Thursday, May 17, 2007

अंड्याबाहेर... घरट्याबाहेर... :)

७-८ एप्रिल् २००७...

भोपाळच्या पुढे ट्रेन गेली, की प्रत्येक शहरात एक दृश्य हमखास दिसतं... रुळालगत जितक्या भिंती आहेत, सगळ्यांवर गुप्तरोग आणि तत्सम दुखण्यांची जाहिरात करणारे हक़ीम-वैद्यांचे तपशील असतात. "उत्तरेत सगळ्यांना 'हेच' का?" असा एक अमानवी विचार थोड्या गुदगुल्या करून जातो.

त्या दृश्याचा कंटाळा येतो, आणि ट्रेनचं दार सोडून आम्ही आत येतो. इथे आपल्या सीटवर वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं असतं! (माझ्या केसमध्ये अक्षरश: वाढून ठेवलेलं होतं... नुसतंच वरण... नुसत्याच सीटवर!! सहप्रवाशाच्या लेकीने- वय वर्षं इनमिन तीन!) .

मातोश्री कपाळावर आठ्या घालत कोच अटेंडंटकडून नॅपकिन मागवतात, माझीच रद्दी मला न विचारता घेऊन बेलाशक पुसतात. पु.ल. देशपांडे त्या हळद-तेलाच्या हल्ल्यातून बालंबाल बचावलेले असतात. समोर बसलेल्या सासूबाई तोंडावरची माशीही न हलवता आपल्या सोण्या (हा मराठी 'सोन्या' नाही!) 'गुनगुन'च्या बाळलीला न्याहाळत असतात. त्या माउलीचे 'अजी सुनते हो' वरच्या बर्थवर वाळवणाच्या माशांसारखे पसरलेले असतात. यथावकाश बर्थ स्वच्छ होतो, पण तोही हिसकावल्या जातो. आजींना खालचा बर्थ हवा असतो म्हणून. आपण न मिळालेल्या Thank you ला मनातच You're welcome करतो. ते सगळं कुटुंब निजल्याशी कारण!

पण दिल्लीला नेणारा ट्रेनप्रवास आणि त्यात भेटणारी माणसं ह्यांनी दिल्लीतल्या माणसांबद्दल सरसकट मत बनवायचं नाही असा माझा बेत आहे. आशावादाचं गारेगार काजळ डोळ्यात घातलं की असल्या धूळ-चिलटांनी डोळ्यांना काहीच त्रास होत नाही.

८ एप्रिल ते आज...
'नव्या शहरात बस्तान' म्हणावं, त्यामानाने मी सामान विशेष आणलं नव्हतं. फक्त दोन मोठ्या बॅगा भरून कपडे, कागदपत्रं, दोन सूटकेसेसमध्ये मावली नसती असली पिल्लावळ ४ छोट्या बॅगांमधून.
(गोम अशी आहे, ह्या सहा नगांबरोबर माझी प्राणप्रिय सखी व्हायोलिन पण होती, आणि हो... एका सूटकेसमध्ये माझ्या व्यायामाला लागणारी २५ पौंडांची लोखंडी वजनं! ह्यांना आतापर्यंतच्या दीड महिन्यात फक्त सातदा वापरायचा उत्साह दिसून आला. रोज ती वजनं हलवून हलवून मोलकरीण मात्र 'दंडाधिकारी' होतेय- 'तू बहराच्या बाहूंची' इ.इ. असो.)

असे ७ डाग, अधिक ८वा मी एका रिक्षात कोंबून पुष्कराज (माझा खोलीबंधू) आमच्या नव्या घरी पोचला. आज अजून एक सरप्राईझ आमची वाट पाहत होतं. आज आशीषचा (आमच्या खोलीबंधूचा) वाढदिवस होता. सगळे मित्र घरी जमले होते. कोल्हापूरची सोनल, नांदेडचा गजानन, देऊळगावचा उमेश, पुण्यातले जेमीमा-पुष्कराज-ह्रषिकेश-निखिल आणि औरंगाबादचे आशीष अन् मी- असा महाराष्ट्र जमला होता. अनिश्चित काळासाठी महाराष्ट्र सोडलेल्या माणसालाच हे दृश्य काय आहे ते कळेल!!

गेल्या महिन्याभरात आमच्या तीनचार भेटींत आमच्यात इतके पाककुशल हात आहेत हे कळू लागलं... गेल्या महिन्याभरात अस्सल मराठी जेवणाच्या आमच्या तीन पंगती झाल्यायत्! हे स्वर्गसुख भोगायला मी आठवडाभर अमराठी भोजनाचा टॅक्स भरला होता, आणि त्याची मस्त परतफेड करून घेतली!! सोन्याहून पिवळा असा आमरसही 'देशावर' जाऊन आलेल्यांच्या कृपेने दिल्लीत झाला!

