Saturday, November 01, 2014

एका आईला अखेरचं पत्र

रेहाना जब्बारी. तुमच्या-आमच्या वयाची इराणी मुलगी. आपल्यावर चालून आलेल्या बलात्कार्‍याला मारल्यामुळे तिला फासावर लटकवण्यात आलं. इराणी दंडविधानात 'क़िसा' कलमं आहेत (जशास तसा शेवट). या कलमाखाली रेहानाची फाशी ठरली.


फाशीची तारीख एप्रिल 2014 ठरल्यावर मायलेकींना एक तास भेटू देण्यात आलं. तेव्हांही आईने रेहानाला फाशीबद्दल सांगितलं नसल्याचं पत्रातून कळतं. पुढे या शिक्षेविरुद्ध जागतिक मोहीम आणि 20,000 सह्या पुढे आल्यावर शिक्षा ऑक्टोबरपर्यंत टळली.

तिथे, मयताच्या कुटुंबाने खुन्याकडून रोख भरपाई पत्करली तर फाशी रद्द करण्याची तरतूद आहे. इराणी न्यायमंत्र्यांना या 'सुखांताची'  आशा होती. पण मयताच्या कुटुंबाने ती भरपाई नाकारली, आणि अखेरीस रेहानाला चार दिवसांपूर्वी फासावर लटकवलं.

'त्या' शेवटच्या भेटीनंतर रेहानाने आपल्या आईला, शोलेहला लिहिलेल्या या शेवटच्या पत्रात मन मोकळं केलंय. 

-------------------------

प्रिय शोलेह,

 क़िसा कलमांना सामोरं जायची पाळी आल्याचं आज मला कळलं. माझा ग्रंथ आटोपतोय, आणि हे तूच मला कळवू नयेस, हे मला लागलंय. मला याची कल्पना यावीशी तुला वाटत नाही? तुझ्या आणि बाबांच्या हातांवर ओठ टेकवायची ती माझी एकुलती संधी तू का घालवलीस?

 या जगात 19 वर्षं सुरळीत गेली. त्या काळरात्री खरंतर माझंच मरण यायला हवं होतं. माझा देह एखाद्या रस्त्यात पडला असता, पोलीस तुला ओळख पटवायला घेऊन आले असते, आणि तिथेच तुला माझ्यावर बलात्कार झाल्याचंही कळलं असतं. माझ्या खुन्याकडे सत्ता-संपत्ती असल्याने तो निर्धास्त सुटला असता, आणि तूही उरलं आयुष्य लाजेत आणि त्रासात घालवून मेली असतीस. प्रश्नच मिटला!

  पण इथेच घात झाला. माझा देह रस्त्यावर पडला नाही, तो जिवंतपणीच एविन जेलच्या  थडग्यात- तिथल्या कोठडीत सडला, आणि तिथूनही शहर-ए-रायच्या कारागृहात रवाना झाला. आपण सगळं स्वीकारून निमूट रहावं. मृत्यूपलिकडेही आयुष्य आहे हे तूही जाणतेस.

  आपण या जगात काहीतरी अनुभवायला, शिकायला येतो, आणि प्रत्येक जन्माचा एक हेतू असतो ही तुझीच शिकवण आहे. मी हे शिकले, की आपल्याला प्रसंगी लढावं लागतं. माझ्यावर चाबूक ओढणार्‍या माणसाला थोपवायला एक गाडीवाला पुढे आला, आणि तोंडावर चाबकाचा फटका खाऊन तोच जिवाला मुकल्याचं तू मला सांगितलंस. एखाद्या तत्वासाठी जीव ओवाळायचीच ती शिकवण होती.

  शाळकरी वयातही, "संघर्षाच्या-तक्रारींच्या प्रसंगातही बाईने बाईसारखं राहावं" हे तू शिकवलं होतंस. आमच्या वर्तनाकडे तुझा किती रोख असे हे आठवतंय ना? तुझा अनुभवच चुकीचा होता. मी गोत्यात पडले तेव्हां ही शिकवण माझ्या कामी आली नाही. कोर्टात सगळ्यांसमोर मला सराईत खुनी आणि गुन्हेगारासारखंच रंगवलं गेलं. मी टिपं गाळली नाहीत. मी रडले-भेकले नाही, कारण कायद्यावर माझा विश्वास होता.

  माझ्यावर करूनसवरून साळसूद असल्याचा ठपका पडला. आठव, मी डासांनाही मारत नसे, झुरळांचीही शेंडीच पकडून त्यांना लांब टाकत असे. पण सगळ्यांसमोर मी खुनी ठरले. जनावरांशी माझी धिटाई 'पुरुषीपणा' समजली गेली, पण मला 'पुरुषी' ठरवतांना माझी लांबलचक-रंगलेली नखं पाहायची तसदीही जजसाहेबांनी घेतली नाही.

