Friday, December 22, 2006

ऐसी अक्षरे...

सिंबायोसिस च्या उतारावर कुणा 'रविंद्र बनछोड' नामक एका सद्गृहस्थांच्या नावाची एक पाटी आहे. इतके दिवस ती पाटी इंग्रजीत होती. पोरं तिथून जाताना ती इंग्रजी पाटी वाचून जीव जाईपर्यंत मोठमोठ्याने हसायची. गाडी चालवताना कुणी 'Banchhod' हे वाचलं तर तोल जाऊन पडेल... "बनछोड ह्यांनी इंग्रजी पाटी देवनागरीत बदलून सामाजिक बांधिलकीचं दाखवलेलं प्रदर्शन..." इत्यादी इत्यादी!!

मध्यंतरी एका ईमेल फ़ॉरवर्ड लक्षात राहिला कारण त्यात प्रत्येक शब्दाची टांग तोडली होती. उदा. "You shall find it easy to read the sentence even if the spellings are jumbled." चा अवतार "You sahll fnid it esay to raed teh sentnece even if teh splleings are jubmled" असा झाला होता. तात्पर्य हे की आपण स्पेलिंग्स लक्षात ठेवतो ते शब्द म्हणून नाही, तर चिन्हं म्हणून. म्हणून बारीकसारीक चुका लक्षातसुद्धा न घेता आपण मजकूर समजून घेतो.

हे ठीक आहे हो, पण उद्या कुणी 'धडधाकट' शब्दांत भलतंसलतं काही पाहिलं तर? उदाहरणार्थ, शिवाजीनगर स्टॅँड मध्ये शिरत असताना एका हॉटेलच्या पदार्थांच्या यादीचा बोर्ड दिसला. त्यातील 'वडासांबार' मधला 'व' हा कसल्याशा आडोशामागे लपला होता. नुसती 'डासांबार' ही अक्षरं दिसत होती. मी डोळे चोळूनचोळून भर पुण्यात दिवसाढवळ्या 'डांसबार' ची जाहिरात करणार्‍या माणसाचं अप्रूप करत बसलो! मित्राला तिथल्यातिथे हे दाखवलं. अंगठा तोंडाकडे नेऊन मला 'बरा आहेस ना?' असं एक अक्षर न बोलता विचारलं! बरोबर आहे, अमृताशी पैजा जिंकणारी मराठी 'सोमरसाचा' परिणाम कशी आणते हे त्याला कळेना!

हा प्रसंग एका मैत्रिणीला सांगितला तेव्हां अत्यंत सहानुभूतीने मला म्हणाली, "अरे होतं रे असं! आता त्या दिवशी मी नाही का महाराणा चौक चं माराहाणा चौक केलं होतं?"

This is how the dyslexics of the world 'untie'! :) (हे उद्गार माझे नाहीत. 'कॉपीराईट' वाल्यांनी बोंबा मारू नयेत!)

पण हा प्रसंग फक्त मराठी भाषेवर गुदरतो असंही नाही! घाटकोपर स्टेशन वर 'गरम ताज़ा वडा-पाँव' वाचून नाश्त्याची इच्छाच मेली! कुणाचं तरी पाऊल चावतोय ह्या कल्पनेने त्यादिवशी भुकेवरही मात केली.

असो...ट्रक्सच्या पाठीमागे 'Horn OK Please' सारखे गूढरम्य संदेश लिहिणं जणु पुरेसं नव्हतं- म्हणून आज एका रिक्षामागे अजून काहीतरी दिसलं...
'तीन प्रवाशांसाठी आईवडिलांचा आशिर्वाद'!! :)

बहुत काय लिहिणे?
-Yogesh

Tuesday, December 05, 2006

चौकट राजा

"छोटू!! चॉकलेट!!"
".... छोटू, चॉकलेट आवडतं ना तुला? हे बघ!"


छोटू फक्त लाजून टेबलात डोकं खुपसतो. त्याचे जवळजवळ भावशून्य डोळे खाली आपलेच बूट पाहतात. त्याला चॉकलेट द्यायचे सगळे मार्ग संपत आलेले दिसतात. आता त्याच्या अर्धवट उघड्या बाळमुठीत मी हाताने चॉकलेट कोंबायचा प्रयत्न करतो. मूठ उघडतही नाही, आवळतही नाही. जणू चॉकलेट अदृश्य असावं असा छोटूचा प्रतिसाद असतो.

वर्गात शिकवणार्‍या ताई हसून सांगतात, "नाही रे... नाही घेणार तो..." छोटूची भीडभाड चॉकलेट पाहून तरी जाईल ह्या विश्वासावरून आपण हलायला तयार नसतो, कारण त्याच्याकडे पाहून तो इतर मुलांपेक्षा वेगळा आहे ह्यावर प्रथमदर्शनी तरी विश्वास बसत नाही.