आता काडीकाडीने घरट्याला आकार येतोय. आमचं किचन अगदी आलं-लसणाच्या रॅक सकट नांदतं झालंय. तसेही 'रुचिरा' च्या सौजन्याने सव्वा लाख सुनांच्या सासूचे दोन जावई इथे नांदतायत! (आशीष आणि मी). इथे चक्क लोकसत्ता घरी येतो! :)

पुण्यानंतर इथलं आयुष्य इतकं वेगळं आणि छान वाटतंय!! केलेल्या कामाबद्दल चांगले-वाईट् प्रांजळ शब्द (आणि पगार :D), रोज न्यूझरूम मध्ये नवं काहीतरी शिकायला मिळणं, देवानंतर आपणच आपले पाठीराखे असणं, दिल्लीच्या आयुष्याची चव... असल्या अनेक अनुभवांनी माझं ताट आता मला अधाशीपणाने भरून घ्यायचंय!!

अर्ध्या पगाराचा चेक आला पण! ज्यांनी मला इतकं दिलंय त्या सगळयांना पहिल्या पगारातनं काही द्यायचं म्हटलं, तर ती 'ज्योतीने तेजाची आरती' ठरेल!!! :)

सध्या तरी तो चेक गणपतीबाप्पाच्या पायाशी आहे... ' पहिल्या पगारात यंव करीन आणि त्यंव करीन' म्हणणा~या मी तो अजून शिवला नाहीए... त्याला फ़्रेम करून ठेवण्यासारखे तद्दन फ़िल्मी विचार आत्तपर्यंत डोक्यात येऊन गेलेत!

इतक्यात कॉलेजचं प्रेमपत्र आलं, बॅकलॉग परीक्षांच्या तारखा सांगणारं. नाक झिजून मिळवलेली रजा ट्रेनप्रवासात खर्चणं शहाणपणाचं नाही. अक्षरश: 'गेलो उडत' आणि चेकच्या स्वप्नातल्या कळ्या 'उमलू नकाच केव्हां ' झाल्या!!

व्यवहाराच्या जगात स्वागत असो योगेशराव! :)

10 comments:

Tulip said...

wow Yogesh! kay mast describe kartos! agadi najre samor ubha rahila tujhya nuktya suru jhalelya tithalya ayushyacha tukaDa. lihit ja n jara jast frequently.
ani he pune delhi thik ahe pan mumbai la tu miss karat asashil nakki:D.

Yogesh said...

सोन्याहून पिवळा असा आमरसही 'देशावर' जाऊन आलेल्यांच्या कृपेने दिल्लीत झाला!

"देशावर" कुठले आंबे? btw... खूपच मस्त लिहिलंय.

'दंडाधिकारी' होतेय- 'तू बहराच्या बाहूंची' इ.इ. असो.)

lol.

अनुराधा कुलकर्णी said...

हाही अनुभव आवडला. दिल्लीबद्दल तुमचे विचार इतके आशावादी आहेत हे पाहूनही बरे वाटले. अनुदिनीचे रुपडे बदललेले दिसतेय. चांगले आहे.
अवांतर: (या ब्लॉगवर साइडबारमधला कंटेंट जस्टीफाइड किंवा थोडा हातानेच शब्द पुढेमागे करुन सिमेट्रिकल असला तर अधिक शोभा येईल. सध्या ते नीटनेटक्या खोलीत टेबलावर भाराभार पसारा असल्यासारखे दिसत आहे असे वाटते.)
(उंटावरुन शेळ्या हाकणारी)अनु

Meghana Bhuskute said...

रोज ती वजनं हलवून हलवून मोलकरीण मात्र 'दंडाधिकारी' होतेय- 'तू बहराच्या बाहूंची' इ.इ.

... हि: हि: हि:.....

Abhijit Bathe said...

Yogesh - train prawaasaach warNan chhaan!

lihit rahaa.

कोहम said...

chaan....dillichya maja vachayla utsuk aahe...yeudet..

Anand Sarolkar said...

Hey...seems like you are my mirror image.

I am also from Aurangabad was in Pune for 2 years and now am in south (He jagach vegla ahe!)

You write well! keep it up!

Vidya Bhutkar said...

Punyatlya shevatachya athavnincha post vachun barech divas jhale hote. Madhe ekda check kela pan ajun updates navate. Aso. Tata aani ha donhi blog mastach aahet.
Pahilya pagarachi athavan jhali.पुण्याच्या दगडूशेटला नुसताच दाखवून आणला आणि फस्तही केला. :-)
"मोलकरीण मात्र 'दंडाधिकारी' होतेय- 'तू बहराच्या बाहूंची' इ.इ. "
मजेशीर. :) बाकी आजकाल मी ही घरून निघताना बांधून काही नेत नाही. पूर्वीसारखं ८-१० दिवसांनी 'डबा परत घेऊन ये' असंही आईला सांगता येत नाही. ह्म्म्म्म....All the best for your stay and new job.
-विद्या.

पूनम छत्रे said...

chan lihila ahe yogesh. vakyachya madhe gaaNyache shabd chapakhal ghaalaayachI style awadali. :)

Anonymous said...

"मोलकरीण मात्र 'दंडाधिकारी' होतेय- 'तू बहराच्या बाहूंची' ----------- molkorin motra dondodhikori hotey..... Hi Hi Hi....Samajhanewale ko ishara kafi


S