  अशा न्यायमूर्तींकडून न्यायाची अपेक्षा करणारा खरंच प्रचंड आशावादी असावा. त्यांना हे जाणवलंच नाही की माझे हात एखाद्या खेळाडूसारखे घट्टे पडलेले नाहीत. ज्यावर प्रेम करायला तू मला शिकवलंस, त्या देशाला मी नकोशी झाले होते. चौकशीदरम्यान नाही-नाही ते शेलके शब्द मला रडवत होते तेव्हांही माझ्यासाठी कुणीच धावून आलं नाही. माझ्या सौंदर्याची शेवटची खूण- माझे केस भादरल्यानंतर- मला 11 दिवसांचा एकांतवास फर्मावण्यात आला.

 शोलेह- हे वाचून रडू नकोस. तुरुंगाच्या पहिल्या दिवशी एका म्हातार्‍या शिपायाने माझ्या नटव्या नखांसाठी मला मारलं, मी समजून चुकले की या युगात ना देखणेपणाची किंमत आहे, ना वैचारिक सौंदर्याची, ना सुंदर अक्षराची, ना दृष्टिसौंदर्याची, ना मंजूळ आवाजाची.

 आई, माझी विचारसरणी बदलल्येय, पण त्यात तुझी चूक नाही. हे लांबणारं मनोगत मी एकांच्या हवाली करत आहे, जेणेकरून तुला न कळवता मला संपवलं, तर हे तुझ्यापर्यंत पोचावं. माझी एव्हढीच एक खूण तुझ्याकडे राहील.
 
  मरण्यापूर्वी एकच मागते. हा एक हट्ट तुला जमेल तसा, आणि जमेल तितका पुरव. हा हट्ट या जगाकडे, या देशाकडे आणि तुझ्याकडे करत आहे. तो पुरवायला तुला वाट वाकडी करावी लागेल.

  ही शेवटची इच्छा लगेच लिहीत आहे. न रडता ऐक. हे माझं मागणं कोर्टापर्यंत पोचव. तुरुंगाधिकार्‍यांच्या मंजुरीशिवाय हे असलं पत्र बाहेर पडू शकणार नाही, म्हणून तुला पुन्हा माझ्यापायी त्रास होईल. पण या एका मागणीसाठी तुला हातही पसरावे लागले तरी माझी हरकत नाही. माझा हा हट्ट पुरवायला हात पसर, पण माझ्या जिवाची भीक मागायला हात पसरू नकोस.


  माझे आई, प्राणापलिकडचा माझा तो हट्ट हा आहे, की मला मरून मातीत सडायचं नाही. माझ्या डोळ्याची किंवा तरूण हृदयाची माती होऊ नये. मी फासावर गेल्यागेल्या माझं हृदय, मूत्रपिंड, डोळे, हाडं, वापरता येण्याजोगा एकूण एक अवयव गरजूंकडे पोचता व्हावा. माझे अवयव पावलेल्यांनी मला ओळखावं, माझ्यावर फुलं उधळावीत किंवा माझ्यासाठी गार्‍हाणं मागावं अशीही माझी इच्छा नाही.

  मी मनापासून तुला सांगतेय, माझं थडगं बांधून त्यावर रडत-कुढत बसू नकोस. मी गेल्याचे काळे कपडे घालू नकोस. माझा पडता काळ विसरायचा प्रयत्न कर. मला वार्‍याच्या हवाली कर.

  जगाने आपल्यावर प्रेम केलं नाही. माझ्या नशिबाशी त्यांना देणंघेणं नव्हतं. मी नशिबावर हवाला सोडून मृत्यूला कवटाळतेय. देवाच्या कचेरीत मी इन्स्पेक्टरांवर फिर्याद भरणार आहे. इनस्पेक्टर शामलू, कनिष्ठ न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती... जिवंत असतांना मला मारणार्‍या, मला ओरबाडणार्‍यांवर मी फिर्याद करणार आहे.

  नियंत्याच्या दरबारात मी डॉ. फ़र्वन्दींवर, क़ासेम शाबानींवर, जाणते-अजाणतेपणी, खोटारडेपणाने माझे हक्क तुडवणार्‍या, आणि आभासाला वास्तव मानून न्याय सुनावणार्‍या सर्वांवर खटला भरेन.

  माझे कोमलहृदयी माते, त्या जगात आपण फिर्यादी असू, आणि इथे फिर्यादी असलेले तिथे आरोपी असतील. पाहूयात, देवाच्या मनात काय आहे. मला तुझ्या कुशीत मरायचं होतं.

I love you.

No comments: