉम्प्ट... आपण नाही बदलायचा! अरे!! ऑफ़िसचं टपाल वाचायचं की नवनवे पासवर्ड्स शोधत बसायचे?

हेहे... सगळ्यांच्याच कपाळावर आठ्या आहेत... नवीन पासवर्ड्स ठरवतांना मेंदू मुरगळतोच सगळ्यांचा... फोन नंबर, गावाचं नाव, आवडती शिवी, तमाम आजी-माजी-प्रियकर-प्रेयसींची नावं, आवडत्या रागांचे आरोह-अवरोह, कुत्र्यांची नावं, आवडत्या बुलेटिन्सची नावं, शिवाय ह्या सगळ्यांच्या स्पेलिंग्स चे उलट-सुलट कॉंम्बिनेशन- हुश्श... सगळ्यांचं सगळं वापरून झालंय... आता सगळेच कुठेतरी वैतागलेलेत...

पण लेकाहो, (सॉरी. लोकहो) पासवर्ड संपायची तारीख म्हणजे महिनाअखेर... "तीन दिवसांत पासवर्ड गचकणार" च्या ऐवजी "तीन दिवसात तुमचा पगार होणार!! उगी उगी!!" असं का नाही वाचून पाहत कुणी? :)

कदाचित हा माझाच puppy dog दृष्टिकोन. संसारी एडिटर्सना महिन्याचे चार आठवडे अनुक्रमे गोल्डन वीक, सिल्वर वीक, ब्रॉन्ज़ वीक आणि 'रद्दी वीक'! :D

Wednesday, July 11, 2007

तर्पण...

आणखी चार मिनिटांत खार लोकल ला झालेल्या पहिल्या स्फोटाला एक वर्ष होईल...
जीव तडफडतोय... मुंबई ही सुद्धा एक गुरू होती... गुरूपौर्णिमेलाच हे व्हावं...
सुन्न मनाने मुंबईत मन फिरतंय...

देवा... माझ्या मुंबईला छान ठेव रे... नको छळूस तिला...

:(

Sunday, June 17, 2007

एका पित्याचे 'चिरंजीव' पत्र

आज पितृदिन... अब्राहम लिंकन ने हेडमास्तरांस लिहिलेल्या पत्राचा हा अनुवाद रात्री नऊच्या Fathers' Day special बुलेटिन साठी कवितारूपात लिहिला होता. १५ मिनिटांच्या डेडलाईनमुळे हात थरथरत होता, पण जमून गेलं.... आणि संपवतांना इतकं भरून आलं! :)

(हा मूळ पत्राचा अनुवाद नाही. वसंत बापटांच्या रूपांतरावरनं लिहिला आहे. :D
वरील इंग्रजी दुवा विद्या भुतकर ह्यांच्या सौजन्याने
)
__________________________________________________

मेरा लाल जानेगा कि सभी लोग इंसाफ़परस्त नहीं होते,
मगर उसे यह सिखाएं कि हर बदमाश के साथ, एक साधू भी इस दुनिया में आता है.
खुदगर्ज़ राजनेता भी होते हैं, वैसे ही जीवन लुटाने वाले नेता भी.
मैं जानता हूँ कि सब कुछ जल्दी में नहीं सीखा जाता,
पर उसे यह मालूम हो, के पसीने से सींचा एक सिक्का, लूट के खज़ाने से भी कीमती है...

...सिखाइये उसे- हार कैसे हज़म करें,
विजय के आनंद में हम, कैसे संयम धरें,
आप से हो सके, तो जलन से उसे बचाएं ,
सिखाइये मेरे बेटे को- खुशी कैसे मनाएं...
गुंडो से डरे नहीं, आसान है- उन से हारें नहीं...

खोलिए उस के लिए, किताबों के भंडार,
लेकिन उस को दिखाएं भी, कुदरत के शृंगार...
इन्हें जानने के लिए, दें मन को इत्मिनान,
दिखाएं भवरों की और परिंदों की उड़ान,
फूलों से महकी पहाड़ों की ढलान...

स्कूल में सिखाएं सुनना- अपने जमीर की पुकार,
झूठी तारीफ़ से बेहतर है, सीधी आयी हार...

गलत ठहरायी जाए तो भी- अपनी कल्पना अपने विचार,
इनका लें आधार, भले ही दुनिया मिलकर उसे कहे बेकार,
'जैसे को तैसे' के सीखे वह व्यवहार...

