Thursday, October 11, 2007

निष्कांचन

लोहाचा तुकडा धरुनी
मी वणवणलो फत्तरांत,
पाषाणांचा डोंगर केला
परिसासाठी आक्रांत

बसल्या पायाला ठेचा
दगडांमाजी मज खूप
होते चिवट दगडांसम
परि सोन्याचे अप्रूप

परिसाच्या शोधापायी
खंडीनी वेचले खडे
अन वेचले आयुष्य
पण परिसस्पर्श ना घडे

मज माझे म्हणती वेडा
दगडांमध्ये मी दंग
परीसामागे पळतो मी
निर्वस्त्र आणि भणंग

मग मरता मरता हाती
तो लोहगोल पाहिला
पण हाती बघता सोने,
अश्रूंचा पाट वाहिला.

हळहळलो दुर्भाग्याला
दुखले दगडांचे घाव,
परिसास न पाहू शकली
माझी सोन्याची हाव.

निष्कांचन सडते आहे
माझे थडगे घाणीत,
आणि तो परीस बिचारा
हरवला त्या खाणीत.

1 comment:

Vidya Bhutkar said...

Great ! Khupach chaan kavita.