'वर्हाड'ची ही क्लिप चालवत तिच्याबरोबरच हा उतारा वाचावा. ह्या संवादातील कर्मचारी निव्वळ काल्पनिक असून वास्तवातील कुठल्याही व्यक्तीशी हिचा संबंध नाही. (असल्यास माझंच दुर्दैव!)
"वन्सं!! वन्सं!!! वन्सं!!!!"
गेली तिकडे... गेली ना?!
अगंऽऽऽ आजिबात कामाला हात लावत नाही!
नुसतं ह्या desk वरून त्या desk वर... त्या desk वरून ह्या desk वर! गुरुगुरुगुरु हिंडती अन भासवती, कामाचे डोंगर उपसायली! पण आपल्याला बोलता येत नाही ना? तोंड धरून बुक्क्यांचा मार चाललाय चॅनलमध्ये. सांगता कुणाला? सांगता कुणाला?? कसेतरी दिवस काढायचे, झालं! फार कंटाळले ह्या ब्यूरोत मी, शप्पत खोटं नाही सांगत! दिल्लीला रोज मेल टाकते, मला उचला! तेही कुठे रजा टाकून गेलेत कुणाला माहिती!!
... अजिबाऽऽत काम करत नाही!!
... बरं, बोलायला जावं तर नाकावर माशी बसू देत नाही! स्वभाव तर माहितेय तुला कसाय... बोललं की 'फुस्स'... बोललं की 'फुस्स'... बोललं की 'फुस्स'! अगं काय? हीच जगात एक सीनिअर आहे की काय? सीनिअर झाली म्हणून डोक्यावर मिरी वाटायची की काय? वा गं बाई वा, असं कसं? एव्हढं मोठं चॅनल आणि ब्यूरो म्हटल्यावर प्रत्येकाने थोडं-थोडं तरी काम केलंच पाहिजे की नाही? एकट्या रिपोर्टरने किती म्हणून मरमर मरायचं? त्याला काही मर्यादा आहेत की नाही शेवटी? एकत्र डेस्क म्हटल्यावर प्रत्येकाने थोडं-थोडं काम करू नाही? वा गं बाई वा! असं कसं?
... आता तुला मी परवांचीच गोष्ट सांगते, बॉस अन् मी उभे होतो, coffee machineशी गप्पा मारीत! मी त्यांना म्हटलं, म्हटलं मी, मला नाही राहवलं... "तुमची जूनिअर आणि आमची सीनिअर झाली म्हणून डोक्यावर धोंडा फोडायला सांगता का? का दगड फोडायला सांगता?!" आपला हक्काचा बॉस म्हणून मी त्यांना सांगायला गेले! अन् काही नाही गं, काय म्हनलं ना, बूमची शप्पथ घेऊन सांगते-- "तुम्ही तिला समजावून का नाही सांगत हो?! एखादा input नसला, तर तो घेऊन ठेवायला सांगा, एखादी टेप असली तर ingest करायला सांगा, एखादी इंगिल्श बाइट paradub करायला सांगा! तेव्हढाच कामाचा भार हलका होतो!" आपला हक्काचा बॉस म्हणून मी त्यांना सांगायला गेले...
... सांगितल्याबरोबर मला म्हनले- "गप, बोलू नको!! गप, बोलू नको!! गप, बोलू नको!!" इतकं बोलले बाई मला भडंभडं!! आपला हक्काचा बॉस म्हणून मी सांगायला गेले तर आपलं मेलं सोंग असं... आपलं नशीबच फुटकं... जिथं हात घालायला जावं तिधं भोकं निघाया लागलेत! तरी कॉलेजमध्ये placement incharge ला म्हनले होते मी, "मला ह्या चॅनेलमध्ये देऊ नका!" पण त्यांनी माझ्या पाठीवर (?!) हात फिरवू फिरवू मला सांगितलं, "मोठ्ठं चॅनल! मोठ्ठं चॅनल!!" हे-- मोठ्ठं चॅनल!! बडा घर अन पोकळ वासा!!
आजिबात काम... धृ
बरं, कामाचं काही नाही- कामाने कुणी झिजणार आहे का लुळंपांगळं होणारे? मला कामाचं काही नाही वाटतं. हिचं कसंय? काम तर काही करायचं नाही, पण चांगलं काही झालं, की मोठेपणा सगळा आपल्याकडे घ्यायचा! कोणाला सांगणारे गं मी? मरमर आपण मरायचं आणि मोठेपणा हिने घ्यायचा! आता परवाचीच गोष्ट सांगते-
१) आपल्या बुलेटिनला स्टिंग ऑपरेशन झालं... स्टिंग... स्टिंग ऑपरेशन गं! हं?! अगं, झालं का नाही? एकतर व्हय तरी म्हन नाहीतर न्हाय तरी म्हण! झेंडू फुटल्यासारखी पाहतेस काय माझ्याकडं? अन तिला घाबरता का गं एव्हढं, मी आहे ना!! (फक्त ती आली की सांगा!)... परवांच्या बुलेटिनला स्टिंग ऑपरेशन झालं, ही सगळीकडे सांगत सुटली, "माझ्यामुळं स्टिंग ऑपरेशन झालं! माझ्यामुळं स्टिंग ऑपरेशन झालं!!" हिच्यामुळं कॅमेरामनचं टाळकं फुटलं!
२) आपल्या business desk च्या पोरीला जर्मनीची फ़ेलोशिप मिळाली, ही बाई सगळीकडं सांगत सुटली, "माझ्यामुळं तिला फ़ेलोशिप! माझ्यामुळं तिला फ़ेलोशिप! माझ्यामुळं तिला फ़ेलोशिप!" हि-च्या-मु-ळं-ति-ला--फ़े-लो-शि-प!! 'ढ' मेली!! बरं, बातमी कवां सांगावी-कशी सांगावी ह्याला काही धारबळ? लोकांना Outlook वर mails पाठवू-पाठवू सांगायली!
३) यंदाच्या आठवड्यात TAM चा निकाला आला माय!! चॅनलचा TRP टरारून वर आला! ही बाई सगळीकडं गावात सांगत सुटली, "माझ्यामुळं TRP टरारून वर! माझ्यामुळं TRP टरारून वर! माझ्यामुळं TRP टरारून वर!" हि-च्या-मु-ळं- T-R-P ट-रा-रू-न- व-र!! टरटरी मेली!