पुण्याचं स्टेशन फक्त तिकिटं घेऊन गेलो तरच उराउरी भेटतं असं नाही. खरं म्हणजे, तिकिटं घेऊन त्याला भेटायला गेलो तर ते नातं फारच औपचारिक असतं. आपल्याच शाळेत शिकवणार्या आईला तासांच्या वेळेत "आईऽऽ!" म्हणवत नाही, तसंच प्रवासी बनून स्टेशनाला आपलं म्हणवत नाही!
स्टेशनाचा आणि माझा स्नेह निर्हेतुक- तो 'स्वाभाविक उपयोगांमुळे' आलाच नाही. कॉलेजात जसे अभ्यास सोडून इतर दंगे होतात तसंच...
स्टेशन हे जागेपणीच्या वेळीच पाहण्यासारखं असतं ह्या बाळबोध समजुतीला छेद दिला तो उत्तररात्री होणार्या फेर्यांनी. ह्यावेळी सभ्य जग झोपलेलं असतं. 'रेल कर्मचारी और यात्री' झक मारून जागे असतात आणि बर्थ किंवा घर गाठून ताणून द्यायच्या विचारात असतात. अशावेळी कॉलेजच्या मित्रांचं कोंडाळं जमतं... चर्चेला विषय हवाच असं नाही. चहाच्या वाफा, धुराची वलयं हे तानपुर्यासारखे चालतात आणि वायफळ गप्पांच्या ठुमर्या किंवा बड्या ख़्यालां सारख्या गंभीर गप्पांच्या मैफली तासन् तास रमतात. कॉलेज किंवा एफ़सी-जे एम पेक्षा इथल्या बेफिकिरीला रंग चढतो. कारण ट्रेन मागे पळणार्या जगात घाईत निवांत मित्रांचं बेट अजूनच उठून दिसतं.
स्टेशनावर सगळ्या बजेट्स चे लाड पुरवून होतात. स्टेशनाबाहेर तुमच्या डोळ्यांसमोर अंडी फोडून चमचमीत भुर्जी-पाव म्हणजे वीस रुपयांत स्वर्गाचं तिकिट! म्या शाकाहार्याला चिडवत चिडवत माझे मित्र 'स्वर्गात' जातात आणि मी चार रुपयात वाफाळता आल्याचा चहा पिऊन 'जनरल तिकिटात' तोच स्वर्ग गाठतो.
आमचा 'भिडू' बनलेलं स्टेशन कधी कधी आमच्या अवेळी येण्याजाण्याशी-अवेळी गरजांशी जुळवून घेणार्या एखाद्या प्रेमळ-समंजस घरमालकिणीसारखं सुद्धा वाटतं. रात्री ११:३० नंतर सगळी हॉटेलं बंद झाल्यावर एकमेव पर्याय म्हणजे स्टेशनावरचं २४ तास कॅफ़ेटेरिया. 'चैन' ह्या सदरात मोडत असलं तरी 'पोटोबा'ची सोय होते.
परीक्षेच्या आदल्या रात्री तर आम्ही लोक तिथल्या 'अहोरात्र' नेटकॅफ़े मध्ये पडीक असतो. पहाटे ४ वाजता तारवटलेल्या डोळ्यांचे २-३ माथेफिरू कॅफ़ेटेरियात बसून 'इराणचं आण्विक धोरण' किंवा 'अफ़ज़ल ची फाशी' वर तावातावाने चर्चा करतात आणि आजूबाजूचे लोक भांबावून जातात.
पहाट विरघळू लागते. आकाश पांढरं होऊ लागतं. पार्किंग सांभाळणारा रात्रीचा भैय्या, रात्रपाळीला भुंकणारी कुत्री, भडक मेक-अप करून रात्र जागवणार्या बाया, भुर्जीपाव बदडून थकलेले लोक आता झोपाळलेल्या डोळ्यांनी घरची वाट धरतात. अभ्यासाची-नोट्स ची 'बंडलं' सांभाळत आम्हीही बाहेर पडतो.
हेच स्टेशन बॅगा घेऊन गेलो की इतकं अनोळखी वाटतं! आतले रुळांचे-डब्यांचे लोखंडी वास, एकसुरी आवाजातल्या अनाऊंसमेंट्स, युनिफ़ॉर्म मधेले कर्मचारी पाहून 'आतून एक-बाहेरून एक' वास्तू परकी वाटू लागते.
पण तोपर्यंत दुसर्या स्टेशनाची आठवण येते... माझ्या गावच्या लहानशा गावच्या स्टेशनाची. पहाटे ४ ला एका गाडीपुरतं जागणारं, मग परत कूस पालटून, 'शेवटची पाच मिनिटं अजून' झोपून दिवसाला सामोरं जाणारं...
मी पण एक परका प्रवासी बनतो. स्टेशनही दूर पडतं. पण तीनच दिवसांनी २ मित्र ह्या तिसर्या मित्राला परत एकदा भेटतो.. चहा, सुट्टा, अभ्यास, गप्पा!! गाडी परत चालू लागते!