"पण मला दे..." ताई हसतमुखाने सांगतात. "...माझ्या हातून घेईल तो!" आपली विकेट पडते. 'मला एक चॉकलेट देताना इतका घाम फोडणारा छोटू, ताईंशी चटकन मिसळतो कसा?' ह्या विचाराने थोडा हेवा वाटतो. मग बाकीच्या मुलांकडे मोर्चा वळतो. कुणीतरी आपल्याशीच खेळत असतं, कुणी व्हीलचेअर मध्ये बसून मूकपणे हसत पाहतं. कुणाच्या तोंडून शब्दांऐवजी नुसतीच लाळ गळत असते, पण ही चिमणबाग अतीशय प्रेमाने चॉकलेट्स घेते.

बाकीच्या वर्गांत एव्हाना 'मामा' आल्याची कुणकुण असते... कॉरिडोअर्स मधून जाताना मुलं मध्ये थांबवून, "नमस्ते मामा!" करतात. मग आपणही "नमस्ते!" करायला हात जोडणार, इतक्यात समोरून 'शेक-हँड' साठी हात पुढे येतो. बच्चेमंडळींचा घोळका ओलांडून आपण पुढल्या वर्गाच्या दाराशी येतो...

... हा 'व्यावसायिक गट'. इथल्या मुलांचं मानसिक-शारीरिक वय थोडं जास्त. चलाखसुद्धा तितकेच! पण चॉकलेट्स बघून उजळणारा चेहरा अगदी छोट्यांच्या तुकडीइतकाच निरागस आणि '१०० वॉट्स' चा! चॉकलेट घेऊन सगळे आनंदाने हसणार आणि हस्तांदोलन करणार!! इकडे आपला शहाणपणा चालत नाही, मोबाईल 'लॉक' करून जरी त्यांच्या हातात खेळायला दिला, तरी तो रीतसर अनलॉक केला जाईल, आपली आवडती रिंगटोन काढून-मित्रांना एकवून दाद घेतली जाईल!

एकाने माझ्या जॅकेटची मखमल चिमटीत पकडून... "मा..मा.. तुझंय?" विचारलं. मग माझी मान हलल्यावर हातानेच 'मस्त' चा इशारा केला.
"घालतोस?"
एक हसू... सलज्ज 'नको' चा नुसता हिसका...
"घाल ना!" (आणि मग स्वत:च जॅकेट काढून त्याच्या खांद्यावर ठेवायला गेलो)
मग तर ते पोर लाजून लाजून हैराण!! :) त्याच्या गणवेशाला चिमटीत पकडून मीही 'मस्तंय!' चा इशारा केला की पुन्हा त्याची कळी खुलून गेली! मग थोडावेळ हास्यविनोद करून परत सगळे आपापल्या कामात मग्न.

पुढच्या वर्गात मुलींचा एक कंपू cross stitching आणि शोभेच्या वस्तू बनवत बसला होता. "नमस्ते!" ची एक फैर झडली . चॉकलेट पाहून एक मुलगी आनंदाने अक्षरश: चीत्कारली! मग प्रत्येकीच्या हातात चॉकलेट ठेवून प्रत्येकीचं काम पाहणं, "हे तू बनवलंस? ...मस्तंय गं!" सांगताच मग ती अजून काहीतरी दाखवणार- असं सगळ्या जणींचं चालू होतं.

असे कितीतरी जीव. चाळिशीतही शैशवात अडकलेल्या एक बाई... मानसिक वयाच्या मानाने अप्रतीम चित्रं काढतात. त्यांतली रंगसंगती, रेषांचा नेटकेपणा, पाहून कौतुकाने डोक्यावरून हात फिरवावा की वयाचा मुलाहिजा करून नमस्कार- काहीच कळेना.

माणसं व्यवहारी शहाणपण आणि निखळ-निर्व्याज स्वभावाचं नातं 'व्यस्त' ठरवूनच मोकळी का होतात कळत नाही.

ही माणसं - शरीराचा पिंजरा मोठा झाला तरी मन निरागस पिल्लूच राहिलं. तुमच्या आमच्या सारखं श्वापद बनलं नाही त्याचं. हे लहानसं जग पाहून खूप काही करावंसं वाटतं... मी एकटा काय करणार? तूर्तास तरी तुमच्या समोर ह्यांच्याच गुरुजनांच्या आणि नातेवाईकांच्या आठवणी त्यांच्याच शब्दात ठेवत आहे. त्या वाचाव्याशा वाटल्या तर http://chaukatrajah.blogspot.com ह्या दुव्याला अवश्य भेट द्या. तुम्हालाही काही सुचलं, शक्य असलं, तर तुम्हीही मदतीचं एक बोट उचला!