Friday, January 02, 2015

निर्धाराची हुरडा पार्टी

नागमोडी वळणं घेत एक पजेरो जिल्ह्याकडे परत निघाली होती. तारवटलेल्या डोळ्यांचा संग्रामसिंह स्टीअरिंगचा आधार घेत समोरून येणारे ट्रक चुकवत होता. मागे शाखेतले तीन मित्र, आणि डावीकडे जिगरी दोस्त- उपशाखाप्रमुख बसला होता. कार फ्रेशनरने आंबूस ढेकरांसमोर कधीच मान टाकली होती. मागच्या सीट्सवर झोपेत डोलणाऱ्या एक-एक माना जाग्या होऊन नव्या वर्षाचे व्हॉट्सॅप्प उघडून पाहत होत्या.

“च्यामायला, दर स्टेटस-मेसेजमधी ‘निर्धार-निर्धार’ लयीच यायलंय! ‘वजन कमी करायचा निर्धार’, ‘रोज पळायचा निर्धार’, ‘बचतीचा निर्धार’! कायतरी ठरवायचं त्याला निर्धार म्हनायलेत. पन ‘निर्धार’चा अर्थ नक्की काय आसतोय?”

पाह्य. ज्या ठरावाला धार नसती त्यालाच निर्धार म्हणतात! एक जानेवारीला केलेला निर्धार नऊ जानेवारीपलिकडं टिकला, तर म्याटर शीरेस हाय, एरव्ही काय, आपल्या समोरच्या शाखेच्या साहेबांनी निर्धार मेळावा भरवलाच होता! जानेवारीच्या आधी पर्चारात ‘निर्धार’’निर्धार’ ऐकलं नाही? स्वच्छतेचा निर्धार करून, झाडू-हातमोजे घेऊन आपन फेसबुकवर शाखेचे फोटू टाकले न्हाई? हे निर्धार प्रकरन इंटरनॅशनलबी आसतंय, ते पाकिस्तानात पोरं मारल्यावर त्यांच्या सरकारनंबी टेर्रिष्ट टांगायचा निर्धार केलाच की! त्या हॉटेलपासच्या शाखेच्या मोठ्या सायबांचा बी एक निर्धार व्हता- ‘रडायचं नाही, लढायचं’. मंग कित्ती रडले आठव!! निर्धार हुरड्यासारखा असतो. तो कवळाच एन्जॉय करून संपवायचा. त्याची ज्वारी झाली की चावतचावत रेटावा लागतो! ए हेकन्या… ऐकतो का झोपला?

मागून तिसरा आवाज आला... “ऐकतोय. तुमचं ऐकत यानं फेसबुकवर लिक्कर कोटा कमी करायचा निर्धार टाकलाय. पयला लाइक वहिनींचाच आला. जाग्याच होत्या जनू!

नागमोडी वळणं घेत पजेरो वहिनींच्या घराकडे निघाली.
--------------
क जानेवारीचा कोंबडा, आरवलाच नाही. डोळ्यावर कोवळं ऊन आलं, तेव्हां चंद्रीनं घोंगडी नाकावरून हनवटीवर घेतली. एक डोळा उघडून बाजूला पाह्यलं. दमलेली कार्टी शिमिटाच्या खोप्यामध्ये एका गोधडीखाली एकामेकांना मांजरीच्या पिलासारखी गुरगुटून निजली होती. बिनबैलाच्या तिरक्या गाडीत धनी अजून तिरका होऊन झोपला होता. धुळकट अंगणात पजेरोची चाकं उमटून गेली होती.

आंबलेलं अंग उचलून चंद्री झाडायला उठली, तर अंगणापलिकडून सगुणा खोचकपणे हसताना दिसली. "पार्टी झ्याक झाली म्हनं!". चंद्री अर्धवटपणे "असं? हां..." म्हणून पेंगतच झाडू लागली.

धन्याची शेतावर पिकं पाजायची वेळ, पण पाजायला पिकं, शेंदायला पाणी, पंपाला वीज आणि धन्याला जाग नव्हती. चंद्रीचा मेंदू जागा झाला, तशी त्या लोडशेडिंगमध्ये डोक्यातली ट्यूब पेटली. काळ्या आरवला नाही, कारण त्याने शेवटचा आवाज काल काढला होता. लाली कोंबडी आणि तिची पिलंबी कोंबड्यामागं गेली. त्या सगळ्यांची पिसं मागच्या केरात किंगफिशरच्या बाटल्यांमधी पडली होती.

अंगणातल्या धुळीची, शेकोटीत राख झालेल्या ज्वारीची मूठमाती काळ्या-लाली-पिल्लांना देऊन चंद्री भांडी करायला वळली. खरकट्यात टाकलेल्या पाऊण-पाऊण भाकरी, आख्ख्या कुरड्या, पापडं, दोन वाटी खर्डा वेचून बाजूला केला. भांडी केल्यावर चुलीत सरपण टाकलं, उष्ट्या भाकरी आगीतून काढून कुस्करल्या. पोरांच्या न्याहारीची सोय झाली.

वर्षाचा पहिला दिवस प्रसन्न उजाडला होता. एका अर्धमेल्या हंगामातनं, पार्टीतनं दोन महिन्यांचा प्रश्न सुटला होता. ज्वारी वाळतांनाही नवऱ्याने ऍसेफेटच्या बाटल्या हट्टाने जपून ठेवल्या, तेव्हांच चंद्रीचा ठोका चुकला. तिनेच त्या बाटल्या विकायचा हट्ट धरून बीअरच्या बाटल्या आणवल्या. मन जड करून सगळा हुरडा उपटून काढला. थोडी उसनवारी वाढवून शेतात हुरडा पार्टीची पाटी लावली.

हुरड्यावेगळी उरलेली ज्वारी दुभत्या जनावरांना घालून ती जगवली. त्यांच्या दुधावर थोडी थोडी उधारी फेडली. पहिला आठवडा तोट्यात गेला. हुरडा साठवायला-टिकवायला जागा नव्हती. चंद्रीनं हातपाय गाळून बसलेल्या नवऱ्याला उठवलं, शहराच्या बायपास रोडवर हुरडा विकायला सुरुवात केली. शहराकडचा खप आणि पार्टीचे पैसे साठत गेले. हुरडा कमी होत गेला. 31च्या रात्री उरलेला हुरडा संपला. पोरांची न्याहरी करवून शाळेत मास्तरांकडं थकलेली फी देऊन पोरांना पाठवलं.

अंघोळ करून, धन्याला उठवून ती दिवा लावायला देवाच्या कोनाड्यात आली. कुंकू लावत म्हणाली. “म्या हातपाय गाळायची न्हाई. यान्ला औषधाजवळ फटकू द्यायची न्हाई. उन्हाळ्याचं तंवा बघू. इतकं पार पाड अंबाबाई!

‘हॅप्पी’, ‘न्यू’, ‘इयर’, ‘निश्चय’, ‘निर्धार’, ‘रेसोल्यूशन’- असली काहीही अडगळ चंद्रीच्या शब्दकोशात नव्हती.