कॅम्पा कोला प्रकरणातल्या एका महत्वपूर्ण निर्णयाला वर्ष होत येईल, तेव्हांची एक आठवण...
कॅम्पाकोला इमारतींपैकी सर्वात उंच असलेल्या एका ब्लॉकमध्ये गेलो होतो... तिथून मुंबई ओळखता येऊ नये इतकी सुंदर दिसत होती. अर्थात, दहा कोटींपर्यंत जाऊ शकला असता असा तो फ्लॅट कवडीमोल होऊन घटका मोजत होता.
मालकीणबाईंनी दुसरी खिडकी उघडून 'पॅले रोयाल' नावाचा अक्राळविक्राळ स्कायस्क्रेपर दाखवला... 50-60 मजली तरी असावा. तेव्हां कोर्टाने त्याचंही बांधकाम बंद पाडलं होतं...
मालकीण- "हा एव्हढा मोठा 'पॅले रोयाल' पालिकेच्या नाकाखाली उभा राहिला, पालिकेला दिसला नाही, आमची घरं तेव्हढी दिसतात!"
मी (पेडगावकर)- "हो ना... जिथे पाहा काँक्रीटचा मारा... तुम्ही आला इथे तेव्हांची मुंबई किती वेगळी असेल ना?"
मालकीणबाई - "हो ना... आसपासच्या सगळ्या बिल्डिंगा इवल्याशा होत्या. याच गॅलरीतून मला चेंबूर-माहूलची खाडीही दिसायची!"
"अच्छा, म्हणजे तुमची इमारत तेव्हांची 'पॅले रोयाल' होती तर!" हा शेरा मी हातातल्या पाण्यासकट गिळला. मला लिफ्टने जमिनीवर यायचं होतं. बाईंच्या गगनचुंबी गॅलरीतून नाही.
No comments:
Post a Comment