Friday, August 03, 2007

निराश्रित...

त्या सांजसावल्या गूढ, पारावर भेटून गेल्या,
शून्यात कुठवरी दूर त्या मजला रेटून गेल्या...

मी त्या शून्यातून चालत शून्याच्या काठी आलो,
शून्याच्या लाटेवरती, शून्यात चिंब मी झालो.

दूर पसरली होती, तेथे तिमिराची कुरणे,
तिमिर-लतांतून आली, मजवर तिमिराची किरणे.

मग तिमिराच्या ओटीत, नक्षत्र असे सांडले,
काळोख्या त्या कुरणाशी, ते चमचमचम भांडले.

त्या कल्लोळाला भिऊनी स्मरल्या परतीच्या वाटा,
पण वाटेवरती सयेचा मज खचकन रुतला काटा.

मी परतलो पारावर, पण पार पेटला होता,
अन झगझगत्या तिमिरावर त्या - धूर दाटला होता.

दिपलो त्या लोळाने, अन पडलो मग मी उघडा,
मजला लपवाया माझा, तेजाशी वेडा झगडा.

शून्याच्या काठी मजला आहे तिमिराचे छत्र,
परि डोळ्यांमध्ये शिरूनी, मजला छळते नक्षत्र.

-योगेश

5 comments:

Tulip said...

hey Yogesh.. yu just never stop surprizng me man.. fantastic!!!

Meghana Bhuskute said...

too good.

Anand Sarolkar said...

Superb!!!

प्रशांत said...

छान लिहिली आहेस.

Anonymous said...

vaa!