Saturday, January 13, 2007

"बोले तैसा चाले..."

"बोले तैसा चाले" ह्या विषयावर पु.ल. शाळेतल्या वक्तृत्वस्पर्धेत म्हणाले, "माझा ह्या उक्तीवर मुळीच विश्वास नाही, कारण 'बोले तैसा चाले' असा माणूस फक्त दारूडाच असतो." पु.लं. चे पाय पाळण्यात दिसले, पण माझे पाय दिसायला वयाचं २३वं वर्ष उजाडावं लागलं.

त्याचं काय आहे, दारूचा आणि माझा संबंध कायदेशीर वय उजाडल्यानंतरच आला. आणि मी तो निर्भीड प्रेमिकांसारखा कुणापासूनही लपवला नाही. तसा मला ह्या 'संकल्पनेचा' अत्यंत तिटकारा होता. 'मी कमावता झाल्यावरही दारूला socialisation शिवाय कुठल्याही उद्देशाने शिवणार नाही', हा माझा संकल्प अर्धा मोडला. Post graduation च्या पहिल्या वर्षी 'चवीच्या कुतुहलाने' विवेकावर मात केली, आणि socialisation साठीच का असेना, पण कमावता व्हायच्या आधीच बीअर चा पहिला घोट घशाखाली 'वतला'.

साहजिक आहे, पहिली चव भयंकर कडूजहर होती. पण माझ्या हातात 'तसलं काही' बघून तमाम जनता चरकली. आमची कॉलेजमधली (तेव्हांची) एकूण प्रतिमा पाहता हा 'लतादीदींच्या तोंडात धुमसता चिरूट' किंवा 'मजरूहजींनी बंबैय्या पद्यावली रचण्यासारखा' अशक्य कोटीतला प्रकार होता. चव 'घो. च्या मू.' सारखी लागली (नुसती एक उपमा हो! मी 'ते' चाखलं नाही. जिज्ञासूंनी उगाच खोलात शिरू नये).

आईला तडक SMS केला, "Hi mom!! Had the first drink of my life. EVERYONE got a rude shock. You too... kindly 'beer' with." आईचा दुसर्‍या दिवशी 'धन्य-धन्य' फोन आला... "शाब्बास! जग सुधरलं... तुम्हीही सुधरा!!"

पण आईची मी निराशा केली. ह्या बाबतीत मी 'सुधरलो' नाही. बीअर ची सवय होईपर्यंत तिच्याशीच चिकाटीने लढलो! साधारणत: मित्र 'वरच्या यत्तेत' जातात असा अनुभव आहे. बीअर सारखं 'बाळबोध' पेय पीत राहिलो म्हणून मित्रांची थट्टा सहन केली, तर दारूला शिवलो म्हणून 'स्वच्छ' मित्रांच्या नजरेतून उतरलो.

मात्र मुंबईत जेंव्हा 'आज तक' मध्ये summers साठी चिकटलो, तेव्हा फ़िल्मी पार्ट्या कवर करताना दारूला स्पर्श करायचा नाही हा दंडक पाळला. [पार्टी जरी असली तरी आपण 'ड्यूटी'वर 'दारू खावन (ती पन फुकटची दारू) काम करायाचा नाय' इतका विवेक शाबूत आहे!! :)]

असो. मात्र मुंबईतल्या सुट्टीतच काय घडू शकतं ह्याची चुणूक दिसली. आम्ही तीन मित्र जेवायला गेलो. एकाने बीअर मागवली. स्टँडवरची एक सायकल पडली की सगळ्याच पडतात तसे आम्ही सगळेच 'चल होऊन जाऊ दे' झालो.

आयुष्यात पहिल्यांदा अख्खी बाटली रिचवली. "पण आपल्याला अजून चढली नाहीए! आपण शुद्धीत आहोत" ह्या भावनेनेच विजयाचा इतका आनंद झाला, की हसता हसता डोकं प्रमाणाबाहेर कलंडू लागल्याचं कळलं नाही. हे 'ते' कलंडणं नाही, हे ताडून पहायला मित्रांना 'कॅटवॉक' करून दाखवला. 'मला काही झालं नाहीए ना रे?' च्या उत्तरादाखल फक्त 'ख' आणि 'फ' च्या बाराखडीतले आवाज ऐकू आले. मग घडलं ते असं...

"योगेश, Are you sure, तुला ह्या अवस्थेत घरी जायचंय?"
"हो रे दादा!! आता १:०० वाजतोय. घरी पोचायला दोन वाजतील. घरी फक्त दोन जण आहेत. आजी आणि मी. सगळ्यात धाकटा मी आणि सगळ्यात मोठी आजी. आणि ती झोपलीय!! तिला डिस्टर्ब करावं लागणार नाही."
"....." (सांगणे न लगे)
:)

आयुष्यात दुसरा असा योग आला एका प्रवासावर. आता हे हलाहल पचवून 'भोळा सांब' बनून रहायची सवय होऊ घातली होती. झोक जाणं फक्त मला जाणवण्याइतपत 'प्रगल्भ' झालं होतं. रात्री चालकाशेजारच्या माणसाने झोपू नये असा etiquette असल्याने माझ्याइतका 'योग्य'-टक्क जागा उमेदवार दुसरा नव्हता. मी तोंड मिटून ठेवल्याने कुठलीही 'दर्पोक्ती' व्हायचा प्रश्न नव्हता. सीटमध्ये बसल्याबसल्या 'चक्कर' खात मी समोरचा रस्ता पहायचा प्रयत्न करत होतो. गरगरते डोळे आणि सैल झालेले हातपाय ह्यांनी मी नॉर्मल सहप्रवाशाचं सोंग वठवायचा पुरेपूर प्रयत्न करत होतो, पण फार वेळ ते सोंग टिकलं नाही. अशीच एक भोवळ, एक वळण आणि समोरून येणारा ट्र्क ह्यांचा 'सुरेख योग' जमून आला. तसल्या स्थितीतही जाणवलं की आज गाडीचं स्टीअरिंग माझ्या हातात असतं, तर आजच्या झोपेतून मला जाग आली असती का?

त्यामुळे 'अंगूरी' माझ्या आयुष्यात अप्सरा बनून आली असली, तरी तिच्या आडची शूर्पणखा मी ओळखून आहे. बस्स, आता हिच्यापायी आयुष्यात रामायण घडू नको दे म्हणजे मिळवली!

विनोद पुरे झाला... पण एक पेय एकच घोट बनून येतं, आणि घर आणि आयुष्याचाच घोट घेतं. आपण त्याला इतक्या हसतमुखाने सामोरे जातो ही आपल्याच दुर्दैवाची गोष्ट आहे. व्यसनं करायचीएत? लाख करा... मग घर उभारून, माणसं घरात आणून घर कशाला बर्बाद करता? ती माणसं तुमच्या आयुष्यात आली नसती तर त्यांचं काही नुकसान झालं नसतं! 'दु:ख बुडवायला दारू' हे खरंच जर कारण असतं, तर जगात अन्नापेक्षाही दारूचं उत्पन्न जास्त असायला हवं होतं. प्रत्येक वडलांच्या कपाटात एक बाटली, प्रत्येक आईच्या पर्समध्ये एक क्वार्टर असायला हवा होता.

"जाऊ दे रे... फुल्लटू टाईट आहे आज. उतरली की पुढचं लिहीन. फुकट फालतू senti मारतोय..."

:O
-योगेश
damle.yogesh@gmail.com

Wednesday, January 10, 2007

कुंचला, चेहरे आणि भूतकाळ.

२००४ साली जेव्हा इंडिया टुडे च्या एका अंकात मुघल-ए-आज़म रंगीत होऊन येणार असल्याचं वाचलं, तेव्हा कुतुहलानेच वेड लागेल का असं वाटलं होतं...

१)Extreme close-up मध्ये कातिल दिसणार्‍या मधुबालेच्या त्वचेचा रंग खरंच दंतकथांइतका गोरा असेल का?
२) त्वचेचा रंग तर अंदाजाने रंगवता येईल. पण मूळ सिनेमातला 'शेखू' सोडून कुणीच जिवंत नाही, तर कपडे-दागिने तंतोतंत कसे रंगवता येतील?
३) दागिने रंगवणं शक्य झालं, तरी ऊन-पाणी-हवेतली धूळ ह्याना कसं रंगवणार?

ह्या आणि असल्या शंकांनी डोक्याचा भुगा झाला होता. चित्रपट पाहून जेव्हा बाहेर पडलो तेव्हां तरंगतच बाहेर पडलो. भुरळ पडली ती तंत्रज्ञानाची.