सिखाएं उसे...
सत्ता के चमचों की भीड से कैसे बचा जाए...
अपना अलग अस्तित्व, कैसे रचा जाए..
सुने सब जन की, पर करे वह मन की...

सिखाएं उसे, आंसू बहाने में कोई लाज नहीं,
बताएं उसे, साच पर कोई आंच नहीं...

सिखाएं उसे, मज़ाक का मज़ाक उडाना...

ताक़त और अक्ल बेच कर चाहे जो भी वह कमाए,
लेकिन दिल और रूह अपनी वह कभी न गंवाए,

बेटे को मेरे प्यार और दुलार दें,
पर इस प्यार से उसे बिगाड न दें..

बेसब्री का जोश सिखाएं मेरी औलाद को,
सब्र की तपिश से चमकाएं इस फ़ौलाद को...

सिखाएं उसे अपनी नीयत पर विश्वास करना...
फिर खुद सीखेगा वह, इंसानियत पर विश्वास करना...

माफ़ करिए गुरुजी, बहुत बोल गया... कितना कुछ मांग गया...
कीजिए आप से जितना बनता है... मेरे बेटे के लिये... बड़ा ही प्यारा है वह...

--योगेश दामलिंकन

Monday, June 11, 2007

Sunday blues...

'रात्र-रात्र घराबाहेर' ची कल्पना गमतीशीर जरी वाटत असली, तरीही शेवटेशेवटी तेही अंगावर येऊ लागतं!
येत्या आठवड्यापासून दुपारच्या शिफ़्ट च्या कल्पनेची भुरळ पडते, आणि योगेश कामाला लागतो.

सहाचं बुलेटिन रात्री अडीच-तीन ला निश्चित झालं असलं, तरी रनडाऊन एडिटर (हा क्रम ठरवणारा) पहाटे ५:४० ला फोन मारून नसलेली बातमी "बन गई क्या" विचारून आश्चर्याची (धक्का नाही) 'ढुशी' देतो. कधीकधी अशा दोन-तीन बातम्या बोकांडी येऊन बसतात. ४० सेकंदांचाच तुकडा कापायचा असला, तरी दृश्यांचं सातत्य, कमीजास्त होणारा व्हॉल्यूम, मध्येच बंड करणारा कंप्यूटर, नसलेली दृश्यं संग्रहांमधून उचलणं, त्यांत हयात नसलेली माणसं on screen जाऊन सकाळीसकाळी प्रेक्षकांना धक्का देणार नाहीत ह्याची काळजी घेणं असले सोपस्कार पार पाडून बातमी तपासायला द्यावी लागते.

४० सेकंदांच्या बातमीत व्हीडिओ एडिटर चारशे चुका शोधणार, आणि त्या बातमीची तीन आवर्तनं उसवून पुन्हा बेतणार... म्हणजे ४० सेकंद पडद्यावर न्यायला किमान १० मिनिटांची तपस्या आणि मौल्यवान रक्त आटवणं असल्या पायर्‍या असतात.

त्या दिवशी अशाच 'ऐनवेळच्या' दोन बातम्या हैराण करतात. आता किंचाळी फोडून प्राण सोडायचाच पर्याय शिल्लक असतो. तितक्यात, सहाच्या शिफ़्टची एक देवदूत येऊन म्हणते, "योगेश, 'संसद में हंगामा' तुम कर लो, 'मंत्री की शादी में अश्लील नाच' मैं कर लूंगी!". एरव्ही हसून मुरकुंडी वळली असती, पण आता एक एक सेकंद सोकावलेला असतो. बैल खालमानेने जू ओढतो.

दोन दिवसांच्या सुट्टीतला पहिला दिवस शरीराच्या झोपेची घडी परत बसवण्यात जातो, तर दुसरा दिवस साप्ताहिक आवराआवरीचं सोंग वठवण्यात जातो. आता नवी शिफ़्ट,

दुपारच्या शिफ़्टमध्ये रात्रीच्या शिफ़्टइतकी धावपळ नसते. एकतर सकाळी बनलेल्या 'वरणात' पाणी घातल्या जातं, किंवा मग ताज्या बातम्या एडिट करायला पुरेसे सीनिअर एडिटर्स असतात. अशावेळी जास्त कामं म्हणजे नव्या बातम्यांचं स्क्रिप्ट लिहिणं, आणि टीवीच्या पडद्यावर जी अक्षरं जातात त्यावर लक्ष ठेवणं. खरी धांदल सुरू होते, ती प्राईमटाईम मध्ये. काम वेगळं काही नसतं, ऑफिसातली गर्दी आणि गोंधळ हे समप्रमाणात वाढलेले असतात. एकतर दोन माणसं एकच काम 'आपण एकटे' समजून करत असतात, किंवा मग 'करेल कुणितरी' म्हणून एखादं काम बेवारसही पडून राहतं!


खूप दिवसांनी रविवारचा दिवस जागेपणात जातो... राजकारण्यांपासून जनसामान्यांपर्यंत सगळेच सुट्टीच्या मूडमध्ये असतात. इतक्या उन्हाळ्यात बाहेर जाऊन उचापती कोण करणार? अशावळी 'बातमी'पदाला पोचणार्‍या घडामोडी ह्या सहसा मंत्र्यांच्या वातानुकूलित ऑफिसांतून-थिएटर्स किंवा तत्सम 'उच्चभ्रूऽऽऽ' परिसरांतून येतात. (नाही असं नाही. अपघात, निधनं आणि पूर्वनियोजित निदर्शनं ही उन्हाळा असला तरी 'पार पडतात'.)

त्यामुळे वीक एंड्स ना कामाची धावपळ नसते, डेस्कच्या तमाम यंत्रणेवर एकूणच गर्भार गायीचा उत्साह झळकत असतो.

पहा.... इतकं लिहूनही मी अजून एकही ठळक मुद्दा मांडला नाही... यावरून एकूणच मनस्थितीची कल्पना यावी! :)

Tuesday, May 22, 2007

रात्रीस खेळ चाले...

नाईट शिफ़्ट बद्दल माझे काही पूर्वग्रह होते- जसे, आम्ही नवशिके- प्राईमटाईमच्या धावपळीत आमची लुडबुड नको म्हणून आम्हाला नाईट शिफ़्ट वगैरे. सलग दोन आठवडे रात्रपाळी दिल्याने थोडा हिरमुसलो होतो. तेव्हां एकीने ह्या शंकांचं निरसन केलं. "ऐसा क्यों सोचते हो? सवेरे दस बजे तक के सारे बुलेटिन्स और रनडाऊन्स तुम्हारे दम पर चलते हैं!", आणि "अरे वा! आपण कामाचा डॊंगर पेलू शकतो म्हणून रात्रपाळी दिलीय!" ह्या जाणिवेने मनमोराचा कस्सा पिस्सारा फुल्लला!

पण नाईट शिफ़्ट एका अर्थी मजेची वाटते. रोजची प्राईमटाईम ची धावपळ नसते- शेवटच्या लोकलला चर्चगेटवर जितपत असावं- तितपत चैतन्य असतं. कमी गोंगाट आणि तणावमुक्त चेहरे पाहिले की कामाला एका प्रकारची प्रसन्नता येते. सकाळचं बुलेटिन आणि पुढच्या तीन तासांच्या प्रक्षेपणाच्या बातम्या तयार करायला एक रात्र मस्त पुरते.


'प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतो' चा दाखला देत माझ्या पहिल्यावहिल्या रात्रपाळीचं रोस्टर आलं. ''बोहनी'च्या बुलेटिनचा एक लगाम आपल्या हाती' ह्या विचाराने, ह्या विचारानेच मशीनमधून पडणार्‍या पॉपकॉर्नसारखं हसू नुसतं सांडत होतं.

"रविवार रात पहुँचना" लक्षात ठेवून शनिवारी दिवसभर झोपलो... (अगदी चारी पाय हवेत करून झोपणार्‍या मोत्यासारखा). परीक्षेशिवाय रात्रभर जागायचं म्हणून आरशात स्वत:लाच "योगेशजी, यह बताएं, आप को कैसा लग रहा है?" विचारून घेतलं!

"आज आमची पहिली रात्र!" असं मोठ्या फुशारकीने पुष्कराजला सांगून घरून निघालो. ऑफिसला पोचून पाहतो, तर माझ्या शिफ़्टचा हजर असलेला मी एकमेव जीव! चुकून चवथ्या इयत्तेत शिरलेलं बालवाडीतलं पोर आणि चवथीतले 'सीनिअर्स' एकमेकांना ज्या नजरांनी पाहतात, तसे आम्ही एकमेकांना पाहत होतो.
मग कळलं, की आमचा साधासुधा नाही, तर अगदी हिरवागार पोपट झाला होता. 'रविवार ची नाईट' शिफ़्ट म्हणजे उजाडती मध्यरात्र नव्हे, तर मावळती मध्यरात्र! २४ तास आधी पोचलेला प्राणी पाहून त्या प्राण्यासकट सर्वांचीच करमणूक झाली! हा झाला सलामीचा दिवस.. इथून पुढे...

रात्रभर बातम्यांवर हात फिरतो, लक्ष अंधारलेल्या खिडकीतून झुंजूमुंजू होतांना पाच वाजल्याचे कळतात. ५:५९:४९ च्या आधी कामं संपवायला स्वत:ला झोकून देणं होतं... ५:५९:५० ला काउंटडाऊन सुरू होतो... ६ वाजता Channel ID ची धुन वाजते. सस्मित अँकर, "नमस्ते, मैं हूँ..." ने सुरुवात करते. घड्याळ्यापुढे पळणारं काळीज थोडं निवांत होतं. सगळं नीट असल्याची खात्री होऊन वेळ मिळाल्यास चहा घेऊन 'सकाळ' च्या साईटवर आपला माउस फिरू लागतो. पण इतका वेळ असतोच कुणाकडे? तडक सात च्या बातमीपत्राच्या हेडलाईन्स कापणं होतं. एव्हाना देशाला जाग येऊ लागलेली असते. बातम्या घडू लागतात. वार्ताहर त्या कव्हर करून लगेच दृश्यं आमच्या कडे पाठवतात. त्या प्रतिस्पर्ध्याआधी आपण झळकवाव्यात म्हणून सगळी इंद्रियं एकवटतात. पुढच्या शिफ़्टला येणारे मावळे आल्याशिवाय आपल्याला खिंड सोडता येत नाही. शेवटी सुट्टी होते. खाली कँटीनमध्ये नाश्ता होतो.

सुटकेचे काही Symptoms असतात. शाळा सुटायच्या अर्धा तास आधी शाळकरी पोर मास्तरणीचा डोळा चुकवतं... हळूहळू एक-एक पुस्तक दप्तरात जमा करतं... त्याच्या उलट, नाश्त्याच्या टेबलावर मला अचानक अनावर झोपेचा एक झटका येतो आणि लगेच प्रसन्नता तोंडावर झळकते. काकडत्या AC ऑफ़िसातून घरी पांघरुणात शिरतांना पिठाच्या ऊबदार डब्यावर चढलेल्या मांजराची तृप्ती असते. आईचा फोन येतो तेव्हां मी बोलायच्या स्थितीत नसतो आणि माझी जेव्हां 'दुपार' असते, तेव्हा सभ्य जगाला जांभया येऊ लागलेल्या असतात. माझ्या सकाळी (म्हणजे दु. ४-५) मित्र ऑनलाईन दिसतात... मग काय...

"गुड मॉर्निंग!!"
"गुड मॉर्निंग?! लेका चहा मारतोय आम्ही इथे! येतोयस का?"
"आय आय आय गंऽऽऽऽ!!!"
"जांभई आवर! मीही उशिराच जेवलोय!"
"काही विचारू नकोस. कधी दिवसपाळी, कधी रात्रपाळी... आमची पाळी अगदीच अनियमित आहे!"
"हॅ हॅ हॅ! मग? आता पुढली पाळी किती वाजताची?"
"अरे! लॉन्ग वीकएंड!! आता तीन दिवस पाळी नाही!" ,
"अरे!! उलटाच हिशोब आहे तुमचा!"


अशी ही पिशाच्चवेळ... जागलाय कधी? :)

Thursday, May 17, 2007

अंड्याबाहेर... घरट्याबाहेर... :)

७-८ एप्रिल् २००७...

भोपाळच्या पुढे ट्रेन गेली, की प्रत्येक शहरात एक दृश्य हमखास दिसतं... रुळालगत जितक्या भिंती आहेत, सगळ्यांवर गुप्तरोग आणि तत्सम दुखण्यांची जाहिरात करणारे हक़ीम-वैद्यांचे तपशील असतात. "उत्तरेत सगळ्यांना 'हेच' का?" असा एक अमानवी विचार थोड्या गुदगुल्या करून जातो.

त्या दृश्याचा कंटाळा येतो, आणि ट्रेनचं दार सोडून आम्ही आत येतो. इथे आपल्या सीटवर वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं असतं! (माझ्या केसमध्ये अक्षरश: वाढून ठेवलेलं होतं... नुसतंच वरण... नुसत्याच सीटवर!! सहप्रवाशाच्या लेकीने- वय वर्षं इनमिन तीन!) .

मातोश्री कपाळावर आठ्या घालत कोच अटेंडंटकडून नॅपकिन मागवतात, माझीच रद्दी मला न विचारता घेऊन बेलाशक पुसतात. पु.ल. देशपांडे त्या हळद-तेलाच्या हल्ल्यातून बालंबाल बचावलेले असतात. समोर बसलेल्या सासूबाई तोंडावरची माशीही न हलवता आपल्या सोण्या (हा मराठी 'सोन्या' नाही!) 'गुनगुन'च्या बाळलीला न्याहाळत असतात. त्या माउलीचे 'अजी सुनते हो' वरच्या बर्थवर वाळवणाच्या माशांसारखे पसरलेले असतात. यथावकाश बर्थ स्वच्छ होतो, पण तोही हिसकावल्या जातो. आजींना खालचा बर्थ हवा असतो म्हणून. आपण न मिळालेल्या Thank you ला मनातच You're welcome करतो. ते सगळं कुटुंब निजल्याशी कारण!

पण दिल्लीला नेणारा ट्रेनप्रवास आणि त्यात भेटणारी माणसं ह्यांनी दिल्लीतल्या माणसांबद्दल सरसकट मत बनवायचं नाही असा माझा बेत आहे. आशावादाचं गारेगार काजळ डोळ्यात घातलं की असल्या धूळ-चिलटांनी डोळ्यांना काहीच त्रास होत नाही.

८ एप्रिल ते आज...
'नव्या शहरात बस्तान' म्हणावं, त्यामानाने मी सामान विशेष आणलं नव्हतं. फक्त दोन मोठ्या बॅगा भरून कपडे, कागदपत्रं, दोन सूटकेसेसमध्ये मावली नसती असली पिल्लावळ ४ छोट्या बॅगांमधून.
(गोम अशी आहे, ह्या सहा नगांबरोबर माझी प्राणप्रिय सखी व्हायोलिन पण होती, आणि हो... एका सूटकेसमध्ये माझ्या व्यायामाला लागणारी २५ पौंडांची लोखंडी वजनं! ह्यांना आतापर्यंतच्या दीड महिन्यात फक्त सातदा वापरायचा उत्साह दिसून आला. रोज ती वजनं हलवून हलवून मोलकरीण मात्र 'दंडाधिकारी' होतेय- 'तू बहराच्या बाहूंची' इ.इ. असो.)

असे ७ डाग, अधिक ८वा मी एका रिक्षात कोंबून पुष्कराज (माझा खोलीबंधू) आमच्या नव्या घरी पोचला. आज अजून एक सरप्राईझ आमची वाट पाहत होतं. आज आशीषचा (आमच्या खोलीबंधूचा) वाढदिवस होता. सगळे मित्र घरी जमले होते. कोल्हापूरची सोनल, नांदेडचा गजानन, देऊळगावचा उमेश, पुण्यातले जेमीमा-पुष्कराज-ह्रषिकेश-निखिल आणि औरंगाबादचे आशीष अन् मी- असा महाराष्ट्र जमला होता. अनिश्चित काळासाठी महाराष्ट्र सोडलेल्या माणसालाच हे दृश्य काय आहे ते कळेल!!

गेल्या महिन्याभरात आमच्या तीनचार भेटींत आमच्यात इतके पाककुशल हात आहेत हे कळू लागलं... गेल्या महिन्याभरात अस्सल मराठी जेवणाच्या आमच्या तीन पंगती झाल्यायत्! हे स्वर्गसुख भोगायला मी आठवडाभर अमराठी भोजनाचा टॅक्स भरला होता, आणि त्याची मस्त परतफेड करून घेतली!! सोन्याहून पिवळा असा आमरसही 'देशावर' जाऊन आलेल्यांच्या कृपेने दिल्लीत झाला!

आता काडीकाडीने घरट्याला आकार येतोय. आमचं किचन अगदी आलं-लसणाच्या रॅक सकट नांदतं झालंय. तसेही 'रुचिरा' च्या सौजन्याने सव्वा लाख सुनांच्या सासूचे दोन जावई इथे नांदतायत! (आशीष आणि मी). इथे चक्क लोकसत्ता घरी येतो! :)

पुण्यानंतर इथलं आयुष्य इतकं वेगळं आणि छान वाटतंय!! केलेल्या कामाबद्दल चांगले-वाईट् प्रांजळ शब्द (आणि पगार :D), रोज न्यूझरूम मध्ये नवं काहीतरी शिकायला मिळणं, देवानंतर आपणच आपले पाठीराखे असणं, दिल्लीच्या आयुष्याची चव... असल्या अनेक अनुभवांनी माझं ताट आता मला अधाशीपणाने भरून घ्यायचंय!!

अर्ध्या पगाराचा चेक आला पण! ज्यांनी मला इतकं दिलंय त्या सगळयांना पहिल्या पगारातनं काही द्यायचं म्हटलं, तर ती 'ज्योतीने तेजाची आरती' ठरेल!!! :)

सध्या तरी तो चेक गणपतीबाप्पाच्या पायाशी आहे... ' पहिल्या पगारात यंव करीन आणि त्यंव करीन' म्हणणा~या मी तो अजून शिवला नाहीए... त्याला फ़्रेम करून ठेवण्यासारखे तद्दन फ़िल्मी विचार आत्तपर्यंत डोक्यात येऊन गेलेत!

इतक्यात कॉलेजचं प्रेमपत्र आलं, बॅकलॉग परीक्षांच्या तारखा सांगणारं. नाक झिजून मिळवलेली रजा ट्रेनप्रवासात खर्चणं शहाणपणाचं नाही. अक्षरश: 'गेलो उडत' आणि चेकच्या स्वप्नातल्या कळ्या 'उमलू नकाच केव्हां ' झाल्या!!

व्यवहाराच्या जगात स्वागत असो योगेशराव! :)

Tuesday, May 15, 2007

टाटा?!

छोट्या छोट्या झुळुकांनी हेलकावणारं पुणेरी आयुष्य अचानक एका झंझावाताला सामोरं गेलं आणि आमची उचलबांगडी दिल्लीला झाली... ( 'झाली' काय म्हणतोय? मीच ती करून घेतली! मुंबईच्या पोस्टिंगचा पर्याय असतांनाही एका सणकेत दिल्ली निवडली. मुंबईच्या कार्यसंस्कृतीची ओळख झाल्याने हा अनाघ्रात टापू साद घालत होता. अगदीच अनोळखी ठिकाणी जाऊन पुनश्च श्रीगणेशा करायची खुमखुमी स्वस्थ बसू देईना...)

"तीन वर्षं घराबाहेर काढली- आता अजून किती, देव जाणे..." आईचं फोनवरून भावुक होणं मध्येच मनाला बांध घालून गेलं. घरी घालवायला मिळालेला एक आठवडा चुटकीसरशी संपला. स्टेशनवर ती मला सोडायला आली तेव्हा गाडी सुटेपर्यंत ती थांबली नाही, (मी थांबू दिलं की नाही हेच आठवत नाही... but it just happened). मलाही कोण जाणे का, आज ती फार वेळ डोळ्यांपुढे नको होती. मला शाळेचा पहिला दिवस तर आठवत नाही, पण ती भावना सुद्धा अशीच असावी. असंख्य email forwards मधील 'लेकरू परदेशी निघालं'च्या वर्णनात असलेली भावुकता आज कुठेच कुणी पाघळू देत नव्हतं.

अन्नपदार्थ नेण्यात काहीच अर्थ नाही. आईनेही एका आठवड्यात मला सोडून किचनमध्ये डब्ब्यात बांधायला 'आठवणी' रांधण्यात तो वेळ घालवावा असं मला वाटलं नाही. पण तिने मला शिर्डी च्या वारीची शाल आवर्जून दिली. नाही म्हणता म्हणता मीच लिंबाच्या काही मुरलेल्या फोडी उचलल्या.

सुदैवाने अजून कुणीच 'पोचवायला' आलं नाही. गाडी प्लॅटफ़ॉर्मवरून हलली तेव्हां औरंगाबाद शहराला लागून असलेल्या डोंगरांनी मला शेवटचा बायबाय केला. आईसमोर हळवा झालो नाही, पण ट्रेन वेगात येत असताना मात्र आत काहीतरी इतकं तुटत होतं की शेवटी मला बाथरूममध्ये लपावं लागलं... आरशात स्वत:कडेच टक लावून पाहत होतो. गहिवर आला आणि कोरडा संपवला!

आता ओलावायचंही कुणासाठी?
थोडीशी कळ अजून, मग सगळे परत एकत्र येतील ना?
शिजेपर्यंत दम धरायचाच, पण निवेपर्यंतही!

खूप दिवस झालेत इथे लिहून. येईन लवकरच...
आज इथेच थांबतो...