Tuesday, December 05, 2006

चौकट राजा

"छोटू!! चॉकलेट!!"
".... छोटू, चॉकलेट आवडतं ना तुला? हे बघ!"


छोटू फक्त लाजून टेबलात डोकं खुपसतो. त्याचे जवळजवळ भावशून्य डोळे खाली आपलेच बूट पाहतात. त्याला चॉकलेट द्यायचे सगळे मार्ग संपत आलेले दिसतात. आता त्याच्या अर्धवट उघड्या बाळमुठीत मी हाताने चॉकलेट कोंबायचा प्रयत्न करतो. मूठ उघडतही नाही, आवळतही नाही. जणू चॉकलेट अदृश्य असावं असा छोटूचा प्रतिसाद असतो.

वर्गात शिकवणार्‍या ताई हसून सांगतात, "नाही रे... नाही घेणार तो..." छोटूची भीडभाड चॉकलेट पाहून तरी जाईल ह्या विश्वासावरून आपण हलायला तयार नसतो, कारण त्याच्याकडे पाहून तो इतर मुलांपेक्षा वेगळा आहे ह्यावर प्रथमदर्शनी तरी विश्वास बसत नाही.

"पण मला दे..." ताई हसतमुखाने सांगतात. "...माझ्या हातून घेईल तो!" आपली विकेट पडते. 'मला एक चॉकलेट देताना इतका घाम फोडणारा छोटू, ताईंशी चटकन मिसळतो कसा?' ह्या विचाराने थोडा हेवा वाटतो. मग बाकीच्या मुलांकडे मोर्चा वळतो. कुणीतरी आपल्याशीच खेळत असतं, कुणी व्हीलचेअर मध्ये बसून मूकपणे हसत पाहतं. कुणाच्या तोंडून शब्दांऐवजी नुसतीच लाळ गळत असते, पण ही चिमणबाग अतीशय प्रेमाने चॉकलेट्स घेते.

बाकीच्या वर्गांत एव्हाना 'मामा' आल्याची कुणकुण असते... कॉरिडोअर्स मधून जाताना मुलं मध्ये थांबवून, "नमस्ते मामा!" करतात. मग आपणही "नमस्ते!" करायला हात जोडणार, इतक्यात समोरून 'शेक-हँड' साठी हात पुढे येतो. बच्चेमंडळींचा घोळका ओलांडून आपण पुढल्या वर्गाच्या दाराशी येतो...

... हा 'व्यावसायिक गट'. इथल्या मुलांचं मानसिक-शारीरिक वय थोडं जास्त. चलाखसुद्धा तितकेच! पण चॉकलेट्स बघून उजळणारा चेहरा अगदी छोट्यांच्या तुकडीइतकाच निरागस आणि '१०० वॉट्स' चा! चॉकलेट घेऊन सगळे आनंदाने हसणार आणि हस्तांदोलन करणार!! इकडे आपला शहाणपणा चालत नाही, मोबाईल 'लॉक' करून जरी त्यांच्या हातात खेळायला दिला, तरी तो रीतसर अनलॉक केला जाईल, आपली आवडती रिंगटोन काढून-मित्रांना एकवून दाद घेतली जाईल!

एकाने माझ्या जॅकेटची मखमल चिमटीत पकडून... "मा..मा.. तुझंय?" विचारलं. मग माझी मान हलल्यावर हातानेच 'मस्त' चा इशारा केला.
"घालतोस?"
एक हसू... सलज्ज 'नको' चा नुसता हिसका...
"घाल ना!" (आणि मग स्वत:च जॅकेट काढून त्याच्या खांद्यावर ठेवायला गेलो)
मग तर ते पोर लाजून लाजून हैराण!! :) त्याच्या गणवेशाला चिमटीत पकडून मीही 'मस्तंय!' चा इशारा केला की पुन्हा त्याची कळी खुलून गेली! मग थोडावेळ हास्यविनोद करून परत सगळे आपापल्या कामात मग्न.

पुढच्या वर्गात मुलींचा एक कंपू cross stitching आणि शोभेच्या वस्तू बनवत बसला होता. "नमस्ते!" ची एक फैर झडली . चॉकलेट पाहून एक मुलगी आनंदाने अक्षरश: चीत्कारली! मग प्रत्येकीच्या हातात चॉकलेट ठेवून प्रत्येकीचं काम पाहणं, "हे तू बनवलंस? ...मस्तंय गं!" सांगताच मग ती अजून काहीतरी दाखवणार- असं सगळ्या जणींचं चालू होतं.

असे कितीतरी जीव. चाळिशीतही शैशवात अडकलेल्या एक बाई... मानसिक वयाच्या मानाने अप्रतीम चित्रं काढतात. त्यांतली रंगसंगती, रेषांचा नेटकेपणा, पाहून कौतुकाने डोक्यावरून हात फिरवावा की वयाचा मुलाहिजा करून नमस्कार- काहीच कळेना.

माणसं व्यवहारी शहाणपण आणि निखळ-निर्व्याज स्वभावाचं नातं 'व्यस्त' ठरवूनच मोकळी का होतात कळत नाही.

ही माणसं - शरीराचा पिंजरा मोठा झाला तरी मन निरागस पिल्लूच राहिलं. तुमच्या आमच्या सारखं श्वापद बनलं नाही त्याचं. हे लहानसं जग पाहून खूप काही करावंसं वाटतं... मी एकटा काय करणार? तूर्तास तरी तुमच्या समोर ह्यांच्याच गुरुजनांच्या आणि नातेवाईकांच्या आठवणी त्यांच्याच शब्दात ठेवत आहे. त्या वाचाव्याशा वाटल्या तर http://chaukatrajah.blogspot.com ह्या दुव्याला अवश्य भेट द्या. तुम्हालाही काही सुचलं, शक्य असलं, तर तुम्हीही मदतीचं एक बोट उचला!

2 comments:

Satish said...

very touching and nice....

Sneha said...

आपण बर्‍याचदा एक चोकटीत जगतो..... आपली स्वप्न... आपली माणस.... आणि आपलेच जग..... आपण आपल्यातच गुरफ़टत बसतो....
पाषाणात देव शोधणारे आपण..माणूसकी कधी विसरुन बसतो कळतच नाहि....
खरतर नुसत रम म्हटल तरि त्याल पोहचतो... आणि आनाथ अंपग किन्वा म्हणुन जगणार्‍यान्च्या मुखावरच हसु ह्यातच त्याच समाधान...
पण जग व्यवहरी झाल आहे..ऽअपणहि कधितरी होतो....
पन जगतन त्य एक चोउकतिल उच्कटुन दुरर्यन्सथि जगण्यचा एक छोटस प्रयत्न करण्यार्‍या तुझ्या सारख्या लोकान्ना बघीतल की राम म्हटल्याचा भास होतो......[मी खुप लिहित आहे असे तुल वाटेल कदाचित..पन खोट नाही ते...] फ़क्त एवधच मनवस वाटत कि....
नुसतच जगण्या पेकशा जगवायच असत...

कधितरी नुसतच जगण्यापेक्शा
कुणालातरी जगवायच असत..
नुसतच हसण्या पेक्शा..
कुणालातरी हसवायच असत...
तर कधि दुसर्‍याच्य
आसवन्मद्ये भिजयच असत...

खुप लिहवस वाटतय पण इथेच थाम्बते...... पण शेवटी एकच.......THANKS TO BEING MY FRIEND....मला तुझा अभिमान वाटतो.....