पुढल्याच वर्षी माझ्या हाती Adobe Photoshop नामक कोलीत पडलं. मी कुणाकुणाला आग लावत गेलो तो इथे मांडत आहे. :) मूळ माणसांचं सौंदर्य तर तंतोतंत उभारणं कधीच शक्य होणार नाही पण ब्लॅक एण्ड व्हाईट चित्रपट आपल्याच कल्पनेच्या काचेतून रंगीत करायची सवय लागली, आणि ती कल्पनाचित्र तुम्हापर्यंत पोचवायचा मोह आवरला नाही.

एक चित्र रंगवायला ५-६ तास लागले. सेकंदाला २४ चित्रं दाखवणारा- तीन तासांचा अख्खा सिनेमा रंगवायचा म्हटला तर एका माणसाला महितेय किती वेळ लागेल?

२४ फ़्रेम्स (१ सेकंद) x ६० (१ मिनिट) x ६० (एक तास) x ३ (तीन तास) = २,५९,२०० चित्रं

२,५९,२०० चित्रं x ६ तास प्रति चित्रास = १५५५२०० तास

म्हण्जे १७७.५ वर्ष, ==> एक सेकंदही आराम न करता!!! :)

ह्या साहिब-बीबी और ग़ुलाम मधल्या मीनाकुमारी. ह्यांच्या साडीची जर, आणि कपड्याचा रंग वेगळा रंगवताना नाकी नऊ आले होते. मग लक्षात आलं की अर्धवट रंगवलेलं चित्र कमी कृत्रिम आणि जास्त सुंदर दिसतंय. :D

Meena copy B&W

Meena copy

स्मिता पाटलांनी ब्लॅक एण्ड व्हाईट चित्रपटात काम केल्याचं स्मरणात नाही. त्यामुळे मूळ रंगीत चित्राशी हे कितपत साम्य बाळगून आहे माहित नाही. पण ह्या चित्रात मी मेणबत्तीचा कृत्रिम प्रकाश तयार केलाय.


Smita-BW
Smita-Col

ह्याला म्हणतात अस्सल सौंदर्य!! सोनं, रत्नं, जरीचा रंग सरावाने रंगवता येतो. पण नूतनजींनी झगमगीत दागिने वा भारीपैकी कपडे कधीच on screen घातले नाहीत. साधेपणाला नैसर्गिक रंग कोणती वापरावेत ह्या यक्षप्रश्नाने घाम फुटला. पण मित्रांच्या पसंतीची पावती मिळाली, आणि मलाही नूतनजींचं हसू रंगल्यावरही तितकंच खरं वाटलं. :) (ओढणीचा रंग वेगळा, कुर्त्याचा वेगळा, आणि त्यांचा मिळून होणारा रंग, आणि केसांवरचा प्रकाश दाखवायचा प्रयत्न पण केला आहे.)

Nutan-BW
Nutan-Col

ही झाडाआडून डोकावणारी मधुमती! वैजयंतीमाला. थोडा कृत्रिमपणाही डोकावतोय, पण आवडली...
Vyjayantimala-BW-Col
Vyjayantimala-Col copy

Saturday, January 06, 2007

झुळूक

एक झुळूक
भिंतीवरचं हे चित्र तिरकं करून गेली.
गेल्या पावसाळ्यात ह्या भिंती कोरड्याच होत्या.
यंदा कुणास ठाऊक का,
त्यांना ओल आलीय, तडे गेलेत.
आणि तड्यांतून ओल अशी ओघळते,
जणु कोरड्या गालांवरून अश्रू.

हा पाऊस नाचत असे,
ह्याच घराच्या गच्चीवर,
बोटांनी काहीतरी गिरवून जायचा,
खिडकीच्या काचांवर.
आता गपचुप डोकावतो बापडा
हळूच, तावदानांतून.

दिवसभर किंचाळतो शुकशुकाट,
जणु उधळलेला सारीपाट...
कुणीच नाही खेळायला,
वा एखादा डाव टाकायला.

काळाचा ठोका चुकलाय,
वेळेचा ताल थबकलाय,
एव्हढा बदल घडलाय...

ती झुळूकच होती की वादळवारा
- जो ते चित्र तिरपं करून गेलाय?

(गुलज़ार च्या एका मुक्तकवितेचं स्वैर भावांतर. भाषांतर नाही)

Yogesh Raincoat la...