Tuesday, May 15, 2007

टाटा?!

छोट्या छोट्या झुळुकांनी हेलकावणारं पुणेरी आयुष्य अचानक एका झंझावाताला सामोरं गेलं आणि आमची उचलबांगडी दिल्लीला झाली... ( 'झाली' काय म्हणतोय? मीच ती करून घेतली! मुंबईच्या पोस्टिंगचा पर्याय असतांनाही एका सणकेत दिल्ली निवडली. मुंबईच्या कार्यसंस्कृतीची ओळख झाल्याने हा अनाघ्रात टापू साद घालत होता. अगदीच अनोळखी ठिकाणी जाऊन पुनश्च श्रीगणेशा करायची खुमखुमी स्वस्थ बसू देईना...)

"तीन वर्षं घराबाहेर काढली- आता अजून किती, देव जाणे..." आईचं फोनवरून भावुक होणं मध्येच मनाला बांध घालून गेलं. घरी घालवायला मिळालेला एक आठवडा चुटकीसरशी संपला. स्टेशनवर ती मला सोडायला आली तेव्हा गाडी सुटेपर्यंत ती थांबली नाही, (मी थांबू दिलं की नाही हेच आठवत नाही... but it just happened). मलाही कोण जाणे का, आज ती फार वेळ डोळ्यांपुढे नको होती. मला शाळेचा पहिला दिवस तर आठवत नाही, पण ती भावना सुद्धा अशीच असावी. असंख्य email forwards मधील 'लेकरू परदेशी निघालं'च्या वर्णनात असलेली भावुकता आज कुठेच कुणी पाघळू देत नव्हतं.

अन्नपदार्थ नेण्यात काहीच अर्थ नाही. आईनेही एका आठवड्यात मला सोडून किचनमध्ये डब्ब्यात बांधायला 'आठवणी' रांधण्यात तो वेळ घालवावा असं मला वाटलं नाही. पण तिने मला शिर्डी च्या वारीची शाल आवर्जून दिली. नाही म्हणता म्हणता मीच लिंबाच्या काही मुरलेल्या फोडी उचलल्या.

सुदैवाने अजून कुणीच 'पोचवायला' आलं नाही. गाडी प्लॅटफ़ॉर्मवरून हलली तेव्हां औरंगाबाद शहराला लागून असलेल्या डोंगरांनी मला शेवटचा बायबाय केला. आईसमोर हळवा झालो नाही, पण ट्रेन वेगात येत असताना मात्र आत काहीतरी इतकं तुटत होतं की शेवटी मला बाथरूममध्ये लपावं लागलं... आरशात स्वत:कडेच टक लावून पाहत होतो. गहिवर आला आणि कोरडा संपवला!

आता ओलावायचंही कुणासाठी?
थोडीशी कळ अजून, मग सगळे परत एकत्र येतील ना?
शिजेपर्यंत दम धरायचाच, पण निवेपर्यंतही!

खूप दिवस झालेत इथे लिहून. येईन लवकरच...
आज इथेच थांबतो...

7 comments:

Yogesh said...

शिजेपर्यंत दम धरायचाच, पण निवेपर्यंतही

सही...

लवकर ये परत

Anonymous said...

छान लिहिलं आहे:-)

coolshripad said...

योगेश सुंदर लिहिलंय. अरे घर सोडताना प्रत्येकाच्या मनोभावना अशा होतात, पण म्हणतात ना, गाव सोडल्याशिवाय प्रगती होत नाही, तेच खरं वाटतं. नवं गाव, नवी माणसं, नवा समाज आणि नवं काम या साऱ्यांत आपण गढून जातो. दिवस सरत जातात आणि आपण त्या गावाचे होऊन जातो. मी औरंगाबादला 1994ला शिकण्यासाठी आलो. त्यावेळी फोन म्हणजे चैन. घरी, बीडला जाण्याची तिकीट 35-40 रुपये असावं. एक महिन्यापासून मी घरी गेलेलो नव्हतो. महिना संपला तसे पैसेही संपलेले होते. मी मित्राकडून 50 रुपये घेतले. ठरवलं की दुपारीच निघावं. जालना रोडवरून चालत निघालो होतो रुमवर जाण्यासाठी. तेवढ्यात एक एसटीडी दिसलं. मी तिथं गेलो. दुकानाच्या केबीनमधून घरी फोन केला. तिकडून आईनं "कसं चाललंय,' असं विचारलं आणि मी रडायलाच लागलो. का? कुणास ठाऊक? पण त्या दिवशी तसं घडलं खरं. नंतर गाव सोडून राहाणं अंगवळणी पडलं. आता मी पुरता औरंगाबादी झालोय. या गावाशिवाय मला बाहेरही करमत नाही बघ.

Kamini Phadnis Kembhavi said...

ey ye kyaa hai bhai???
mulaMnee as senti vhyacha asata kaa kadhi?

jokes apart,
ghar sodun yevadhyaa laaMba jaaN samaju shakate mee

chal aataa deeli baddal lihaaylaa laag pataapat :)

Meghana Bhuskute said...

...नाही म्हणता म्हणता मीच लिंबाच्या काही मुरलेल्या फोडी उचलल्या.

शिजेपर्यंत दम धरायचाच, पण निवेपर्यंतही..

... speechless.

Anonymous said...

Khidakichaa photo aapalach "Kartutva" kaa?


S U N D A R.........

S

Yogesh Damle said...

Naahi... gaadit baslyawar asli kalatmak drushti kuthun yeNar taslya manasthitit? :)

He chitr irfca.org namak eka sanket_sthaLavarun uchalalay.

Sasneh,
Yogesh